गारवा तुझ्या आठवणींचा

0
245
  • सुरज गायकवाड

‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा मुलगा शंतनू म्हणाला. ‘‘अरे बाळा, लक्षच नाही माझं. हा पावसाळ्यातील गारवा प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यातल्या काही अनमोल क्षणांची आठवण करून जातो.

‘‘कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू बेभान लाटा, थैमान वारा, चिंब पावसाची ओली रात्र’’… निशा आपलं आवडतं गाणं गुणगुणत कार चालवत होती. आंबोली घाटातली नागमोडी वळणं संपायचं नाव घेत नव्हती. अचानक गाडी विचित्र प्रकारचा आवाज करू लागली, … अरे देवा ही इथे आता बंद पडायला नको. निशाने मनात विचार केला व जणू आंबोलीतल्या निसर्गदेवतेने ‘तथास्त’ु म्हटल्याप्रमाणे तिची गाडी तात्काळ बंद पडली.

‘‘देवा, मी काय करू? या जंगलात मी कोणाची मदत मागू?’’.. निशा रडकुंडीला येत घाबरलेल्या स्वरात स्वतःशीच पुटपुटली. सायंकाळची वेळ होती. आभाळात काळ्या नभांनी आपली हजेरी लावली होती. जणू ते काळे नभ निशाला संदेश परिवहन करत होते की आम्ही लवकरच बरसणार आहोत. थंडगार वार्‍याची डौलदार झुळुक तिच्या तनाला स्पर्श करून गेली व ‘टप- टप’ जलधारा नभातून कोसळू लागल्या. निशाने ताबडतोब आपल्या गाडीचा दरवाजा उघडा केला व कारमध्ये स्थान ग्रहण केले. तिच्या मनात भयंकर विचार येत होते… ‘जर एखाद्या वाघाने मला फाडून खाल्ले तर…’! निरनिराळ्या पक्ष्यांचा चिवचिवाट कानी पडत होता.

खिडकीतून पाहिल्यावर तीन हरिणांची झुंड वार्‍याच्या वेगात डोंगराच्या उतरणीला धावून गेली. पशूपक्षी आपल्या गुहेत व घरट्यात पलायन करत होते. घन बरसताना जोमाने वारा चालू असल्यामुळे पावसाच्या धारा सैरावैरा, दहाही दिशांनी पसरत होत्या. मनुष्याला आयुष्यात कितीही सुखसोयी उपभोगायला मिळाल्या तरीही तो असमाधानी असतो. पण चिंब वादळवार्‍यापासून आपलं रक्षण करायला मुक्या प्राण्यांकडे आसराही नसतो. हे पाहून निशाला मोलाची शिकवण मिळाली. वाटेतून दोन-तीन ट्रक गेले पण निशाच्या मदतीच्या हाकेकडे त्यांनी दुर्लक्ष करीत आपला रस्ता कापला. आता जवळजवळ निशाला गाडीमध्ये बसून अर्धा तास झाला होता. तिने देवाला मदतीची हाक मारली, ‘परमेश्‍वरा….’. कोणाचीच जाग नव्हती. त्यात अचानक एक भलीमोठी कार तिच्या मागे येऊन थांबली. निशा धावतच बाहेर आली व तिने त्या कारचा दरवाजा ठोठावला. चिंब बरसणार्‍या पावसात तिचे रूप आणखीनच खुलून उठले होते. तिचे ते पावसात भिजलेले ओलेचिंब केस, गुलाबाच्या कळ्यासमान तिचे सूक्ष्म ओठ आणि मदतीची हाक मारताना पाणावलेले तिचे पाणीदार डोळे पाहून राजनला अक्षरशः निसर्गदेवीचे दर्शन घडल्यासारखे भासले.

राजनने गाडीचा दरवाजा उघडला व म्हणाला, ‘‘काय झालं? तुम्ही कोणत्यातरी संकटात दिसता?’’ निशाने आपल्या बोटाने तिच्या बंद पडलेल्या कारकडे निर्देश केला व राजनची मदत मागितली.
‘‘इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे. जर योग्य प्रकारे गाडीची डागडुजी केली नाही तर ती पुन्हा अशीच बंद पडू शकते’’, रॅगन उद्गारला. निशाने विचारपूर्वक नजरेने विचारले, ‘‘इथे जवळपास एखादे गरेज आहे?’’ ‘‘इथे आणि गॅरेज?’’… राजन गोड स्मित देत म्हणाला. ‘‘तू एकटी मुलगी, अशा अडचणीत सापडलेली, जर तुला अडचण नसेल तर माझे घर जवळच आहे. तू आमच्या घरी आज मुक्काम करू शकते. माझी आई व लहान भावंडंसुद्धा आहेत. उद्या दुपारपर्यंत मी माझ्या मेकॅनिक मित्राला फोन करीन. गाडी दुरुस्त झाली की तू तुझ्या वाटेला आणि मी माझ्या!’’

निशाने मनात विचार केला, ‘‘मुलगा प्रतिष्ठित घराण्यातला दिसतो. याच्याबरोबर जाण्यास काहीच हरकत नाही. व तिला दुसरा उपायही सापडत नव्हता. निशाने ताबडतोब आपले सामान घेतले व त्याच्या गाडीत बसली. आता सर्वत्र दाट काळोख पसरला होता. राजनच्या अत्तराचा सुगंध सार्‍या गाडीत दरवळत होता. सगळं शांत झालं होतं. पाऊस थांबला होता. सुमारे अडीच तासाच्या चढ-उतारानंतर त्यांची गाडी एका भल्या मोठ्या लाकडी वास्तुजवळ येऊन थांबली. ती वास्तू प्रशस्त नि आकर्षक दिसत होती. घराच्या बाहेर वर्‍हांड्यात वरती मधोमध भाग्यवान मोहिनी घंटा लटकवलेली होती. वार्‍याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर ती घंटा मोहक ध्वनी कानी पाडत असे. राजनने निशाचा परिचय आपल्या आईशी आणि भावंडांशी केला. राजनची आई फार प्रेमळ होती. तिने निशाला तिचे ओले कपडे बदलायला सांगितले व हॉलमध्ये गरमागरम चहा व पोह्याचा आस्वाद घेण्यासाठी बोलावले. ‘‘दीदी तुम्ही कुठे राहता? तुम्ही आम्हाला ओळखता का?’’ निशाने लाडाने राजनच्या भावंडाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, ‘‘मी मूळची गोव्याची. मुंबईला असते कामानिमित्त.’’

काही क्षणातच निशाला ती सगळी मंडळी आपली वाटू लागली व तिने तिच्या लाडीगोडीने सर्वांची मनं जिंकली.
रात्रीच्या जेवणाला मांसाहारी बेत होता. राजनच्या आईने इतके चवीष्ट जेवण बनवले होते की निशाने आपले ताट पूर्ण संपवले. रातकिड्यांचे मधुर प्रकाशमय गीत व रूबाबदार चंद्राची आकृती पाहात तिचा कधी डोळा लागला तिला कळलेच नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी मोठमोठ्याने खिडक्या आपटल्याचा आवाज कानी पडला व ती जागी झाली. ‘‘गुड मॉर्निंग, मॅडम’’ राजनने आपली मिश्कील नजर तिच्या नजरेत भिडवली व निशा लाजून गोरीमोरी झाली. निशाच्या खिडकीतून नजर जाईल तिथपर्यंत हिरवेगार मखमली डोंगर नजरेस दिसत होते. कोठे डोंगरावर मध्येच पायर्‍यांप्रमाणे नमुने तयार केलेले होते. ‘‘हे काय आहे राजन?’’ निशाने डोंगरावरील त्या भागाकडे निर्देश करत शंका व्यक्त केली. कोठे गडद हिरवा तर कोठे फिकट हिरव्या रंगाच्या छटा दिसत होत्या. राजनने तिला समजावत म्हटले, ‘‘याला ‘टेरेस फार्मिंग’ असं संबोधलं जातं. येथील रहिवासी या डोंगरावर वेगवेगळ्या धान्यांची लागवड करतात. या डोंगराळ भागातील शेती ही अशाप्रकारेच असते.’’ निशाने ते भान हरपवणारे निसर्गाचे रूप पाहून तेथे जाण्याचा हट्ट धरला. चहापाणी आटोपून राजनने आपल्या मित्राला गाडी दुरुस्त करण्यासाठी शहरातून बोलावून घेतलं व ते दोघेही डोंगराळ प्रदेशातील सफारीला बाहेर पडले.

सकाळीच जोरदार पाऊस पडल्याने तांबड्या मातीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. रस्त्यावरील पाने व पाचोळा ओलसर होता. थंडगार हवेच्या लहरी निशाला खेटून जात होत्या. आभाळातील पांढरे शुभ्र ढग कापसाप्रमाणे दिसत होते. असे वाटत होते की त्या शुभ्र ढगांचे मीलन डोंगराबरोबर होत आहे व डोंगर आभाळात पोचले आहेत. निशाचा हात धरून राजन उतारावरून सावकाश तिला पुढे नेत होता. हा आगळावेगळा अनुभव तिला वेगळीच चाहूल देत होता. राजनची ती सुदृढ आकृती, मिश्कील नजर व आपुलकीचे वागणे पाहून ती पार विरघळून जात होती. अखेर ते दोघेही त्या शेतीच्या भागात पोहोचले व निशाने उत्साहीत होऊन मोठ्याने किंकाळी मारली. निसर्गाचे एवढे गोजिरवाणे रूप तिने कधीच पाहिले नव्हते. निशा काकड्या तोडत असताना मध्येच पाऊस आणि वादळवारे बरसू लागले व त्या दोघांनीही एका मोडक्या झोपडीत आश्रय घेतला. काही मिनिटातच कडक ऊन पडले व नभात इंद्रधनुष्य निखळ हसू लागले. परतीच्या वाटेवर राजनने निशाला रानमेवा खायला दिला व निरनिराळ्या प्रकारच्या फुलांचा गुच्छ करून निशाने आणि राजनने घर गाठले. आपली गाडी राजनच्या घरासमोर उभी आहे हे पाहून निशा अत्यानंदी झाली व तिने राजन व त्याच्या मित्राचे मनःपूर्वक आभार मानले.

‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा मुलगा शंतनू म्हणाला. ‘‘अरे बाळा, लक्षच नाही माझं. हा पावसाळ्यातील गारवा प्रत्येक वेळी माझ्या आयुष्यातल्या काही अनमोल क्षणांची आठवण करून जातो.