आयकर खात्याला आढळले ३,१८५ कोटींचे अघोषित उत्पन्न

0
81

आयकर खात्याने नोटबंदीपासून देशभरात घातलेल्या छाप्यांतून आजवर ३,१८५ कोटींचे अघोषित उत्पन्न आढळून आले असून ८६ कोटी नव्या नोटा जप्त करण्यात आल्या असल्याचे काल स्पष्ट झाले. देशभरात आजवर ६७७ छापे टाकले गेले असून करबुडवेगिरीसंदर्भात आणि हवाला सदृश्य व्यवहारांसंदर्भात ३,१०० नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

नोटबंदीच्या या काळात ४२८ कोटींची रोकड आणि सोने जप्त करण्यात आले असून १९ डिसेंबरपर्यंत ३,१८५ कोटींहून अधिक अघोषित उत्पन्न आढळून आले आहे अशी माहिती आयकर अधिकार्‍यांनी दिली.
२२० प्रकरणे सीबीआय वा अंमलबजावणी संचालनालयाकडे वर्ग करण्यात आली आहेत. आयकर खात्याची देशभरातील कार्यालये आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ बँकांशी व रिझर्व्ह बँकेशी समन्वय ठेवून असून करबुडवेगिरीवर नजर ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले. या सर्व तपास संस्थांनी छाप्यांत जप्त केलेल्या नोटा तिजोरीत साठवून ठेवण्याऐवजी बँकेत जमा करण्याचे आदेश आपल्या कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे ह्या नोटा पुन्हा वितरणात येऊ शकतील. दरम्यान, नोटबंदीवर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी कालही आपले टीकास्त्र सुरू ठेवले. नोटबंदी ही बँकांना आठ लाख कोटी देणे असलेल्या, पंतप्रधानांच्या श्रीमंत मित्रांना मदतीचा हात देण्यासाठी लागू करण्यात आली असल्याची टीका केजरीवाल यांनी केली, तर पंतप्रधान कपडे बदलतात त्या वेगाने रिझर्व्ह बँक नियम बदलत चालली आहे अशी टीका कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल ट्वीटरवरून केली.

१० लाखांवरील उत्पन्न असलेल्यांचे
एलपीजी गॅस अनुदान रद्द होणार
आयकर विभाग लवकरच गॅस ग्राहकांची वैयक्तिक माहिती, पॅन क्रमांक, निवासी पत्ता आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती तेल मंत्रालयाला पुरवणार असून त्यामुळे दहा लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांचे एलपीजी गॅस अनुदान रद्द करणे तेल कंपन्यांना शक्य होईल. यासंदर्भात आयकर विभाग आणि तेल मंत्रालयात समझोता करार होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याला मान्यता दिली आहे.

डिजिटल माध्यमातून पैसे स्वीकारणार्‍या छोट्या व्यापार्‍यांस करसवलत

>> अर्थमंत्री अरुण जेटली यांची घोषणा

बँकिंग आणि डिजिटल माध्यमांतून पैसे स्वीकारणार्‍या व वर्षाला दोन कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या छोट्या व्यापार्‍यांना करसवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल केली. दोन कोटींपर्यंतची उलाढाल असलेले छोटे व्यापारी व व्यावसायिक त्यांचे हिशेब व्यवस्थित ठेवत नाहीत. परंतु त्यांनी ८ टक्के नफा प्राप्त केल्याचे गृहित धरले जाईल. पण ते जर डिजिटल माध्यमातून वा बँकिंगद्वारे पैसे स्वीकारत असतील तर त्यांनी ८ ऐवजी ६ टक्के नफा प्राप्त केल्याचे गृहित धरून त्यानुसार कर आकारणी होईल असे जेटली म्हणाले.
नोटबंदीसाठी सरकार पूर्णतः तयार असून रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणात नोटा साठवलेल्या आहेत. ३० डिसेंबर नंतर त्या पुरतील असे ते म्हणाले.एक्सीस बँकेच्या दोन शाखांत गैरव्यवहार झाल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता सदर बँकेने दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केलेली आहे असे उत्तर जेटली यांनी दिले. प्राप्तिकराच्या सध्याच्या स्वरूपात काही बदल केले जाणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन पाळले. जुन्या नोटा एकाच वेळी बँकेत भराव्यात. एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा जर जुन्या नोटा भरत असेल तर तिच्याविषयी संशय निर्माण होईल असे जेटली यांनी सांगितले.