मडगावात भरदिवसा सराफाचा निर्घृण खून

0
189

मडगाव शहराच्या मध्यभागातील बाजारपेठेत पास्कासिया कॉश्ता रोडवरील व ग्रेस चर्चसमोरील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्निल कृष्णा वाळके (४५) यांचा काल भर दुपारी १२.२० वा. खून झाला. दोन अज्ञात पिस्तुलधारी स्वप्निल यांच्या दुकानात बळजबरीने घुसले व त्यांनी प्रथम स्वप्निल यांच्यावर गोळी झाडून त्यांना जखमी केले. त्यानंतर पिस्तुलधारी व स्वप्निल यांच्यात झटापट झाली. त्यात दुकानाच्या दारात पिस्तुलधारक व त्याच्या साथीदाराने स्वप्निल यांच्या पोटात सुरा खुपसून त्यांचा निर्घृण खून केला व ते पळून गेले. खून करणारे तिघेजण असून त्यातील एकजण दुकानाबाहेर स्कूटरवरच बसून होता.

मडगावातील हा रस्ता नेहमीच गर्दीचा व गजबजलेला असतो. ही घटना घडली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार चाकी वाहने उभी होती. त्या वाहनांच्या रांगेत हल्लेखोर टोळीतील एकजण स्कूटरवर बसून होता. एकटा दुकानाच्या दरवाजाबाहेर उभा होता व तिसरा पिस्तुलधारक आत गेला. खुनाची घटना दहा मिनिटांमध्ये झाली. घटनेनंतर स्वप्निल हे रक्ताच्या थारोळ्यात दुकानाबाहेर गंभीर अवस्थेत बसलेले होते. तात्काळ शेजार्‍यांनी त्यांना इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केला व मडगाव पोलिसांना खबर दिली. इस्पितळात त्यांची तपासणी केली असता प्रकृती गंभीर असल्याचे पाहून हॉस्पिसियुत नेण्यात आले.

हल्लेखोरांशी झटापट
दरम्यान, पिस्तुलधार्‍याचे पिस्तुल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नांत स्वप्निल व हल्लेखोरांमध्ये झटापट झाली. त्यानंतर बाहेर उभा असलेला हल्लेखोराचा साथीदार आत गेला. या झटापटीत पिस्तुलधार्‍याचा फाटलेला शर्ट तेथे पडला होता. खून केल्यानंतर केवळ पँटवरच भर रस्त्याने एकटा हल्लेखोर इस्पितळाच्या बाजूच्या डोंगरावर पळून गेला. त्यानंतर त्याचे दोघे साथीदार स्कूटरने पसार झाले. स्वप्निल हे भाजप नेत्या कृष्णी वाळके यांचे एकुलते एक पुत्र होत. स्वप्निल यांना दोन पुत्र असून ते विद्यालयीन शिक्षण घेत आहेत. स्वप्निल व त्यांच्या पत्नी व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत.

कारण गुलदस्त्यात
हा खून सोन्याचे दागिने लुटण्यासाठी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत नाही. गुन्हेगारांनी एकाही दागिन्याची चोरी केली नाही. कदाचित पिस्तुलचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटण्याच्या इराद्याने ते असावेत असा पोलिसांचा अंदाज असून अजूनपर्यंत योग्य तपास लागला नाही.

पिस्तुल, सुरा जप्त
काही वेळाने पोलीस अधीक्षक पवनकुमार, उपअधीक्षक किरण पौडवाल, निरीक्षक सचिन नार्वेकर हे फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पडलेले पिस्तुल, एक रिकामी व तीन भरलेली काडतुसे, हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला सुरा जप्त केला. सुरा खुपसण्यापूर्वी स्वप्निल यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुन्यांना गजाआड करणार ः मुख्यमंत्री
मडगाव येथील सराफी दुकानातील दिवसाढवळ्या धाडसी चोरीचा प्रयत्न आणि दुकानदाराच्या खून प्रकरणी कसून चौकशी करून खुन्याला गजाआड करण्याची सूचना पोलीस महासंचालक आणि दक्षिण गोव्याचा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका संदेशाद्वारे दिली आहे. मडगाव येथील सराफी दुकानातील दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा प्रयत्न आणि दुकानदाराच्या खुनाचे वृत्त धक्कादायक आहे. या प्रकरणी कसून चौकशी करून खुन्याला गजाआड केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

कायदा, सुव्यवस्था
ढासळली ः कामत

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून काल बुधवारी मडगाव शहरात दिवसाढवळ्या स्वप्निल वाळके यांच्या खुनाची जी घटना घडली त्या घटनेने आपणाला मोठा धक्का बसला असल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. या हल्लेखोराना ताबडतोब विनाविलंब अटक करण्यात यावी, अशी मागणीही कामत यांनी केली आहे. स्वप्निल हा समाजसेविका कृष्णी वाळके यांचा पुत्र असून हे दुःख सहन करण्याची त्यांना देवाने ताकद द्यावी अशी आपण प्रार्थना करीत असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

सुरक्षा व्यवस्था कडक
करण्याची गरज ः सरदेसाई

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र बेरोजगारी वाढलेली असल्याने गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी दिली आहे. जेथे जेथे सराफी दुकाने आहेत त्या त्या भागांत सरकारने पोलीस गस्त वाढवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी श्री. सरदेसाई यांनी केली. सासष्टी तालुक्यात पूर्णवेळ पोलीस उपअधीक्षक नसून हे पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली आहे.