नवप्रभा दीपावली विशेषांकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

0
114

सर्वसामान्य वाचकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दैनिक नवप्रभातर्फे गेली काही वर्षे दीपावली अंक प्रसिद्ध केला जातो. यंदाच्या दीपावली अंकाचे प्रकाशन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते काल संध्याकाळी राजभवनवर झाले. यावेळी नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, सरव्यवस्थापक श्री. प्रमोद रेवणकर व उपसरव्यवस्थापक श्री. विजय कळंगुटकर उपस्थित होते. राज्यपाल श्रीमती सिन्हा यांनी यावेळी दैनिक नवप्रभाच्या योगदानाविषयी गौरवोद्गार काढले व आपण रोज नवप्रभा वाचत असल्याचे आवर्जून नमूद केले.

यंदाच्या दिवाळी अंकात मराठीतील नामांकित सेलिब्रिटींनी सहभाग घेतला असून अभिनेता दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री वंदना गुप्ते, विनोदसम्राट भाऊ कदम, अभिनेत्री अमृता खानविलकर, ‘मी माझा’ कार चंद्रशेखर गोखले, प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक, विख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, गायक महेश काळे, ख्यातनाम शास्त्रीय गायिका देवकी पंडित, बुद्धिबळपटू अभिजित कुंटे, जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रमोद कांबळे तसेच ‘सैराट’ ची आर्ची रिंकू राजगुरू यांची विस्तृत मनोगते आहेत.
स्वरतीर्थ मंगेशीचा स्वराभिषेकी या दीर्घ लेखात गोमंतकीय रसिकाग्रणी जनार्दन वेर्लेकर यांनी पं जितेंद्र अभिषेकी यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतला असून सोबत शौनक अभिषेकींच्या संग्रहातील दुर्मीळ छायाचित्रेही देण्यात आली आहेत. ‘त्रिशंकू’ हा गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष माधव बोरकर यांचा प्रसिद्ध गोमंतकीय कवी डॉम मोरायश याच्या जीवनावरील लेख वाचनीय असून बोलभाषा या लेखात विनायक खेडेकर यांनी प्रमाणभाषा व बोलीभाषा यांच्या नात्यावर प्रकाशझोत टाकला आहे. मराठी गझलच्या प्रवासाविषयीचा राधा भावे यांचा लेख, गोव्यातील ङ्गगावनकाणीफ विषयीचा लोकसाहित्य अभ्यासिका पौर्णिमा केरकर यांचा लेख, तसेच सर्जिकल स्ट्राईक्सविषयीचा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा लेख, पुष्पाग्रज यांचे कॅनडाचे प्रवासवर्णन, शशांक गुळगुळे यांचा एका बँकेची शताब्दी हा विशेष लेख असा भरगच्च मजकूर यंदाच्या दीपावली अंकाचे वैशिष्ट्य आहे.
नारायण महाले, अरूण हेबळेकर, जयंती नायक, दिलीप बोरकर, यशवंत कर्णिक यांच्या कथा, रेखा ठाकूर यांचा ललित लेख, पुष्पाग्रज, सुदेश लोटलीकर आदींच्या भावपूर्ण कविता, रघुनंदन केळकर यांचे संपूर्ण वर्षाचे राशीभविष्य, नितीन पाटील, वासुदेव कारंजकर यांची हास्यचित्रे यांनी नवप्रभाचा यंदाचा दिवाळी अंक खच्चून भरला आहे. या १६० पानी विशेषांकाची किंमत अवघी ३५ रुपये असून दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या या बहारदार मैफलीचे स्वागत वाचक करतील असा विश्वास नवप्रभा परिवाराला आहे.

राज्यपालांनी गोव्यात लिहिली
सती अहिल्येवर कादंबरी
आपण आपल्या गोव्यातील वास्तव्यात सती अहिल्येवर कादंबरी लिहून पूर्ण केली असून लवकरच ती हैदराबाद येथील ‘मिलाप’ या नामांकित हिंदी दैनिकातून क्रमशः प्रसिद्ध होईल व पुढील वर्षी जूनमध्ये तिचे प्रकाशन करणार असल्याचे राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी यावेळी सांगितले. राज्यपालपदावर असल्याने लेखनाला विशेष वेळ मिळत नाही, परंतु रोज सकाळी दोन तास लेखनासाठी वेळ काढल्याने ही कादंबरी लिहून पूर्ण होऊ शकल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या विविधांगी लेखनाची त्यांनी यावेळी माहिती दिली. मराठीतील दिवाळी अंकांच्या परंपरेची आपल्याला कल्पना असून हे अंक साहित्याला मोठे योगदान देत असल्याचे त्या म्हणाल्या.