रुग्ण कमी व चाचण्याही

0
278

२५ मार्चला गोव्यात कोरोनाचे पहिले तीन रुग्ण आढळले होते. स्पेन, बहामा आणि ऑस्ट्रेलियातून ते आले होते. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील व देशातील कोरोना फैलावाचे प्रमाण सतत वाढते राहिले. मात्र, नुकताच अर्थ मंत्रालयाने एक आशेचा दिवा भारतीयांच्या मनामध्ये प्रज्वलित केला. गेल्या सप्टेंबर महिन्यातच भारताने कोरोना रुग्णसंख्येचे शिखर गाठले असावे आणि आता ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी कमी होत जाईल अशा प्रकारचा आशावाद नुकताच मांडला गेला. अर्थात, केवळ गेल्या पाच – सहा दिवसांच्या आकडेवारीतून अशा निष्कर्षाप्रत येणे योग्य ठरणार नाही, परंतु सतत नकारात्मक बातम्या ऐकत आलेल्या जनतेला यातून तात्पुरता का होईना दिलासा मात्र नक्कीच मिळाला. गोव्यामध्येही सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या या पहिल्या आठवड्यात रुग्णांचे प्रमाण कमी दिसते. त्यामुळे खरोखरच अशा प्रकारे रुग्णसंख्या कमी होत चालली आहे का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु गोव्याच्या संदर्भात मात्र निराशाच पदरी पडली.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात १ ते ५ सप्टेंबर या पाच दिवसांत राज्यात ३०३७ कोरोना रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील १ ते ५ ऑक्टोबर या काळामध्ये गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या आहे २३०२. म्हणजेच राज्यातील ऑक्टोबरमधील आजवरची कोरोना रुग्णसंख्या सप्टेंबरच्या तुलनेत कमी जरूर आहे, परंतु यामध्ये एक ग्यानबाची मेख आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमधील कोविड चाचण्यांचे प्रमाणच जवळजवळ अर्ध्याने कमी आहे. असे असूनही ही दोन हजारांची रुग्णसंख्या आढळून आलेली आहे. १ ते ५ सप्टेंबर या पाच दिवसांत १४ हजार २४५ कोविड चाचण्या गोव्यात करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे एकूण प्रमाण आहे अवघे ७४४० म्हणजे जवळजवळ अर्ध्याने कमी. परंतु तरीही रुग्णसंख्या दोन हजारांचा आकडा पार करून गेली आहे. याचाच दुसरा अर्थ सप्टेंबरच्या पहिल्या पाच दिवसांत जेथे एकूण चाचण्यांच्या २१.३ टक्के लोक हे कोरोनाबाधित आढळले होते, तेच प्रमाण आता ३०.९२ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. म्हणजेच रुग्णसंख्या कमी जरी दिसली असली, तरी होणार्‍या चाचण्यांच्या कमी झालेल्या प्रमाणाकडे पाहता ती मोठीच आह
कोविड चाचण्यांचे प्रमाण संपूर्ण देशात खरे तर वाढत गेले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालातही तेच सांगितले गेले आहे. परंतु गोव्यामध्ये मात्र उलटी गंगा वाहावी तसे कोविड चाचण्यांचे प्रमाणच कमी झाले आहे, ते कसे काय? रुग्ण कमी झाले आहेत म्हणावे तर होम आयसोलेशनखालील लोकांची संख्या वाढती आहेच, परंतु एक शंका घेण्यास येथे वाव राहतो ते म्हणजे आपल्याला कोविडची सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर लोक कोविड चाचणी, होम आयसोलेशनसाठी ऑनलाइन अर्ज वगैरे सव्यापसव्य करण्याच्या भानगडीत न पडता स्वतःच परस्पर त्यावरील औषधे घेत नसावेत ना? तरीही लक्षणे बळावली तरच इस्पितळांकडे शेवटच्या क्षणी धाव घेतली जाते. मृत्यूचे प्रमाण राज्यात मोठे आहे ते यामुळे. आरोग्य खात्याने या शक्यतेची पडताळणी गांभीर्याने करायला हवी.
गेल्या मार्चपासून आजवरचा जो दैनंदिन तपशील आरोग्य खात्याने प्रसृत केला आहे, त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न तरी सरकारने आजवर केला आहे काय? मुळात आरोग्य खात्याच्या या दैनंदिन पत्रकांचा एकमेकांशी ताळमेळ कधीच जुळत नाही हे आम्ही वारंवार सप्रमाण दाखवून दिलेले आहे. परंतु निदान जो तपशील जनतेसमोर ठेवला जातो आहे, त्याचे तरी विश्लेषण व्हायला हवे होते, त्यातून काही महत्त्वाच्या निष्कर्षांप्रत येता आले असते, तेही आरोग्य खात्याला जमलेले दिसत नाही. आरोग्य खात्यामधील नोकरभरतीसाठी गोमेकॉत नुकतीच उडालेली इच्छुक उमेदवारांची झुंबड पाहिली तर या खात्यालाच सामाजिक दूरी आणि इतर उपाययोजनांचा विसर पडला आहे का असा प्रश्न पडतो. ज्यांनी हा गोंधळ माजवला त्यांचे खरे तर निलंबन व्हायला हवे, एवढी ही अक्षम्य बेफिकिरी आहे.
राज्यातील कोविड केअर सेंटर्सकडे जनतेने पाठ फिरवलेली दिसते. त्यापेक्षा आपल्या घरीच राहून उपचार घेणे अधिक चांगले ही जर कोरोनाबाधितांची भावना बनत असेल तर त्याचा अर्थ सरकार देत असलेल्या सुविधांवर जनतेचा भरवसा नाही असा होतो. कोविड इस्पितळांची स्थिती तर भयावह आहे. तेथे सर्वसामान्य रुग्णांना आजही खाटा उपलब्ध होत नाहीत. त्याबाबत पारदर्शकता असावी अशी मागणी करूनही सरकार त्याकडे कानाडोळा करीत राहिले आहे. एवढे सारे असूनही सरकार स्वतःवरच खुश दिसते.
देशातील बहुतेक सर्व राज्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्यातून अधिकाधिक लोकांचे वेळीच निदान करणे त्या राज्यांना शक्य झाले. गोव्यामध्ये मात्र उलटी गंगा वाहते आहे त्याचे काय करायचे?