>> एकूण रुग्णसंख्या ३० हजारांपार
राज्याने कोरोना पॉझिटिव्ह एकूण रूग्णाचा ३० हजाराचा टप्पा काल पार केला आहे. राज्यात नवे ६७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३० हजार ५५२ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५८२२ एवढी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या ३८३ एवढी झाली आहे.
सातजणांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ सुरूच असून कोरोना रुग्णाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला. त्यातील गोमेकॉमध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ईएसआय इस्पितळामध्ये २ रुग्णाचा मृत्यू झाला. एका रुग्णाचा म्हापसा येथील आझिलो इस्पितळात मृत्यू झाला आहे.
वास्को येथील ५३ वर्षाचा पुरुष रुग्ण आणि शिवोली येथील ८३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ १० मिनिटांत निधन झाले आहे. ताळगाव येथील ५७ वर्षांची महिला, वास्को येथील ७९ वर्षांचा पुरुष, कारापूर तिस्क येथील ७६ वर्षांचा पुरुष रुग्ण, फातोर्डा येथील ७० वर्षांचा पुरुष रुग्ण, कुडतरी येथील ४० वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.
४९० कोरोनामुक्त
चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ४९० रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४ हजार ३४७ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ४२७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. तसेच इस्पितळामध्ये नवीन २४६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
पणजीत नवे ३९ रुग्ण
पणजी शहर उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे ३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील कोरोना रुग्णांची संख्या ३५५ झाली आहे. आल्तिनो, कांपाल, करंजाळे, मिरामार, रायबंदर, दोनापावल, पणजी शहर, चर्च चौक परिसर, चिंचोळे, टोक, नेवगीनगर-मळा, सांतइनेज आदी भागात नवे रुग्ण आढळून आले आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील बर्याच खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २३९ खाटा आणि दक्षिण गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ५१३ खाटा रिक्त आहेत.
बार्देशात सर्वाधिक ११९७ बाधित
सध्याचे कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण बार्देश तालुक्यात ११९७ एवढे आहेत. राज्यात कोरोनाचा फैलावाला सुरुवात झालेल्या मुरगाव तालुक्यात ७५३ रुग्ण आहेत. डिचोली तालुक्यात – ७२५, पेडणे – ३३५, तिसवाडी – ७९८, सत्तरी – २५२, बार्देश – ११९७, सासष्टी ७०५, सांगे – ८७, केपे – २५८, मुरगाव – ७५३, फोंडा – ४७२, धारबांदोडा – १३०, काणकोण १०९ अशी तालुकावार सध्याची रुग्णसंख्या आहे.