- प्राजक्ता प्र. गावकर
(नगरगाव-वाळपई)
गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर जी गाणी मनाला तृप्ती देतात, ज्या गाण्यांमुळे मन आनंदित होतं… अशी गाणी श्रवण करायला चांगली वाटतात. पूर्वीच्या गाण्यांमध्ये मंद संगीत असायचे. गाण्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असायचे. साहजिकच ती गाणी लवकर पाठ होत असत.
गाणी आवडत नाहीत अशी व्यक्ती विरळच. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच गाणी आवडतात. गाण्यांमुळे ताण निघून जातो. मन आनंदित होते. लहान मूल खूप रडते त्यावेळी जर गाणी लावली तर ते मूल रडायचे थांबल्याचे पाहायला मिळते.
डॉक्टर लोक शस्त्रक्रिया करताना मंद संगीत लावतात. दूरच्या प्रवासात बसमध्येसुद्धा गाणी लावतात. एकूण काय तर संगीताने म्हणजेच गाण्यामुळे मनाला शांती-स्फूर्ती मिळते. आपण एखादे वेळेस घरात कामं करताना रेडिओवर गाणी ऐकता ऐकता कामं केल्यास ती कामं सहजरीत्या होऊन जातात. लवकर पूर्ण होतात, हा माझा अनुभव आहे. मला लहानपणापासून गाणी ऐकण्याची व म्हणण्याची आवड आहे.
पण गाणे म्हणणे हे तितकेसे साधे काम नाही. कारण त्याचे सूर, ताल, आलाप सर्व व्यवस्थित जमायला हवे. उगाचच गायचे म्हणून गायचे भेसूर आवाजात तर ते गाणे होतच नाही.
एकदा एका ठिकाणी गाण्याची मैफल होती. तिथे व्यासपीठाच्या समोरच खुर्च्या टाकून बसण्याची सोय केली होती. त्यामुळे श्रोतृवर्गही मोठ्या प्रमाणात होता. व्यासपीठावर एक गायिका आपल्या बेसूर आवाजात गात होती. समोरच बसलेल्या श्रोत्यांपैकी एकजण आपल्या मित्राला म्हणाला, ‘‘काय भंगार भावगीत आहे’’. ते ऐकून त्याच्या मित्राच्या पलीकडे बसलेला एक माणूस म्हणाला, ‘‘मी त्या भावगीताचा कवी आहे.’’ त्याबरोबर स्वतःला सावरत पहिला माणूस म्हणाला, ‘‘नाही म्हणजे भावगीत तसे काही वाईट नाही, पण त्या भवानीचे उच्चारच समजत नाही.’’
त्यावर तो पलीकडे बसलेला माणूस म्हणाला, ‘‘ती माझी पत्नी आहे.’’ यावर तो पहिला माणूस सर्दच झाला. बोला. बायकोला म्हणायला लावले तर ते अर्थ नसलेले गीत सर्वजण गपगुमान ऐकून घेणार असे त्या गृहस्थाला कसे काय वाटले बरे! आहे की नाही गंमत.
असाच आणखी एक प्रसंग घडला. गीतगायनाची मैफल होती. अर्थात श्रोतृवर्ग तुडुंब भरला होता. मंचावर एक गायक गात होता. ‘‘आकाश पांघरोनी, जग शांत झोपले हे, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे..’’ किती सुंदर भावगीत! पण ऐकणार्याला काय ऐकू येत होते तर… ‘‘…. घेऊन एक थाळी खातो कबीर पोहे…’’ पहा, पहा शब्दाचा, अर्थाचा अनर्थ करून गायिलेले गीत गीत होते का? आणखी एक गाणे… ‘‘झुलतो बाई रास झुला’’. वास्तविक पाहता किती सुंदर गाणे, पण गाणार्या गायिकेच्या शब्दांचा ताळमेळ जमेना नि ते गाणे ऐकणार्यांना असे ऐकू येत होते, ‘‘गातो बाई रात किडा’’!
शब्दोच्चारच ठीक नाहीत तर ते गीत कळणार तरी कसे? गाणे म्हणणे ही एक दैवी कला आहे. ती अगदी सहजपणे कुणालाही अवगत होऊ शकत नाही. त्या कलेचा जो पुजारी असतो तोच ही कला उत्कृष्टरीत्या सादर करू शकतो, पण तेही त्याचा अभ्यास केल्यानेच. आपल्या देशातल्या थोर गायिका… लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, अनुराधा पौडवाल… अशा कितीतरी गानकोकिळा आहेत, ज्यांच्या आवाजातली गाणी ऐकताना भान विसरायला होते.
पण कोणत्याही गोष्टींचा अतिरेक शेवटी वाईटच. आजकाल तरुणवर्ग कानात हेडफोन घालून गाड्या चालवतात. त्यावर संभाषण किंवा गाणी ऐकतात. त्या हेडफोनमुळे मग अपघाताला आमंत्रण देतात. एकतर स्वतःचा जीव देतात किंवा दुसर्याचा घेतात. आवड अशी असावी की जी कधी संपूच नये, पण त्याचा अतिरेक मात्र नको.
गाण्यांबद्दल बोलायचं झालं तर जी गाणी मनाला तृप्ती देतात, ज्या गाण्यांमुळे मन आनंदित होतं… अशी गाणी श्रवण करायला चांगली वाटतात. पूर्वीच्या गाण्यांमध्ये मंद संगीत असायचे. गाण्यांचे शब्दोच्चार स्पष्ट असायचे. साहजिकच ती गाणी लवकर पाठ होत असत. नाहीतर हल्लीची गाणी..! ढाण ढाण वाद्यांचाच आवाज ऐकून जीव वर जातोय का खाली हेच कळत नाही!!
मंद… संथ… संगीत हे मनाला आल्हाद देणारे असते. ‘‘तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे…’’, या गाण्याची रचना, सूर, ताल फार सुंदररीत्या बसवलेली आहे जी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
आता तर ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाद्वारे चांगली चांगली गाणी ऐकण्याची पर्वणीच आली आहे. तसेच पूर्वी चालत असलेला ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ कार्यक्रम मी कधीही चुकवीत नसे. मराठीतला ‘ताक धिना धिन्’ हासुद्धा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम होता. रेडिओवर संध्याकाळी मराठी गाणी लागत ‘सांजधारा’ न चुकता ऐकायची मी. इतके गाण्याचे वेड!
गाणी गुणगुणत घरातील काम केल्याने, आपण घरात एकटेच आहोत, ही भीतीच निघून जाते. कुणीही गात असतो तेव्हा त्याच्या आवाजाबरोबरच तुम्हाला दुसरा एक आवाज ऐकू येत असतो, तो आवाज दुसर्या कुणाचा नसून तुमचाच असतो.