Home बातम्या आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी पर्रीकरच हवेत

आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी पर्रीकरच हवेत

0

– एन. शिवदास

जनसंपर्क यात्रेत व अन्य सार्वजनिक सभांतून बोलताना विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर नेहमी आपला पक्ष सत्तेवर आल्यास अमूक अमूक योजना अंमलात आणणार अशा आशयाची आश्‍वासने देत आहेत. पेट्रोलचे भाव कमी करणे, निराधार महिलांची पेन्शन रक्कम वाढवून देणे, कचर्‍याची समस्या सोडवणार या व अशा प्रकारची अनेक आश्‍वासने ते सभांमधून देत आहेत. हल्लीच दै. ‘नवप्रभा’तून एका स्तंभलेखकाने मनोहर पर्रीकरांच्या या आश्‍वासनाची खिल्ली उडवून त्या आश्‍वासनांना ‘हवेतील आश्‍वासने’ असे म्हटले आहे. या लेखकाने आपली निष्ठा व प्रतिष्ठा गहाण टाकून मुख्यमंत्र्यांकडे लाळघोटेपणा करून एका सरकारी संस्थेचे अध्यक्षपद पटकावले आहे. आपली कोणी दखल घेत नाही असा टाहो फोडत शेवटी त्यांंनी, त्यांच्या काही ‘बारमेट’ मित्रांकरवी स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. मात्र विरोधी पक्षाचे पुढारी मनोहर पर्रीकर आपल्या पक्षाच्या प्रचारयात्रेत लोकांना जी आश्‍वासने आणि कार्यक्रम सादर करीत आहेत, त्याच्याशी वास्तविक या स्तंभलेखकाचे काहीही देणे-घेणे नाही. तरीही ‘नवप्रभा’चा हा स्तंभलेखक भारतीय जनता पक्षाला हिणवून कदाचित मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी जे काय केले, त्याचे सार्थक झाले असे भासविण्याचा तो प्रयत्न असावा. परंतु, भाजपाच्या जनसंपर्क यात्रेत लोकांना जी आश्‍वासने दिलेली आहेत, ती आश्‍वासने वरवरची नसून ती अभ्यासाअंती आणि सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थितीचा विचार करूनच दिलेली आहेत. विद्यमान सरकारने गोव्याला काय दिले? तर सर्वांनी भयमुक्त लुटावे, मी माझ्या जागी, तुम्ही तुमच्या जागी, हवे ते करा हे आपल्या सहकार्‍यांना सांगितले. सरकारी नोकरांनाही, त्यांना हवा तसा ढिला राजकारभार करा, शासक म्हणून मी कुठलीही कारवाई करणार नाही, असा संदेश दिला गेला.

मनोहर पर्रीकरांनी जी आश्‍वासने दिलेली आहेत, त्यांची आता कसोटी लागणार आहे. लोक मनोहर पर्रीकरांवर विश्‍वास ठेवतात, कारण त्यांची यशस्वी कारकीर्द. मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून मनोहर पर्रीकरांनी आपली क्षमता याआधी सिद्ध केलेली आहे. पर्रीकरांच्या कर्तबगारीचे दाखले अनेक आहेत, म्हणून पणजीच्या कॉंग्रेस भवनात त्रयस्तपणे खासगीत बोलताना आम्ही आमच्या तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांची कर्तबगारी, दुर्गुण व कमकुवतपणा आणि निष्क्रियता बघत होतो. त्याच्यावर चर्चा करताना नेहमी त्यांची मनोहर पर्रीकरांशी तुलना करून चर्चा रंगायची. आता प्रत्यक्ष कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या नेत्यांविषयी नाक मुरडणे व विरोधी पक्ष नेत्यांबद्दल चांगले बोलणे याबाबतीत चौकशी केल्यानंतर प्रत्येकाचा ‘किते उलवपाचे आसा आमच्या मंत्र्याचेर?’ असा प्रतिसवाल यायचा. उलट मनोहर पर्रीकरांनी मुख्यमंत्री म्हणून पणजीचे ‘मरीन ड्राइव्ह’ कसे केले, केबल पूल खोर्जुव्याला बांधला, जुन्या गोव्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी कदंब रस्ता बांधून फोंडा-पणजी मार्गावरील कोंडी कशी सोडवली, आपल्या चार-पाच वर्षांच्या काळात पर्रीकर सरकारच्या नावावर चौदा नवीन पूल, नवीन आयनॉक्स, कला अकादमीची सुधारणा, आंतर्‌राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यशस्वी आयोजन, कला अकादमीतील कार्यक्रमाला उसळणारी गर्दी काबूत आणण्यासाठी एकाद्या अधिकार्‍याप्रमाणे स्वतः लोकांत मिसळण्याचा पर्रीकरांचा गुण, शहरात जवळ जवळ दोन कार्यक्रम असल्यास वाहनांचा ताफा न वापरता चालत जाणारे परीर्र्कर, नेहमी साधेपणाने राहणे, निगर्वीपणा, सर्वसामान्यात सामान्याप्रमाणे मिसळणारे पर्रीकर, अशी अनेक वैशिष्ट्ये असणारे मनोहर पर्रीकर हे तरूण मुख्यमंत्री गोव्याला एकदा लाभले. परंतु कॉंग्रेसला तो अडचणीचा काटा वाटला, म्हणून त्यांनी त्यावेळी भाजपाचे सरकार पाडले.

कॉंग्रेसवाले आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्याची प्रशंसा करीत आहेत, तशीच प्रशंसा आम्ही मनोहर पर्रीकरांची कॉंग्रेस भवनात करीत होतो. हे आज मला कॉंग्रेस पक्ष सोडला तेव्हा आठवते असे नव्हे, ते माझ्या मनातच आहे, अशी पार्श्‍वभूमी असलेल्या मनोहर पर्रीकरांना जनतेला आश्‍वासने देण्याचा निश्‍चितपणे अधिकार आहे. ती आश्‍वासने खरी करून दाखविण्याची संधी जनतेने पर्रीकरांना पुन्हा देणे हा जनतेचा अधिकार आहे.

कॉंग्रेस पक्षात असताना सुद्धा मी मनोहर पर्रीकरांचा पुरस्कर्ता होतो. अधूनमधून कॉंग्रेस भवनात बैठकीत बोलताना मनोहर पर्रीकरांच्या कार्याचा उल्लेख करायचा तेव्हा आमचे नेते म्हणायचे कॉंग्रेस ही एक चळवळ आहे, तो एक दर्या आहे, तो एक रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, कुणीही यावे, कुणीही जावे, काहीही करावे, लुटावे, फटवावे, असा मुक्त मोकळा स्वतंत्र पक्ष आहे. हे भाजपात नाही अशीही पुस्ती हे नेते जोडायचे. मात्र बहुजन समाजातील लोकांना अधिक पुढे न आणणे, हा कार्यक्रम मात्र छुप्या पद्धतीने राबवण्यात येत असे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदी रवी नाईकांचे नाव पुढे आले तेव्हा कॉंग्रेस पक्षातील विशिष्ट लॉबीने हा डाव उधळून लावला आणि झोपी गेलेल्या दिगंबरांना मडगावहून रात्री दहा वाजता सिदाद दी गोवा हॉटेलात बोलावून घेऊन मुख्यमंत्रीपद बहाल केले. खासदार शांताराम नाईक यांना ओबीसी म्हणजे बहुजन समाजाचा पुळका येऊन हल्ली श्रीपाद नाईकांचे निमित्त करून ते भाजपावर घसरले. अर्थात् त्यांचे विधान चांगलेच ‘बुमरँग’ होऊन शांतारामांची बोलतीच बंद केली ती वेगळी गोष्ट. परंतु, भाजपाने भंडारी समाजातील सहा आमदार तयार केले. तेही अगदी सामान्य आणि गरीब, हे शांताराम नाईक यांना माहीत नाही काय?