कॅशलेस योजनांच्या जागृतीसाठी उद्या ‘डिजी-धन मेळावा’

0
155

जनसामान्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारने ‘डिजी-धन व्यापार योजना’ व ‘भाग्यवान ग्राहक योजना’ जाहीर केल्या असून या योजनांची जनतेला माहिती देण्यासाठी उद्या बुधवार दि. २८ रोजी पणजीत ‘डिजी-धन मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती मुख्य सचिव आर्. के. श्रीवास्तव, माहिती तंत्रज्ञान संचालक अमेय अभ्यंकर व आयटीचे विशेष सचिव धर्मेंद्र शर्मा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

वरील योजनांसंबंधी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी देशभर शंभर शहरांमध्ये डिजी-धन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून पणजी येथे २८ रोजी मेळावा होणार आहे. देशातील २५ शहरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पणजी हे त्यापैकी एक शहर आहे. पणजीत आयनॉक्स चित्रपटगृहांच्या प्रांगणात हा कार्यक्रम होईल. सकाळी १० वा. हा कार्यक्रम सुरू होईल व रात्रौ ९.३० वा. पर्यंत चालेल. सामान्य ग्राहकांना डिजीटल व्यवहारांची माहिती देण्यासाठी १८ वित्त संस्था २० स्टॉल्स उभारणार आहेत. दिवसभर विविध कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. किरकोळ व्यापारी यावेळी ग्राहकांशी पीओएस मशिन, ई-पेमेंट व डिजीटल पेमेंट याविषयी संवाद साधतील. त्याशिवाय कॅशलेस पध्दतीने खरेदी करता येईल असे एक फ्ली मार्केटही तेथे त्यादिवशी असेल. जीवनावश्यक वस्तूंचीही कॅशलेस पध्दतीने कशी खरेदी करता येईल याचा अनुभव या मार्केटमध्ये ग्राहकांना घेता येणार असल्याचे यावेळी अमेय अभ्यंकर यांनी सांगितले. मेळाव्यादरम्यान दुपारी ३.३० ते चार दरम्यान कॅशलेस पध्दतीने खरेदी व्यवहार केलेल्यांसाठी असलेल्या लकी ड्रॉ योजनेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येतील. ८ नोव्हेंबरपासून आतापर्यंत कॅशलेस पध्दतीने ज्या ग्राहकांनी खरेदी केलेली आहे त्यांना या लकी ड्रॉ योजनेचा लाभ मिळेल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा तसेच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे हजर असतील. एअर एशिया विजेत्यांना मोफत विमान तिकीट देण्यात येईल. या कॅशलेस योजनेमुळे सायबर गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक तेवढ्या एजन्सी असल्याचे ते म्हणाले.