कावळ्याची शिकवण

0
345
  • पल्लवी भांडणकर
    फोंडा

कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली आणि हवी तेवढीच लाकडं वेचत होता. प्राणिमात्रांना बोलता आलं असतं तर काही गोष्टी त्यांनी आपल्याला पटवून दिल्या असत्या.

बदली वर्गातला तो तास आजही आठवतो. शाळेतल्या मागच्या बिल्डिंगमधल्या अगदी शेवटच्या वर्गात मला जायला सांगितलं. एका कोनाड्यात वर्ग असल्यामुळे मुलं अगदी स्वच्छंदपणे बागडत होती. इतर वर्ग शिक्षकांची तिथे जास्त ये-जा नसल्याने ती मुलं खरंच अगदी आनंदी होती. असाच एक कोनाड्यातला वर्ग आणि त्यात केलेली धमाल.. मीही कधी काळी अनुभवली आहे. माझ्या शाळेतील एका कोनाड्यात आमचा सहावीचा वर्ग होता. ते वर्ष आणि त्या आठवणी घट्ट काळजात रुतून राहिल्या आहेत. सुरश्री केसरबाईं केरकरांच्या शाळेत, शाळेत म्हणण्याऐवजी आम्ही त्यांच्या राजवाड्यात शिकलो. शिकलो काय घडलो. आणि शिक्षिका झाल्यानंतर त्यादिवशीचा तो बदली वर्गदेखील तसाच एका कोनाड्याच्या सहावीच्या वर्गात होता. किती सुंदर योगायोग होता. वर्गातील वातावरण पाहून त्या इवल्याशा मुलांना ओरडणं मला त्या दिवशी जमलंच नाही. ‘टिचर आम्ही न बोलता खेळू का?’.. असा निरागस पण खट्याळ प्रश्‍न त्यांनी विचारला. आणि मीही पटकन ‘हो’कार दिला व ‘नक्की पण जास्त आवाज नको हं’, असा इशारा दिला. सगळी मुलं आपापसात रमून गेली. कोणी ड्रॉइंग, कोणी भेंड्या तर कोणी नवीन असा खेळ – स्टोन, पेपर, सिजर खेळत होतं. दहा मिनिटं त्यांना निरखत असतानाच माझं लक्ष दाराजवळच्या एका आंब्याच्या झाडावर गेलं.

मी दारासमोर अगदी अलगद येऊन उभे राहिले. आजूबाजूला असलेल्या वर्गात सर्वत्र शांतता होती. अचानक त्या झाडावर एक कावळा आला. त्या कावळ्याला निरखून पाहिलं. तो आपलं घरटं बांधण्यासाठी त्या झाडावरील एक लाकूड अगदी बारकाईने निरखून तोडत होता. झाडाच्या प्रत्येक फांदीवर जाऊन आपल्या टोकदार चोचीतून प्रत्येक सुकलेली इवली इवली लाकडं गोळा करत होता. आणि हे पाहत असताना चट्‌दिशी मनात विचार आला हा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली आणि हवी तेवढीच लाकडं वेचत होता. प्राणिमात्रांना बोलता आलं असतं तर काही गोष्टी त्यांनी आपल्याला पटवून दिल्या असत्या. लाकडं निवडताना त्यानं कधीही झाडाच्या एका पानालाही त्रास दिला नाही. हिरव्यागार झाडाच्या अन्य कुठल्याच भागाला आपल्या टोकदार चोचीनं हैराण केलं नाही. आणि पाहता पाहता तो जमवलेली लाकडं घेऊन निघूनही गेला. किती शिकवून गेला त्या दिवशी तो कावळा. वरवर हे दृश्य आपण रोज पाहिलं असेल कदाचित. पण त्यादिवशी मनात विचार आला की का नाही माणूस असा विचार करत? आपल्या हव्यासापोटी नको असतानासुद्धा का माणूस स्वार्थ ठेवतो. इवल्याशा फळाला तोडताना का तो पूर्ण झाडाला त्रास देतो? का एका कावळ्याला असलेली दिव्यदृष्टी विचारवंत माणसाला नसावी? का आपण एवढे अविचारी बनलोय? ते दृश्य मनात खोलवर रुतले आणि तेवढ्यात मला त्या झाडाकडे एकटक पाहताना टिचर बेल वाजली… असं म्हणत एक चिमुरडी माझ्या समोर आली. मी ते दृश्य मनात साठवत दुसर्‍या वर्गात गेले. काळा काळा कावळा खरा पण त्यादिवशी गोर्‍या म्हणजेच स्वच्छ मनाचा संदेश देऊन गेला. पुढे कित्येक आठवडे मी व्हॅल्यू एडूकेशनच्या तासाला त्या काळ्या कावळ्याचा गोरा गोरा संदेश मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला….