‘आप’चे सरकार आल्यास गोमंतकीयांना सन्मान : गोम्स

0
81

आतापर्यंत किती सरकारे आली आणि गेली. पण गोमंतकीयांना कधीच मान-सन्मानाने जगता आले नाही, असे सांगून येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत जर राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आले तर गोमंतकीयांना मान-सन्मानाने जगता येईल याची आम्ही ग्वाही देतो, असे आपचे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार एल्विस गोम्स यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आमचा सर्वांत महत्त्वाचा निवडणूक मुद्दा हाच असल्याचे ते म्हणाले.

राज्यात भ्रष्टाचाराचा कहर झाल्याने आम आदमीच्या वाट्याला लाचारी आली असे सांगून राज्यातून भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे हे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याचे गोम्स यांनी यावेळी स्पष्ट केले.
नोकर्‍या व रोजगारावर भर
आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास नोकर्‍या व रोजगार यावर भर देण्यात येईल. गोमंतकीयांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील असेच उद्योग गोव्यात आणले जातील. किनारी पर्यटनावर सरकार खास भर देणार असून ते सर्वसमावेशक होईल यावर खास लक्ष देण्यात येणार आहे. ८० च्या दशकात जी सरकारे सत्तेवर होती त्यांनी राज्यात पंचातारांकित हॉटेल्स आणताना गोमंतकीयांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची स्वप्ने दाखवली. मात्र, प्रत्यक्षात किनारपट्टीवर मच्छीमार, रेंदेर, टॅक्सीवाले, मोटारसायकल पायलट यांच्या वाट्याला काहीही आले नाही, असा आरोपही गोम्स यांनी यावेळी केला. अमली पदार्थ, कॅसिनो व वेश्या व्यवसाय यामुळे गोव्याच्या प्रतिमेला तडा गेलेला असून आम्ही सत्तेवर आल्यास गोव्याची ही प्रतिमा बदलण्यासाठी आवश्यक ते सगळे काही करणार असल्याचेही गोम्स यांनी यावेळी स्पष्ट केले.
योजना बंद करणार नाही
आमचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही सध्या चालू असलेल्या सरकारी योजना बंद करू असा खोटा प्रचार काही हितशत्रू करू लागलेले आहेत. मात्र, ते खरे नसून आम्ही कोणत्याही योजना बंद करणार नसल्याचे गोम्स यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर आम्ही योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करू असे सांगून कोणत्याही योजनेसाठी लोकांना आमदाराकडे अथवा पक्षाच्या कार्यालयात जावे लागू नये या मताचे आम्ही आहोत, असे गोम्स यांनी नमूद केले.
लोकांना बदल हवाय
राज्यातील जनतेला बदल हवाच हे कुंकळ्‌ळी मतदारसंघात झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या सभेला झालेल्या प्रचंड गर्दीवरून स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. कुंकळ्‌ळी मतदारसंघात यापूर्वी कुठल्याही जाहीर सभेला अशी गर्दी झाली नव्हती, असा दावाही गोम्स यांनी केला.