किंग्ज इलेव्हन-सनरायझर्स लढत आज

0
89

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदाराबाद यांच्यात आज यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वातील २२वी लढत रंगणार आहे. दोन्ही संघ आज विजयी लय पकडण्यासाठी मैदावर उतरणार आहेेत.

लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हनने आतापर्यंत पाच सामने खेळलेले असून त्यापैकी केवळ एकच लढत त्यांना जिंकता आलेली आहे. गुणतक्त्यात ते तळाला आठव्या स्थानावर आहेत. तर सनरायझर्स हैदाराबाद संघानेही पाच लढती खेळलेल्या असून त्यापैकी त्यांना केवळ २ लढतींत विजय मिळविता आलेला आहे. ४ गुणांसह ते सहाव्या स्थानावर आहेत.

किंग्ज इलेव्हनची मजबूत बाजू म्हणजे त्यांची सलामी जोडी. कर्णधार लोकेश राहुल व मयंक अगरवाल हे दोन्ही भारतीय सलामीवर शानदार लयीत आहेत. राहुलने आतापर्यंत खेळलेल्या पाच लढतींतून एक शतक व दोन अर्धशतके नोंदविलेली आहेत. तर मयंकनेही एक शतक व एक अर्धशतकी खेळी केलेली आहे. विंडीजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनही चांगली कामगिरी करीत आहे. परंतु त्यांच्या ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला अजून सूर गवसलेला नाही आहे. त्यांच्याकडे फलंदाजीची चांगली फळी आहे. परंतु कमजोर गोलंदाजी विभाग हे त्यांच्या पराभवांचे प्रमुख कारण ठरत आहे. मोहम्मद शमी सोडल्यास त्यांचा अन्य एकही गोलंदाज यशस्वी ठरलेला नाही आहे.

दुसर्‍या बाजूने सनरायझर्स हैदराबाद संघही तुल्यबळ आहे. त्यांच्याकडे कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवर जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे, केन विल्यमसन व युवा प्रियम गर्गसारखे मोठी खेळी करण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत. परंतु सांघिक कामगिरीच्या अभावामुळे आणि कमजोर गोलंदाजीमुळे त्यांना सामने गमवावे लागत आहेत. पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील दोन लढती त्यांनी जिंकल्या होत्या. परंतु गेल्या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडियन्सकडून त्यांना ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यांचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्यांना मोठा झटका बसलेला आहे. त्याच्या जागी स्थान मिळालेला सिद्धार्थ कौल बराच महागडा ठरला होता. कामचलाऊ गोलंदाज म्हणून विल्यमसन यशस्वी ठरला आहे. युवा गोलंदाज अभिषेक वर्मा व अब्दुल समद यांच्यावरवी विश्वास ठेवावा लागेल. तर टी. नटराजन व राशीद खानला संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलावा लागणार आहे. सनरायझर्सकडे अफगाणिस्तानचा अन्य एक अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी आणि वेस्ट इंडीजचा फॅबियन ऍलेन यांनाही अंतिम अकरात स्थान देण्यासाठी पर्याय आहे. परंतु त्यासाठी त्यांना विल्यमसनला बाहेर ठेवावे लागणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद (संभाव्य) ः डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), केन विल्यमसन, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, राशीद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, टी. नटराजन.
किंग्ज इलेव्हन पंजाब (संभाव्य) ः लोकेश राहुल (यष्टिरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, मनदीप सिंग, निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, ख्रिस जॉर्डन/ख्रिस गेल, मुरुगन अश्विन/जगदीश सुचित, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल.