२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जीवंत आरोपी अजमल अमीर कसाब याने काल सुप्रीम कोर्टाकडे वकीलामार्फत प्राणांची याचना करीत फाशीची शिक्षा जन्मठेपेवर आणण्याची मागणी केली.
कसाबच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून ऍमिकस क्युरि म्हणून नेमलेले ज्येष्ठ विधिज्ज्ञ ऍड. राजू रामचंद्रन यांनी खंडपीठासमोर सांगितले की, कसाबचा या एकूण षड्यंत्रात मोठा वाटा नव्हता. त्याच्या धार्मिक भावना भडकावून त्याला षड्यंत्राचा भाग बनविण्यात आले. त्याच्या वयाचा विचार करून त्याच्या याचनेचा विचार व्हाया असेही रामचंद्रन यांनी कोर्टाला विनवले.
आपल्या विरुद्धच्या खटल्यास अनेक त्रुटी असून आपणास मुबलकरित्या म्हणणे मांडण्यास देण्यात आले नाही, असे कसाबने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपण ३०२ कलमाखाली गुन्हेगार झालो म्हणून युद्धाचा भाग होत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
कसाबला विशेष कोर्टाने फाशी दिली होती ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. नंतर गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने त्याच्या फाशीस स्थगिती दिली होती.