पत्रादेवी-जुवारी महामार्गाची आज पायाभरणी

0
106

>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग व जहाजोद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज गुरूवार दि. २२ रोजी पत्रादेवी ते जुवारी पूल या दरम्यानच्या सहापदरी महामार्गाचा पायाभरणी समारंभ होणार आहे. सुमारे २ हजार कोटी रु. खर्चून हा महामार्ग उभारण्यात येणार असून या महामार्गावर कित्येक उड्डाण पूल (फ्लायओवर्स) असतील. या महामार्गाबरोबरच गडकरी हे मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या जेटीचीही पायाभरणी करतील. या द्रुतगती महामार्गासाठी केंद्र सरकारकडून गोवा सरकारला २ हजार कोटी रु. एवढा निधी मिळणार आहे.

पत्रादेवी ते जुवारी या दरम्यानच्या या सहापदरी महामार्गामुळे मोप विमानतळावरून दक्षिण गोव्यातील टोकावर असलेल्या काणकोण तालुक्यापर्यंत वेगाने व कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती अनिश्‍चित असल्याचे समजते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री ङ्ग्रान्सिस डिसोझा, अन्य मंत्रिगण व आमदार या सोहळ्याला हजर राहणार आहेत.
हा सहापदरी द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांची चांगली सोय होणार आहे. खास करून मोप विमानतळावरून दक्षिण गोव्यात येऊ पाहणार्‍या पर्यटकांना जलदगतीने दक्षिण गोव्यात पोचता येईल. नवा जुवारी पूल हा सहापदरी असेल. तब्बल साडेतीन हजार कोटी रु. या पुलावर खर्च करण्यात येणार आहेत. या पुलाचा पायाभरणी शुभारंभ काही महिन्यांपूर्वी मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते झाला होता. या पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे.