जुवारी पुलावरील चारपदरी रस्ते येत्या एप्रिल २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती काल बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली. अन्य दोन पदरी रस्ते मात्र त्यानंतर वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, असे ते म्हणाले. राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम मे २०२१पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगून केंद्राने रस्त्यांच्या हॉटमिक्ससाठी राज्याला दिडशे कोटी रु. दिले असल्याची माहितीही पाऊसकर यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे पुलाच्या बांधकामावर परिणाम झाला. अन्यथा आतापर्यंत पुलाचे बरेचसे काम पूर्ण झाले असते, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यभरातील चाळण झालेल्या रस्त्यांविषयी पत्रकारांनी पाऊसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील रस्त्यांचे डांबरीकरण करता आले नाही. महामारीमुळे रस्ता डांबरीकरणासाठी लागणारे कोणतेही साहित्य उपलब्ध होत नव्हते. स्थलांतरीत कामगार गावी गेल्याने मनुष्यबळ मिळणेही शक्य नव्हते. मात्र, आता हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर झालेली असून मान्सूनही परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सरकार हाती घेणार असल्याचे पाऊसकर यांनी स्पष्ट केले. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत राज्यातील एकाही रस्त्यावर खड्डे दिसणार नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गांचे जेथे जेथे काम पूर्ण झालेले आहे तेथे तेथे रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे.
त्याशिवाय पणजी फोंडा, वास्को, पणजी व अन्य शहरे व गावातील राज्य मार्गांचेही डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही पाऊसकर यांनी दिली. कंत्राटदारांना यापूर्वीच काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.