आततायी व अविचारी

0
282

राज्याभोवती आपले पाश आवळत चाललेल्या कोरोनाने अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही सोडले नाही. परिक्षित राजाने म्हणे तक्षकापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली होती, परंतु शेवटी बोरातून अळी निघाली. कोरोनाचेही असेच आहे. त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा कितीही आटोकाट प्रयत्न केला, तरी छोटीशी चूकही तो माफ करीत नाही. लहान-थोर, सामान्य-व्हीआयपी असा भेदही करीत नाही. तो मिळेल त्याला वेढतो, जेरीस आणतो. मुख्यमंत्री या संकटातून लवकर बरे व्हावेत अशी कामना आम्ही करतो.
राज्यात कोरोनाचा विळखा कमालीचा कराल होत चाललेला असूनही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांपुढे मुकाट मुंडी हलवत गोवा सरकारने सर्व सीमा खुल्या करून टाकल्या. वास्तविक, केंद्र सरकारचे दिशानिर्देश परिस्थिती पाहून अमलात आणण्याची मोकळीक राज्यांना असते. फक्त त्यासाठी केंद्राची पूर्वसंमती गरजेची असते. २९ ऑगस्टच्या दिशानिर्देशांमध्येही कलम क्र. ४ मध्ये तसे नमूद केलेले आहे. अनेक राज्यांनी केंद्राचा आदेश पूर्णांशाने अंमलात आणण्यास असमर्थता दर्शवलेली आहे. तामीळनाडूने आंतरराज्य प्रवाशांना ‘इ-पास’ ची सक्ती कायम ठेवलेली आहे, आंतरराज्य रेलसेवा १५ सप्टेंबरपर्यंत मर्यादित ठेवली आहे आणि विमानतळावरही जास्तीत जास्त पन्नास विमाने उतरतील याची तरतूद केली आहे. पश्‍चिम बंगालने तर ७, ११ आणि १२ सप्टेंबरला राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जारी केलेले आहे. भाजपेतर राज्यांनी जी भूमिका घेतली तशी भाजपाच्याच सरकारांना घेणे शक्य नाही हे जरी खरे असले तरी शेवटी राज्यात काय चालले आहे त्याच्याकडे संपूर्णपणे कानाडोळा करीत केंद्राची री ओढणे हे स्वतःच्या पायांवर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे ठरते. राज्य सरकारने हा आततायीपणा करून जनतेला पुन्हा कोरोनाच्या जबड्यात ढकलले आहे.
या महिन्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५८८ नव्या रुग्णांचा उच्चांक राज्याने नोंदवला. तरीही सीमा खुल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. वास्तविक, गेल्या तीन महिन्यांचा कोरोनाचा राज्यातील आलेख तपासला तर तो किती मोठ्या प्रमाणात वाढतो आहे हे कळून चुकते.
१ जुलै रोजी राज्यामध्ये एकूण १३८७ रुग्ण होते. प्रत्यक्ष रुग्णसंख्या होती ७१३ आणि मृत्यू झाले होते ४. त्या तुलनेत १ ऑगस्टची आकडेवारी तपासली तर दिसते की, एकूण रुग्णसंख्या होती पाचपट म्हणजे ६१७३, प्रत्यक्ष रुग्णसंख्या दुपटीहून अधिक म्हणजे १७०७, तर मृत्यूचे प्रमाण तब्बल बारा पट अधिक वाढले आणि मृतांची संख्या झाली ४८.
आता १ सप्टेंबरचे आकडे पाहा- एकूण रुग्णसंख्या गेली आहे अठरा हजारांवर, म्हणजे १ जुलैच्या तुलनेत तब्बल तेरापट अधिक. प्रत्यक्ष रुग्णसंख्या आहे ३९६२ म्हणजे पाच पट जास्त आणि मृतांची संख्या १ जुलैच्या तुलनेत साडे अठ्ठेचाळीस पटींनी अधिक होत १९४ वर गेली आहे. म्हणजेच जून महिन्यापेक्षा ऑगस्ट अखेरपर्यंत कोरोनाचा फैलाव वरील भयावह प्रमाणात वाढलेला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही रुग्णसंख्या चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने वाढलेली नाही. उलट, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. जुलैमध्ये १ लाख ६४ हजार चाचण्या झाल्या, तर ऑगस्टमध्ये केवळ ९४ हजार. तरीही रुग्णसंख्या अनेक पटींनी वाढलेली दिसते.
सरकार सुरवातीला गावनिहाय आकडेवारी देत असे. १८ जुलैपासून ते बंद केले आणि केवळ आरोग्यकेंद्रनिहाय आकडेवारी द्यायला सुरूवात केली. आम्ही तिच्याही तपशिलात गेलो. १८ जुलैचे आणि १ सप्टेंबरचे आकडे यांची तुलना केली तर हा फैलाव कसा सर्वव्यापी आणि प्रचंड आहे याची स्पष्ट कल्पना येते. तालुकावार मांडणी केली तर डिचोलीची ६२ वरून ३४२ वर, पेडण्याची २४ वरून १७० वर, तिसवाडीची १७६ वरून ५२१ वर, बार्देशची ९४ वरून ७४५ वर असे कैक पट मोठे आकडे पाहायला मिळतात. दक्षिण गोव्याचे चित्र तर याहून विपरीत आहे. नुसता शहरांचाच विचार केला, तरी मडगावची ४२ वरून ४३३, फोंड्याची ४९ वरून ३०० अशी रुग्णसंख्या जिथे तिथे अनेक पटींनी वाढते आहे आणि सरकार मात्र याच्याशी आपला काही संबंधच नसल्यागत काखा वर करून बसले आहे.