>> विरोधकांचा गदारोळ, विधेयकाची प्रत फाडली
काल राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषिविषयक विधेयके मंजूर करण्यातआली. विरोधकांनी केलेल्या गोंधळातच आवाजी मतदान घेण्यात आले व ही विधेयके मंजूर झाली. मंजूर केलेल्या विधेयकांत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी यांचा समावेश आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयके मांडली. यावेळी विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालत पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी सभागृहाच्या मध्यापर्यंत येत धक्काबुक्की केली. विरोधी सदस्यांनी विधेयकाची प्रत फाडून टाकली. उपसभापतींच्या समोर लावण्यात आलेले माईकही तोडले. मात्र या सर्व गदारोळात आवाजी मतदान घेत विधेयके मंजूर करण्यात आली.
या गोंधळाची राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी गंभीरतेनं नोंद घेतली असून सभागृहात गोंधळ घालणार्या आणि धक्काबुक्की करणार्या विरोधी पक्षाच्या खासदारांविरोधात ते कडक कारवाई करण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींसोबत तातडीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षांकडून राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
पंजाब-हरियाणात आंदोलन
राज्यसभेत कृषिसंबंधी विधेयकांना पंजाब आणि हरिणायात मोठ्या प्रमाणात विरोध होत असून काल अंबाली-मोहाली राष्ट्रीय महामार्गावर शेतकर्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा करत त्यांना रोखले. शेतकर्यांनी दुपारी १२ ते ३ दरम्यान महामार्ग अडवण्याचा इशारा दिला होता.
पंतप्रधानांची ग्वाही
या विधेयकांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शेतकर्यांना ‘एमएसपी’बद्दल ग्वाही दिली. पंतप्रधानांनी एमएसपी व्यवस्था कायम राहील. सरकारी खरेदी कायम राहील. आम्ही इथे शेतकर्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य होईल तितके प्रयत्न करू, असे सांगितले. ही विधेयके मंजूर झाल्यामुळे शेतकर्यांना भविष्यातील तंत्रज्ञान सहजपणे पोहोचणार आहे. त्यामुळे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे मोदींनी म्हटले आहे.