बुद्धिदाता गणपती

0
302

योगसाधना – ४७५
अंतरंग योग – ६०

  • डॉ. सीताकांत घाणेकर

माणसाने आपल्या बुद्धीच्या मर्यादेचे भान ठेवायला हवे आणि श्रद्धा अखंड असायला हवी. असे सहसा दिसत नाही. त्यामुळे तथाकथित बुद्धिमानांचा अहंकार वाढतो. काहीजण तर स्वतःला नास्तिक म्हणण्यात भूषण मानतात आणि भगवंताच्या अस्तित्वालासुद्धा आव्हान देतात.

गणपती म्हणजे समूहाचा नेता. आता नेता म्हटले की लक्षात येतो… बहुतकरून तो राजकीय नेता, सामाजिक नेता. पण हा दृष्टिकोन मर्यादित झाला. नेता विविध ठिकाणी असतो. उदा. कुटुंबात वडीलधारी असतात- आजी, आजोबा, आई-बाबा. त्यातील जो कुणी नेतृत्व करतो त्यालादेखील नेताच मानायला हवा.

ऑफिसमध्ये अथवा इस्पितळात जो कुणी मुख्य असेल तो नेता. शाळा-कॉलेज- विद्यापीठात उच्च पदावरील व्यक्ती नेता असते.
सारांश – प्रत्येक नेत्याने आपले कर्तृत्व वापरून कर्तव्य उत्तम रीतीने निभावले पाहिजे. त्यासाठी फक्त एक डिग्री व अनुभव असून उपयोगी नाही. ते आवश्यक आहेच पण इतर गुणही अत्यंत गरजेचे आहेत.
गणपतीच्या शरीराचा व त्याच्या अवयवांचा विचार केला, त्यावर सूक्ष्म चिंतन केले की लगेच नेत्याला आवश्यक गुण सहज लक्षात येतात.

आम्ही हत्तीचे डोके, कान यांचा विचार केला. आता लक्षात येतात ते त्याचे डोळे.

  • डोळे – त्याचे डोके एवढे मोठे पण डोळे अगदी बारीक. याचे विविध पैलू आहेत- १) बारीक डोळे म्हणजे सूक्ष्म दृष्टीचे प्रतीक. हत्ती बारीक सुईसुद्धा बघू व उचलू शकतो. प्रत्येक मानवाला जन्मजात विविध विकार- वासना असतात. त्यांच्यामुळे त्याचा व समाजाचा नाश होतो. म्हणून स्वतः स्वतःच्या दोषांना निरखून घेऊन त्यांना अडवले पाहिजे. तरच जीवनविकास होईल.
    आपल्यातही काही लहान मुले असतात. त्यांचे डोळे असेच असतात. ती सर्व घटनांचे व्यवस्थित निरीक्षण करतात.

२. बारीक डोळे म्हणजे दीर्घ दृष्टी. भारतात पुरातन काळापासून एक समजूत आहे. की हत्ती आपल्या दीर्घ दृष्टीने व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो. या संदर्भात लहानपणी ऐकलेली गोष्ट म्हणजे-
जेव्हा एखाद्या राजाला वारस नसतो तेव्हा हत्तीणीच्या सोंडेत फुलांची माळ देऊन तिला गावांत फिरवीत असत. आणि ती ज्याच्या गळ्यात माळ घालीत असे त्याला राजा बनवीत असत.
आता अशा गोष्टीत किती सत्य व तथ्य असेल देवच जाणे. पण मुख्य मुद्दा नाकारता येत नाही तो हा की नेत्याला सूक्ष्मदृष्टी व दूरदृष्टीसुद्धा असायला हवी. तदनन्तर येते हत्तीचे नाक म्हणजे सोंड. ती लांब असते व सर्व बाजूंनी व्यवस्थित फिरते. त्यामुळे ती हुंगायचे, वास घ्यायचे काम व्यवस्थित करते. जीवनात विविध गंध असतात. उदा. स्वयंपाकघरात काय शिजते त्याचा गंध. वस्तूप्रमाणे गंध वेगवेगळे असतात. तसेच राजकारण्यांना विरोधी पक्षाचे अथवा शत्रूपक्षाचे काय कारस्थान शिजते हे माहीत असायला हवे. हल्ली तर ही कामे सॅटेलाइट करत असतो.

  • गणपतीला दोन सुळे आहेत. त्यातील एक पूर्ण तर एक अर्धा तुटलेला. या संदर्भात बालपणी एक गोष्ट ऐकलेली ती अशी…
    व्यासमहर्षींना महाभारत लिहिण्यासाठी कुणीतरी पाहिजे होतं. गणपतीची त्यासाठी निवड झाली. पण महर्षींनी एक अट घातली होती की लिहिणार्‍याने मध्ये थांबता कामा नये. गणपतीसुद्धा हुशार आहे. त्यानेही आपली अट घातली. सांगणार्‍याने उगाच बडबडू नये. प्रत्येक वाक्य नीट विचार करून सांगावे. दोघांनीही परस्परांच्या अटी मान्य केल्या.
    झाले.. महाभारत लिहिणे सुरू झाले. काम व्यवस्थित चालले होते. मध्येच गणपतीच्या हातातील लेखणी मोडली. आता दुसरी लेखणी आणायला थांबलो तर लिहिण्यात व्यत्यय येणारच. आपण अट मोडल्यासारखे होईल म्हणून गणपतीने लगेच आपला एक दात मोडला व त्याची लेखणी करून लिहिणे चालू ठेवले.
    आम्हाला, लहान मुलांना त्या बालगणपतीचे कौतुक वाटायचे. पण शेवटी गोष्ट बोध घेण्यासाठी असते. बोध विविध असू शकतील.

१. गणपतीने अशा आपद्काळात वापरलेली स्वतःची बुद्धी. प्रत्येकाच्या आयुष्यात कळ नकळत अनेक समस्या येतात. तेव्हा मन शांत ठेवून उपाय करणे गरजेचे. म्हणून बुद्धी तीक्ष्ण असायला हवी.
२. लिहिणारा व वाचणारा यांनी आपली कामे व्यवस्थित विचार करूनच करायला हवीत. एरवी काही अपवाद सोडले तर लेखकच आपले साहित्य लिहितो. पण त्याने आपल्या लेखनाचे परिणाम काय होतील याचा विचार करून लेखन करायला हवे. हल्लीच्या काळात असे लेखक दुर्मीळ होताना दिसतात. त्यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण होतात. तसेच वाचणारा- आपण काय वाचतो? कसे वाचतो? लक्ष देऊन वाचतो की उगाच वाचण्यासाठी (टाइमपास) वाचतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

एखादी कथा वाचणे वेगळे आणि तत्त्वज्ञान वाचणे वेगळे. प्रत्येक शब्दाला, वाक्याला काही अर्थ असतात- शब्दार्थ- भावार्थ- गर्भितार्थ- आध्यात्मिक अर्थ. तसेच काही शब्द द्विअर्थी असतात. कोण कसा अर्थ घेतो ते महत्त्वाचे आहे.
पू. पांडुरंगशास्त्री म्हणतात-

  • दोन सुळ्यांपैकी एक पूर्ण सुळा श्रद्धेचा व तुटलेला अर्धा तो बुद्धीचा. त्यातील बुद्धी थोडी कमी असली तर चालेल. म्हणून व्यक्तीचा स्वतःवर व प्रभूवर थोडासुद्धा कमी विश्‍वास असला तर चालणार नाही.

ईश्‍वराने मानवाला दोन अनमोल गोष्टी दिल्या आहेत- श्रद्धा आणि बुद्धी. या दोहोंचा समन्वय जीवनात अपेक्षित आहे- जीवनविकासासाठी.
शास्त्रीजींच्या मतानुसार फारच कमी माणसे असा समन्वय साधू शकतात.
‘‘बुद्धी जसजशी वाढत जाते तसतसे तिच्या प्रकर्ष अग्नीत मानवाचे श्रद्धापुष्प कोमेजून जाते. मानवाने हा समन्वय साधण्यासाठी ईश्‍वराजवळ प्रार्थना केली पाहिजे- ‘‘प्रभो! तुझ्याजवळ एवढेच मागतो की बुद्धी वाढली तरी भाव टिकू दे.’’
माणसाने आपल्या बुद्धीच्या मर्यादेचे भान ठेवायला हवे आणि श्रद्धा अखंड असायला हवी. असे सहसा दिसत नाही. त्यामुळे तथाकथित बुद्धिमानाचा अहंकार वाढतो. काहीजण तर स्वतःला नास्तिक म्हणण्यात भूषण मानतात आणि भगवंताच्या अस्तित्वालासुद्धा आव्हान देतात.
अनेक बुद्धिवानांचा भाव कोमेजलेला असतो. म्हणून तर शास्त्रकार म्हणतात-
‘‘ज्ञानियांच्या घरी भावाचा अभाव’’|
समाजात असे काही नेते असतात ज्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे फार मान, उच्च स्थान असते पण कुटुंबात वावरताना त्यांना भाव नसतो. घरात सदस्यांकडे त्यांची वागणूक चांगली नसते. म्हणून अशा नेत्याने बुद्धी व भाव दोहोंचा समन्वय साधायला हवा.

  • गणपतीचे चार हात – यातील प्रत्येक हातात वेगवेगळी वस्तू आहे. एका हातात अंकुश, दुसर्‍या हातात पाश, तिसर्‍या हातात मोदक व चौथा हात आशीर्वाद देत आहे.
    अंकुश – वासना-विकारांवर संयम हवा असे दर्शवतो.
    पाश – गरज पडली तर आपल्या इंद्रियांना तसेच अनुयायांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य दाखवतो.
    आज विचार केला तर लगेच लक्षात येईल मानवाचा आपल्या वासना-विकारांवर व इंद्रियांवर बिलकूल संयम नाही म्हणून राजयोगामध्ये त्यासाठी यम-नियम सांगितले आहेतच पण त्याशिवाय प्रत्याहार सांभाळणेही गरजेचे आहे. तसेच आजचे अनुयायी आपल्या नेत्याचे ऐकतीलच असे नाही. म्हणूनच लोकशाहीऐवजी झुंडशाही दिसते.
  • मोदक – म्हणजे मोद (आनंद) देणारा. याचे विविध पैलू आहेत.
    महापुरुषांचा तसेच प्रत्येक इंद्रियाचा आहार सात्त्विक असला पाहिजे. आपण विचार करायला हवा की आपला आहार सात्त्विक आहे का? अनेकांचे उत्तर नाही असेच येईल. मग आरोग्य चांगले कसे राहील?
  • पू. पांडुरंगशास्त्रींना मोदकामध्ये तत्त्वज्ञान दिसते. ते म्हणतात, ‘तो तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. – मोदकाच्या बाहेरच्या पापुद्य्राप्रमाणे तत्त्वज्ञानसुद्धा वरवर नि बाहेरून चाखणार्‍यांना फिके लागते. परंतु आतील सारभाग मधुर असतो,’
    तत्त्वज्ञान हे असेच असते. सुरुवातीला वरवर विचार केला की ते शुष्क वाटते पण थोडा अभ्यास करता करता जेव्हा सखोल जाणे होते तेव्हा त्यातील गोडवा कळतो. अशा व्यक्तींना पीएचडी दिली जाते- डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी.
  • लहान मुलांनासुद्धा पहिल्या घासात मोदक आवडत नाही. पण थोडा खालच्या भागाचा घास घेतला की पंचखाद्य तोंडात येते. मग त्याला मोदकाची चव कळते. आपलेही तसेच आहे.
  • चौथा हात आशीर्वादाचा. भक्त आपल्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात. त्यांना भगवान आशीर्वाद देतो. त्याचा दुसरा अर्थ म्हणजे स्वतःच्या लाडक्या मुलांना भरवण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवला आहे. दुसर्‍या हाताने तो त्यांना बोलावतो. योगसाधक योगतत्त्वज्ञानाचा मोदक चाखत असतीलच.