बाह्यविकास आराखड्यांबाबतची घाई निवडणूक निधीसाठीच

0
90

>> कॉंग्रेस पक्षाचा भाजप सरकारवर आरोप

 

पणजी, मडगाव, फोंडा आदी शहरांच्या बाह्यविकास आराखड्याच्या प्रश्‍नावरून काल मडगावचे आमदार दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना येऊ घातलेल्या निवडणुकीसाठीचा निधी डोळ्यांपुढे ठेवून बाह्यविकास आराखडे तयार करताना कायदेभंग करण्यात आल्याचा आरोप केला.
हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना वरील नेत्यांनी केला. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घाईगडबडीत ओडीपींचे काम सरकार पूर्ण करू पाहत आहे. या बाह्यविकास आराखड्यांचे मसुदे तयार करताना सरकारने विभागात बदल (झोन चेंज) घडवून आणले असून ते अयोग्य आहे. आमचा त्याला विरोध आहे, असे मडगावच्या बाह्यविकास आराखड्यावर बोलताना दिगंबर कामत यांनी सांगितले. मडगावच्या बाह्य विकास आराखड्याला ४५० हरकती घेण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.
मडगावमधील २५ पैकी १८ नगरसेवकांनी ओडीपीला हरकत घेतली असल्याची माहितीही त्यांनी दिली. सर्व आवश्यक ती कागदपत्रे द्यावीत व अभ्यास करण्यास आणखी एका महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे कामत यांनी सांगितले. जास्तीत जास्त चटईक्षेत्र २०० वरून ३०० वर नेण्यात आलेले असून यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली असल्याचे कामत म्हणाले. काही विभागात तर काही मोजक्या जागीच चटईक्षेत्रात बदल घडवून आणण्यात आले असल्याचे ते म्हणाले.