राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ६४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच कोरोना पॉझिटिव्ह ८ रुग्णांचे गेल्या चोवीस तासांत निधन झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६,७८३ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५६१२ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३२७ एवढी झाली आहे.
आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. राज्यात आणखी आठ जणांचा मृत्यू झाला असूत त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू केवळ १२ तासांत झाला. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ६ आणि मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला. ताळगाव येथील ६५ वर्षांची महिला, सांगोल्डा येथील ८८ वर्षांचा पुरुष, पर्वरी येथील ८८ वर्षांची महिला, काणका-वेर्ला येथे ४५ वर्षांचा पुरुष, डिचोली येथील ८० वर्षांचा पुरुष, करंजाळे येथील ५७ वर्षांचा पुरुष, कुडतरी येथील ७७ वर्षांचा पुरुष आणि कासावली-सासष्टी येथील ६० वर्षांच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले. कासावली येथील रुग्णाला इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ पावणेपाच तासांत मृत्यू झाला तर, काणका वेर्ला येथील रुग्णाचा इस्पितळात दाखल केल्यानंतर १० तासांत मृत्यू झाला. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत केलेल्या १९२५ स्वॅबच्या नमुन्यांत ६४४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इस्पितळ आयसोलेशनमध्ये नवीन २०२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
३९९ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ३९९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २०,८४४ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ३५६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. आत्तापर्यंत होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १०,९२९ एवढी झाली आहे.
पणजी परिसरात ३४१ कोरोना रुग्ण
पणजी उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून आत्तापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ३४१ एवढी झाली आहे. पणजी परिसरात सर्वत्र कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गुरूवारी पणजीमध्ये नवे ३५ रुग्ण आढळून आले आहेत. आल्तिनो, सांतइनेज, रायबंदर, टोक, करंजाळे, भाटले, बॉक द व्हॉक, मिरामार, नेवगीनगर-मळा आदी भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
पेडणे तालुक्यात एका दिवसात १२३ बाधित
पेडणे तालुक्यात काल दिवसभरात १२३ कोरोनाबाधित सापडले आहेत. यातील मोपा विमानतळ क्षेत्रात तब्बल १०९ बाधित सापडले आहेत. यामुळे पेडणे तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १०४८ वर पोहोचला आहे.