पर्यटनावर कोरोनाचे सावट

0
425
  • सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकर
    फोंडा

खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत आहेत. कितीही सुरक्षितता बाळगली, सॅनिटायजर वापरले, कोरोंना निगेटिव्ह टेस्ट कंपल्सरी केली, मास्क, ग्लोव्हज वापरले तरी कोरोंना होणारच नाही अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे या उद्योगाला चालना तेव्हाच मिळेल जेव्हा सगळे आलबेल होईल.

माणूस जगतो आनंद मिळवण्यासाठी. जगण्याची उद्दिष्टे, ध्येय वेगवेगळी असली तरी तत्त्व मात्र एकच असतं, आनंद मिळवणं! आणि या आनंदामागे धावताना दमछाक ही होतेच. अशा वेळेला पर्यटन हा एक आनंद मिळवण्याचा पर्याय बनतो. तसं पाहिलं तर आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे आणि प्रत्येक येणारं नवीन वर्ष हे एक नवं डेस्टिनेशन असतं किंवा असायला पाहिजे.

कित्येकदा आपल्या मनात येतं घराबाहेर पडावं, कुटुंबासहित किंवा आवडत्या ग्रुप बरोबर मनसोक्त फिरावं, निसर्गरम्य ठिकाणी जाऊन रीलॅक्स व्हावं. देश विदेशात भटकंती करावी आणि सुट्टीची पूर्ण मजा अनुभवावी, हिंडावं, फिरावं मस्त मजेत जग पाहावं, नोकरी-धंद्यामुळे उबगलेल्या जिवाला चार क्षण आनंदाचे मिळाले की ते टॉनिक पुढच्या कामासाठी जोमाने काम करायची तरतरी मिळवून देतं. नोकरी करणार्‍या स्त्रियांना आजकाल माहेरसुद्धा अंतरले आहे. अशा वेळी टूरबरोबर फिरायला गेलं की माहेरी आल्यासारखी विश्रांती मिळते. टूरमध्ये एकदा पैसे भरले की काही दगदग होत नाही. सवड मिळाली म्हणून जरा घरापासून दूर जात, नेहमीच्या वातावरणा पासून सुटका करून घेत मनोरंजनाची अनुभूती घेणं म्हणजे खरं पर्यटन.

पर्यटनाची कारणे…

अगदी प्राचीन काळापासून पाहिलं तर आदिमानवापासून माणूस कधी एका जागी स्थिर राहिला नाही. अज्ञात अशा स्थळांचा शोध घेत राहिला. नवीन टापू पादाक्रांत करत होता. सिंदबादच्या सफरी किंवा दूरच्या प्रदेशांचे प्रवासवर्णन वाचायला लोकांना आवडतं त्याचं कारण तेच असावं, तिथे कसं असेल याची उत्सुकता मनात असते.

आपल्याला जायला किंवा पहायला नाही मिळाले तर निदान वाचूनतरी कळेल. रामायण-महाभारतकाळातसुद्धा रामाने केलेला वनवासातला प्रवास अगदी श्रीलंकेपर्यन्तचा वाचायला मिळतो तर महाभारतात अज्ञातवासात पांडवांनी केलेली भ्रमंती आणि शेवटी अगदी हिमालयात जाऊन केलेले स्वर्गारोहण वाचायला मिळते. आपल्याकडे समुद्र ओलांडला तर पाप लागतं असं मानलं जात होतं पण इंग्लंड किंवा बाकीच्या देशात लोक शूर दर्यावर्दी होते. ते समुद्रातून वेगवेगळ्या देशांचे शोध घेत होते. त्याचं पर्यवसान म्हणजे आज आपण सर्व जगातले लोक एकमेकांशी जोडले गेले आहोत. हे अर्थात पर्यटनामुळेच साध्य झाले. इंटरनेट, मोबाईल हे नंतर आले.
प्रवास करण्याची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. काही लोकांना धर्माचं वेड असत-ं ते मंदिरं किंवा धार्मिक स्थळांना भेटी द्यायला जातात. यात दुहेरी लाभ होतो. एकतर रोजच्या दैनंदिनीतून सुटका, भक्तिपूर्ण वातावरणात मनाला मिळणारी शांतता. आपल्या भारतीय संस्कृतीत महत्त्व पावलेली तीर्थयात्रेची परंपरा ही म्हणूनच श्रेष्ठ ठरते. अशा यात्रेच्या ठिकाणी समाज एकत्र येतो. सगळे भाविक एकसमान असतात. गरीब श्रीमंत, साक्षर-निरक्षर शहरी-ग्रामीण महिला-पुरुष असा भेद उरत नाही. आपण सारे परमेश्वराचे भक्त आहोत हीच एक भावना असते. समानतेची वागणूक, आत्मिक आनंद, आध्यात्मिक वातावरण आणि बंधुभाव मनाला ताजेपणा देतो. समाजाशी जोडले जातो. सध्या भौतिक सुखांची रेलचेल असली तरी माणसाला आत्मिक सुखासाठी अशा तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात. हे धार्मिक पर्यटन झालं.

सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आपण आंतरिक समाधान हरवून बसलो आहोत. ते मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मध्ये- मध्ये असं धार्मिक स्थळांना भेटी देणं आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळवणं हा उपाय चांगला ठरतो. सर्वच धर्मात अशा पर्यटनाची गरज असते, मुस्लिम मक्का- मदिनाला जातात; ख्रिश्चन रोम, किंवा वेगवेगळ्या चर्चला जातात, शीख गुरुद्वारामध्ये तर हिंदू मंदिरे, धर्मस्थळे यांना भेटी देतात. हा पर्यटन प्रकार बहुतेक भाविक लोक आचरतात.

कधी कामासाठी किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात काहींना देशात- देशाबाहेर प्रवास करावा लागतो, जो आवश्यक असतो. तिथे मनोरंजन होईलच असं सांगता येत नाही पण एक बदल मात्र अनुभवता येतो. काही विद्यार्थी शिक्षणासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात… हेही पर्यटनचं म्हणता येईल. पण हा त्यांच्या गरजेचा भाग असतो. तिथे जाऊन त्याला नवा प्रदेश, नवा टापू पाहायला मिळतो. तिथली माणसे, तिथली भाषा, तिथल्या खाण्यापिण्याच्या पद्धती यात फरक असतोच. त्यातही त्याला वेगळेपणा मिळतो वं तो बदल कधी कधी चांगला ठरू शकतो. कधी-कधी हवापालट म्हणूनही प्रवास केला जातो. प्रदूषणमुक्त आल्हाददायक वातावरणात आणि जोडीला निसर्गरम्य असा परिसर असेल तर मन ताजेतवाने होऊन जाते.

तरुणाईसाठी धाडसी पर्याय…

काही जणांना वेगळं काही साहसपूर्ण करावंसं वाटत असतं. त्याच्यासाठी वेगळे पर्यटन मार्ग असतात- हायकिंग, ट्रेकिंग, बर्फावरचे स्कीईंग, बलून राईड, पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग असे पर्याय त्यांना खुणावत असतात. ते तिथे जाऊन त्याचा आनंद लुटतात, तर काही जणांना इतिहासाच्या पानांमधल्या जुन्या वास्तू, किल्ले, गड, राजवाडे, प्राचीन वस्तुसंग्रहालये साद देत असतात, ते अशा ठिकाणी आपल्या ट्रिप्स अरेंज करतात. तर कुणाला हिमालयातली वेडीवाकडी अवघड वळणे, अनवट वाटा, डोंगर शिखरे यांच्यावर स्वारी करायची असते. कुणाला शुभ्र धवल बर्फाचे डोंगर, त्यावरून घसरत येणार्‍या वाटा.. यावर आईसस्केटिंग करायचं असतं. पण हे सगळे पर्याय हे तरुणाईसाठीचे असतात. काही जणांना समुद्राच्या पाण्यात खोलवर जाऊन समुद्रतळाची रंगबिरंगी दुनिया बघाविशी वाटत असते. पाणबुड्या बरोबर स्कूबा डायविंग करून तीही हौस पूर्ण करता येते. किंवा मासे प्रवाळ पाण्यातल्या गुहा बघणे हेही करता येतं.

कुणाला प्राणी बघायला आवडतात त्यांच्यासाठी अभयारण्याचा फेरफटका मारायची सहल आवडीची ठरते. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर त्यासाठी बरेचदा साऊथ आफ्रिकेच्या जंगल सफारीला जातात. आपल्या आवडीनुसार आपण पर्यटनाचा पर्याय निवडू शकतो. कुणाला साहसी राईड्‌स घ्यायला आवडतात… ते अम्युझिंग पार्कमध्ये तो आनंद लुटू शकतात. हे प्रकार जास्त करून तरुण वर्गातले साहसी वीरच करू जाणे.

सर्वसाधारण पर्यटकांसाठी वेगळे पर्याय असतात. त्यातून रिटायर्ड किंवा वयोवृद्ध लोकांनी टूरकंपनीबरोबर प्रवासाला जाणं जास्त चांगलं. थोडे पैसे जरी जास्त मोजावे लागले तरी बरोबर काळजी घेणारा टूर गाइड व मॅनेजर असतो, चार समवयस्क लोकांची सोबत होते, त्यांच्या वयाप्रमाणे टूरचा प्रोग्राम जास्त दगदग न होणारा, आरामदायक असा ठरवलेला असतो. आजकाल बर्‍याच लोकांची मुले परदेशात आहेत. त्यांच्यासाठी तिथे जाणं हेही एक पर्यटन असतं. तिथे काळजी घेणारी त्यांची मुले असतात, ते त्यांना तिथली सैर घडवून आणतात. शिवाय त्यांना व्हिसा मिळायला प्रॉब्लेम येत नाही. आपल्या मुला-नातवंडांसोबत राहू शकतात. कुणाला समुद्र किनार्‍याची ओढ असते, तिथे जाऊन राहणं, दिवस दिवस भर पाण्यात डुंबणं, ताज्या माश्यांचा आस्वाद घेणं. आमच्या नात्यातले काही लोक नियमितपणे असे समुद्रकिनारी कोकण, सिंधुदुर्ग, गोवा अशा सहली काढत असतात.

प्रवास करायला, फिरायला कुणाला आवडत नाही? नवनवीन देश, प्रदेश पाहणं; तिथली लोकसंस्कृती अनुभवण्यातली मजा काही औरच असते. परदेशी प्रवास गरिबांना किंवा निम्न मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखे नसतात. पण ते स्वप्न उराशी बाळगून, त्यासाठी बचत करून आपली इच्छा पूर्ण करताना दिसतात. अगदी परदेशातच फिरायला जावं असं नाही, आपल्या देशातही खूप विविधता आहे. ती बघायची तर प्रत्येक वेळी वेगळ्या भागात सहल काढायची. नैसर्गिक विविधता ही आपल्या देशाला लाभलेली एक फार मोठी देणगी आहे. हे उगाच भाषणात सांगायचं वाक्य नाही तर खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे. दूरवर पसरलेले विस्तीर्ण असे समुद्र किनारे. हिरवाईने नटलेले प्रदेश, लहान-मोठे धबधबे, झाडांची- प्राण्यांची विविधता, प्रदेशानुसार बदलत जाणारी भाषा, पेहराव, लोकसंगीत, लोकांचं रहनसहन हे सर्व पाहून थक्क व्हायला होतं, कन्याकुमारीपासून हिमाचलपर्यन्त, गुजरातपासून बंगालपर्यन्त कितीतरी प्रेक्षणीय स्थळे आहेत.

प्रवास ः अनुभवाचे नवीन पान

देवाने निर्माण केलेल्या या भूतलावरती अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. देशविदेशाची भ्रमंती करताना ती आपल्यासमोर येतात. त्यातली काही मानवनिर्मित आहेत तर काही नितांत सुंदर अशी निसर्गनिर्मित आहेत. जसं घर म्हणजे नुसत्या दगड-विटांच्या भिंती नसतात तसं पर्यटन म्हणजे निव्वळ भौगोलिक प्रदेशातली प्रेक्षणीय स्थळे पाहणं इतकंच उद्दिष्ट नसतं. प्रवासात इतिहासकाळात माणसाने रचलेले कर्तृत्वाचे इमले आणि त्याने केलेला पराक्रम यांची त्याला जोड असते. भौगोलिक प्रदेशाबरोबर तिथल्या मानवी जीवनाचे दर्शनही घडत असते. प्रत्येक वेळी आपल्या अनुभवाच्या गाठोड्यात भर पडत असते, नवे ज्ञान मिळत जाते.

असा प्रवास करताना तुमच्या मन:चक्षूंची कवाडे उघडी ठेवली पाहिजेत आणि नवीन जे बघायला मिळतं त्याची नोंद मनाशी करायला पाहिजे तर प्रवासाचा हेतू साध्य होतो. नवीन माणसे, नवीन सहप्रवासी भेटतात. त्यातला कोण कुठे कसा आपल्या मनाच्या कवाडातून प्रवेश करेल सांगता येत नाही. मात्र त्याची ती भेट अविस्मरणीय ठरते कारण पृथ्वी जरी गोल असली तरी ती व्यक्ती पुन्हा भेटेलच असं सांगता येत नाही.

प्रवास करणं मला आवडतं याची कारणं बरीच आहेत. प्रवास आपल्याला घडवतो, तो आपल्याला शिकवतो. तो आपल्याला प्रेरणा देतो. त्याच्यामुळे संकुचितपणा नाहीसा होतो, आपल्याला नवी ओळख मिळते, स्वत:ची आणि जगाची. मग प्रवास कुठलाही असो, कुठेही असो, कधीही असो तो एंजॉय करता आला पाहिजे. तो चालत असेल, कारने अथवा बसने असेल, ट्रेनने असेल, विमानाने असेल, ट्राम, घोडागाडी किंवा अगदी बैलगाडीने असेल, गजबजाटातला असेल किंवा एकांडा असेल, निसर्गरम्य प्रदेशातला असेल किंवा ओसाड वाळवंटी मरुभूमीतला असेल… प्रत्येक प्रवास एक नवीन अनुभवाचे पान लिहून तुमच्या आयुष्याच्या डायरीला जोडत असतो. पुन्हा तिथे जायला मिळणं हे दुरापास्त असतं. त्यामुळे तो क्षण मनात टिपून ठेवायचा असतो. मग तो नायगरा धबधब्याचा प्रपात असो. चीनची अजस्त्र भिंत, ग्रेट बुद्धा असो, ज्यू लोकांची संहार छावणी, चीनची फास्ट मॅग्नेट ट्रेन, स्वीत्झर्लंडचा प्रचंड लांब बोगदा, जमिनीच्या आतल्या खोल मिठाच्या खाणी, चांदीच्या खाणी, खोल जमिनीच्या आतली घरे, कॅ पडोसीया, रशियातली म्युझियम, रेड स्वेयर मधली मोदकाच्या आकाराचे कळस असलेली चर्चेस. इजिप्तचे पिरॅमिड, स्पिंक्स, अमेरिकेतली गोल्डन ब्रिज, युरोप मधले स्थापत्य… हे सारे आठवणीच्या संग्रही जपून ठेवले आहे.

सर्वत्र भीतीचे सावट

गोवा हे देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. लोक जिथे निसर्गसंपन्नता, शांतता, सुरक्षितता आहे अशा ठिकाणी जाऊन सुट्टी घालवणं पसंत करतात आणि त्या दृष्टीने गोवा त्यांना यथार्थ वाटतो. पण सध्याच्या या कोरोनाच्या संकटामुळे कुणीही प्रवास करण्याच्या मन:स्थितीत नाही आणि सरकारनेही रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रवासबंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रात आर्थिक मंदी आली आहे. तशी ती सर्वच क्षेत्रात आली आहे पण पर्यटन हा मुळात प्रवासावर चालणारा बिझनेस असल्याने त्यावर जास्त परिणाम झालाय. प्रवास साधने पुन्हा पूर्ववत सुरू व्हायला वेळ लागेल आणि जोपर्यंत कोरोंनावर लस यशस्वीरीत्या सापडत नाही तोपर्यंत लोक घाबरून जिवाच्या भीतीने प्रवास करणं टाळतील. आम्ही ज्या टुरकंपनीबरोबर टुरला गेलो किंवा जातो त्या सगळ्या ठप्प पडल्या आहेत. त्यांच्याकडे तरुण स्टाफ, मॅनेजर, ऑफिसमधले असे शेकडो लोक कार्यरत असलेले मी पाहिले होते. देशात, देशाबाहेर राहून काम करत होते. त्यांच्यावर आर्थिक कुर्‍हाड कोसळली आहे. बर्‍याच उद्योगधंद्यात मंदी आल्याने लोकांच्या हातात काम नाही. आर्थिक चणचण आहे. अशावेळी प्रवास करण्याचे कुणाच्या मनातही येणार नाही. खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत आहेत. जोपर्यंत कोरोंनाची भीती लोकांच्या मनातून जात नाही तोपर्यंत या व्यवसायात पुन्हा भरभराट येणार नाही. कितीही सुरक्षितता बाळगली, सॅनिटायजर वापरले, कोरोंना निगेटिव्ह टेस्ट कंपल्सरी केली, मास्क, ग्लोव्हज वापरले तरी कोरोंना होणारच नाही अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे या उद्योगाला चालना तेव्हाच मिळेल जेव्हा सगळे आलबेल होईल.