रसराज स्मरण

0
363
  • जनार्दन वेर्लेकर

कार्यक्रमाची सांगता पंडितजींच्या ध्वनिमुद्रित भजनाने झाली. त्यांची छबी न्याहाळीत असताना त्यांची भावमुद्रा श्रीकृष्णचरणी तादात्म्य पावलेली भासली. आभासी वास्तवाची – सत्याची ही सफर लक्षावधी रसिकांच्या हृदयगाभार्‍यात रसराजांना अमरपद प्राप्त झाल्याची निजखुण पटवणारी.

गेल्या रविवारी संध्याकाळी ठीक ६.३०वाजता बैठक मांडून तब्बल चार तास सोळा मिनिटें, सोळा सेकंद मी एका अविस्मरणीय शब्द आणि स्वर मैफलीचा श्रवणानंद लुटला. ही श्रद्धांजलीपर मैफल गेली ४३ वर्षे भारतीय शास्त्रीय संगीताची अहर्निश सेवा करणार्‍या संस्थेने यू-ट्यूब चॅनलवर आयोजित केली होती. या संस्थेचे नाव स्पीक मॅके (डझखउ चअउअध) अर्थात सोसायटी फॉर द प्रोमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग्‌स्ट युथ. या नावावरून संस्थेचा जन्म आणि उद्देश युवापिढीमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृती यांच्याबाबत आवड, समज आणि अभिरुची निर्माण करणे यासाठी झालेला आहे, हे सहज लक्षात यावे. राजेश नाईक या माझ्या सहकार्‍याने मला या कार्यक्रमाची सहज लिंक पाठवली म्हणून मला माझ्या सुट्टीची संध्याकाळ सत्कारणी लावता आली, याबद्दल मी त्याचा ऋणाईत आहे. कार्यक्रम आभासी (व्हर्च्युअल) असल्यामुळे या क्षणापर्यंत जगभरातील पंडितजींच्या मोजून १,९१,३९४ चाहत्यांनी या कार्यक्रमाचा श्रवणानंद लुटला आहे. पंडितजींच्या अफाट लोकप्रियतेचे हे गमक. विज्ञान- तंत्रज्ञानामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही ऋषिमुनींची उदात्त कल्पना सगुणसाकार झाली ती अशी. श्रवणानंदाची ही पर्वणी सर्वांसाठी खुली- उपलब्ध आहेच. मात्र तुमची उत्सुकता चाळवण्यासाठी – वाढवण्यासाठी या लेखाचे प्रयोजन.

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खास पत्र पाठवून या कार्यक्रमाला शुभेच्छा तर दिल्याच, शिवाय जगभरातील संगीत प्रेमींना भारतीय शास्त्रीय संगीताची गोडी लागावी यासाठी त्यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत अभियान चालवले याची कृतज्ञ नोंद करून पंडितजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या या पत्राचे वाचन करण्यात आले. भारताचे कायदा तसेच विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री श्री रवीशंकर प्रसाद यांनी या कार्यक्रमात सुरुवातीलाच… ‘पंडितजींमुळेच मी शास्त्रीय संगीताकडे विद्यार्थीदशेतच आकृष्ट झाल्याचे सांगून उत्तरोत्तर त्यांच्या मैफलींच्या मागावर राहायला लागलो व हा सिलसिला जारी राहिला…’ या शब्दांनी पंडितजींना शब्दसुमने वाहिली.

पं. शिवकुमार शर्मा यांनी ‘भारतीय कंठसंगीताचा अखेरचा युगपुरुष’ हरपल्याची हळहळ व्यक्त केली. ‘१०५५मध्ये आमची मुंबईत पहिल्यांदा गाठ पडली. तिथे कावसजी जहांगीर सभागृहामध्ये स्वामी हरिदास संगीत संमेलनामध्ये आम्ही संध्याकाळी मैफली सादर केल्या. आमची मैत्री बहरली. २००५ मध्ये आम्ही आमच्या मैत्रीचा खास सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्याबाबत त्यांनीच पुढाकार घेतला नव्हे हट्ट धरला. असे निर्व्याज प्रेम मला त्यांच्याकडून मिळाले. १३ ऑगस्टला आम्ही फोनवर शेवटचं बोललो तेव्हा ते न्यू जर्सीला अमेरिकेत तर मी मुंबईत होतो. आता स्वर्गलोकांत- देवलोकांत ते मैफली रंगवत असतील. यात मी अतिशयोक्ती करीत नाही. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली’.

पं. हरिप्रसाद चौरासिया आपल्या एका शिष्येसमवेत सामोरे आले. वैष्णव जन तो तेणे कहीये… हे भजन आळवून नंतर हुरहुर लावणार्‍या मारवा या रागाच्या आर्त सुरांनी त्यांनी पंडितजींना निःशब्द- निर्गुण भावांजली वाहिली. प्रख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग यांनी पंडितजींच्या एका २५-३० वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा दिला. ‘एकदा पंडितजींचे वडील बंधू पं. मणीरामजी व पं. जसराजजी दिल्लीत माझ्या घरी दुपारी जेवायला आले होते. दिवस नवरात्रोत्सवाचे. पं. मणीरामजींनी कलकाजी मंदिरात जायची इच्छा प्रदर्शित केली. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होतं. बाहेरूनच दर्शन घेताना दोन्ही बंधुराज मोकळ्या गळ्याने ‘माता कालिका’ हे भजन आळवायला लागले. नंतर खंबावती राग आळवला. स्वरानंदी आमची तंद्री लागलेली असताना मंदिराचे दरवाजे कुणी आणि केव्हा उघडले याचा आम्हाला अचंबा वाटत राहिला. पंडितजींचे गाणे लाघवी, नजर मादक- स्त्रियांनाच काय पुरुषांनाही घायाळ करणारी. असा कलाकार पुन्हा होणे नाही’.

विश्वविख्यात व्हायोलीनवादक डॉ. एल्. सुब्रमण्यम् हे पंडितजींच्या आठवणीत हरखून गेले. ‘आम्ही एकत्रित कार्यक्रम केले. मी आयोजित केलेल्या लक्ष्मीनारायण म्युझिक फेस्टिवलमध्ये ते आनंदाने सहभागी झाले. देशाच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी संगीतबद्ध केलेल्या एका खास कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होता. ‘वैष्णव जन तो तेणे कहीये’.. हे भजन या कार्यक्रमात ते गायले. एकप्रकारे माझ्यासाठी तो कौटुंबिक कार्यक्रम होता. माझी पत्नी कविता, मुलगी एवढेच नव्हे तर नातही या कार्यक्रमात सहभागी होती. पंडितजींच्या अपूर्व सहकार्यामुळे माझ्या मनाला धन्यता वाटली. मी कायम त्यांच्या गायनाने मंत्रमुग्ध होत असे. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचा आवडता राग सरसांगी मी सादर करीत आहे’..या शब्दांनी त्यांनी पंडितजींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी व्हायोलीनवर आळवलेला सरसांगी ऐकताना मी अक्षरशः भावविभोर झालो. हिंदुस्थानी संगीत- कर्नाटकी संगीत हे भेदाभेद लयाला गेले. कर्नाटकी सरसांगी तो आपला सुपरिचित नटभैरव, असं काही भव्योदात्त ऐकायला मिळतं तेव्हा हा आनंद अनिर्वचनीय – वर्णनापल्याडचा असतो. तिथे शब्द बापुडे, केविलवाणे ठरतात.
जगप्रसिद्ध घटम्‌वादक विद्वान विक्कु विनायकराम आणि त्यांचे दोन सुपुत्र (खंजिरावादक) यांनी आपल्या तालवाद्य मैफलीने सर्वांना अचंबित केले. बापुजींचे आम्हाला आशीर्वाद लाभावेत, या शब्दांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली व मग उत्तरोत्तर त्यांची धुव्वाधार मैफल रंगत गेली. शिवतांडव, साडेसात मात्रांचा ताल, गुरुवंदना, ‘सुब्रमण्याय स्वामीनाथाय चंद्रशेखर विराजे भाली नमस्ते नमस्ते’ या पढंतीने त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली.

देशातील एक नामवंत उद्योगपती अरुण भरत राम (हे पं. रवीशंकर यांचे शिष्य) यांनी पंडितजींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या सहवासाची, मैफलींच्या आठवणींची सय जागवली. ‘चेन्नई येथे थिऑसॉफिकल सोसायटीतर्फे आयोजित मैफलीत पंडितजी असे गायले की काळवेळ, पावसाचा ससेमिरा विसरून रसिक धुंद झाले’, ही त्यांची आठवण पंडितजींच्या अफाट लोकप्रियतेचे रहस्य उलगडून गेली.

पं. बिरजू महाराज हे कथ्थक सम्राट. ‘मुंबई, बनारस, दिल्ली, अमेरिका, इटली इथे आमच्या मैफली झाल्याचे सांगून पंडितजींच्या गाण्यातील भक्तिभाव, समर्पणभाव त्यांच्या आध्यात्मिक पिंडाचा द्योतक होता. ते देवलोकातही मैफली रंगवीत राहतील यात शंका नाही’.. या शब्दांनी त्यांनी पंडितजींना श्रद्धांजली वाहिली.
प्रख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांनी पंडितजींना आदरांजली वाहिली. ‘१९६० साली मी १४-१५ वर्षांची चिमुरडी होते. तेव्हापासून मी त्यांचे गाणे ऐकत आले. पहिल्यांदा मी त्यांना बनारसला पाहिले. अल्लातालाची त्यांच्यावर मेहेरबानी होती. यश, कीर्ती. मानमरातब आणि जगातील रसिकांचे उदंड प्रेम त्यांना लाभले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.’

प्रख्यात कथ्थक नृत्यांगना उमाजी शर्मा – ‘एकदा पंडितजी आणि मी दिल्ली – बनारस रेल्वे प्रवासात एकत्र होतो. खूप जुनी गोष्ट. पाण्याबरोबर एक गोळी घेताना त्यांनी मला पाहिले. प्रवासात मला झोप लागत नाही म्हणून ही गोळी मी घेते. त्यावर त्यांनी मला फटकारले. चुकूनही यापुढे ही गोळी घ्यायची नाही. मी त्यांची आज्ञा मानली. नंतर आयुष्यांत एकदाही ती मोडली नाही. आज ते नाहीत. त्यांच्या अशा कैक आठवणी आहेत. त्यांना माझी श्रद्धांजली.’
पंडितजींचे शिष्य रतन मोहन शर्मा- ‘कुंजबिहारी हारी रे.. ही बंदीश ते गायले. राग शुद्ध बराडी. बापुजींना त्यांची हीच सांगीतिक श्रद्धांजली. प्रख्यात ओडिसी नृत्यांगना माधवी मुद्गल यांनी गीतगोविंद काव्यांतील एक अष्टपदी नृत्यांतून सादर केली व पंडितजींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे पती गायक मधुप मुद्गल यांनी स्तोत्र आळवून पंडितजींना श्रद्धांजली वाहिली.
स्पीक मॅकेचे राव रोहित सिंग सेंट सान फ्रान्सिस्को, अमेरिका येथून बापुजींबद्दल बोलताना सद्गदित झाले. डॉ. सुधा रघुनाथन कर्नाटक शैलीच्या प्रख्यात गायिका, अन्नमाचार्य यांची कृती आपल्या भावपूर्ण गायकीतून सादर करून त्यांनी बापुजींना श्रद्धांजली वाहिली. परमात्म्याशी मीलन ही पंडितजींची इच्छा आता फलद्रूप झाल्याचे सांगून त्यांनी आपली श्रद्धासुमने वाहिली.

पं. राजन मिश्रा – पं. साजन मिश्रा यांनी पंडितजींना प्रिय कौसी कानडा राग आळवून या रसोत्कट मैफलीची सांगता केली. राजन के सिरताज राजा रामचंद्र… ही त्यांची बंदीश तबलासाथीची उणीव भासू न देणारी- बुलंद गायकीने विनटलेली होती.

कार्यक्रमाची सांगता पंडितजींच्या ध्वनिमुद्रित भजनाने झाली. त्यांची छबी न्याहाळीत असताना त्यांची भावमुद्रा श्रीकृष्णचरणी तादात्म्य पावलेली भासली. आभासी वास्तवाची – सत्याची ही सफर लक्षावधी रसिकांच्या हृदयगाभार्‍यात रसराजांना अमरपद प्राप्त झाल्याची निजखुण पटवणारी.