कृषी विधेयकांविरोधात कॉंग्रेसचा सोमवारी राजभवनावर मोर्चा

0
294

>> राज्यपालांकडे निवेदन देणार

गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारच्या तीन कृषी दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असून येत्या सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी दोनापावल येथे राजभवनावर मोर्चा नेऊन कृषी दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन सादर केले जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

केंद्र सरकारने कृषी दुरुस्ती विधेयके सादर करताना लोकशाही पद्धतीचा अवलंब केलेला नाही. कॉंग्रेस पक्षाने या विरोधात देशपातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून गोवा प्रदेश समितीने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींसमोर शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडून दुरुस्ती विधेयके मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे.

येत्या २६ सप्टेंबरला आयोजित सोशल मीडियावरील स्पीक फॉर फार्मस या ऑनलाइन कार्यक्रमात गोव्यातील कॉग्रेसचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

दि. २८ रोजी संध्याकाळी ३.३० वाजता दोनापावल येथील राजभवनावर मोर्चा नेऊन राष्ट्रपतींना सादर करण्यासाठी एक निवेदन राज्यपालांना सादर केले जाणार आहे. हा मोर्चा सामाजिक अंतर व सुरक्षा उपाय योजनांचा अवलंब करून काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये नवनियुक्त गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव सहभागी होणार आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले.
२ ऑक्टोबरला गांधी व शास्त्री जयंतीच्या दिवशी जिल्हा व गट पातळावर शेतकरी व कामगार दिन पाळला जाणार आहे. १० ऑक्टोबरला सांगे तालुक्यातील रिवण येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याचे चोडणकर म्हणाले.

शेतकर्‍यांना फटका बसेल ः कामत

राज्यसभेत कृषी दुरुस्ती विधेयके लोकशाही पद्धतीने संमत करण्यात आली नाहीत. या विधेयकांमुळे शेतकरी वर्गाला मोठा फटका बसणार आहे. नवीन दुरुस्तीमुळे शेतकर्‍यांची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदे, बटाटे, डाळ, तेल आदी वगळण्यात आल्याने दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. तसेच साठेबाजी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. या कृषी दुरुस्ती विधेयकांना सर्व थरातून विरोध करण्याची गरज आहे, असेही कामत यांनी सांगितले.