राज्यात ६३६ रुग्णांचा उच्चांक, १० मृत्यू

0
179

>> कोरोनामुळे बळींचे द्विशतक, सध्याचे रुग्ण ४३७९

राज्यात चोवीस तासात उच्चांकी ६३६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळीच्या एकूण संख्येने दोनशेचा टप्पा पार करून २०४ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८,६४२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४३७९ एवढी झाली आहे.

ऑगस्टमध्ये १४७ मृत्यू
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. चोवीस तासात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात १४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. कांदोळी येथे ४७ वर्षांच्या पुरुष रुग्णाला शिवोली आरोग्य केंद्रात मृतावस्थेत मंगळवारी आणण्यात आले. या मृत व्यक्तीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फातोर्डा येथील ७० वर्षांचा पुरुष रुग्ण, बायणा येथील ७६ वर्षांच्या महिला रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ३१ ऑगस्टला निधन झाले. वास्को येथील ३६ वर्षांचा पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ५५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये मंगळवारी निधन झाले. सा जुझे दो आरियलमधील ३० वर्षांच्या युवकाचे, डिचोली येथील ६५ वर्षांचा पुरुष रुग्ण, नेरूल येथील ५३ वर्षांची महिला रुग्ण, साखळी येथील ६४ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये काल निधन झाले. नवेवाडे वास्को येथील ४५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळाध्ये काल निधन झाले आहे.

दोन दिवसांत १२ मृत्यू
जीएमसी इस्पितळातील आयसोलेशनमध्ये १३७ कोरोना रुग्ण आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी ५८८ रुग्ण आढळले होते. तर, दुसर्‍या दिवशी ६३६ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. तसेच, दोन दिवसांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

२०९ कोरोनामुक्त
कोरोना पॉझिटिव्ह २०९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४,०५९ एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ३७६ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. आरोग्य खात्याने १७०८ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले. कोविड प्रयोगशाळेतून १८६४ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत ३३५ स्वॅबच्या नमुन्याचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

पणजीत नवे ३८ रूग्ण
पणजीत आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. पणजीतील रुग्णांची संख्या १८५ झाली आहे. पणजी महानगरपालिकेतील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून महानगरपालिकेचे कार्यालय अर्धा दिवस बंद ठेवण्यात आले. महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कोरोनाबाधित
विविध राजकीय नेत्यानंतर आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे ती माहिती दिली. काल केलेल्या ट्विटरमधून सावंत यांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग झालेला असून आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे म्हटले आहे. मात्र, आपणात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे आपण घरीच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सगळे कामकाज आपण घरूनच करणार असून जे कोण आपल्या संपर्कात आले होते त्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, मुख्यमंत्र्यांनी आल्तिनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काल सीएमओकडून मिळाली.
दरम्यान, आजारपणामुळे मुख्यमंत्री पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कार्यालयात हजेरी लावू शकणार नसल्याने कुणाचीही काही तातडीची कामे असल्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांशी ला.सेरऽपळल.ळप या वॉट्‌सऍप अथवा ९८२२१९९९७९ किंवा ७९७२९६२९६३ या वॉट्‌सऍप क्रमांकावर संपर्क साधावा. मुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सध्या कुणालाही अपॉईटमेन्ट मिळणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने काल ट्विटरमधून स्पष्ट केले.