१ लाख १७ हजार कोटी रु. चा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, एक लाख कोटी रु. चा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा घोटाळा, एक लाख कोटी रु. चा आयात-निर्यात घोटाळा, एक लाख कोटी रु. चा ऍन्थ्रेक्स करार घोटाळा असे महाघोटाळे केंद्रातील सरकारने केल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत मनमोहन सिंग सरकारला केवळ अपयशच आलेले आहे. आपण एकवेळ अपयशाकडे डोळेझाक करू शकतो, पण लाखो कोटींच्या महाघोटाळ्यांकडे डोळेझाक कशी करायची? देश अक्षरशः लुटला जात आहे, गोव्यातही वेगळी परिस्थिती नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे सरकार असताना राज्यात मोठा विकास झाला होता. पण दिगंबर कामत यांच्या राजवटीत विकास थंडावला.
भ्रष्टाचार मात्र प्रचंड वाढल्याचा आरोप त्यांनी केला. भारतात सध्या जेवढा भ्रष्टाचार चालू आहे तेवढा भ्रष्टाचार जगातील कोणत्याही लोकशाही राष्ट्रात चालू नसल्याचे ते उद्गारले. लाखो कोटी रु. एवढा काळा पैसा जो विदेशी बँकांत ठेवण्यात आलेला आहे तो ठेवणार्यांची नावे सरकारने जाहीर करायला हवी होती. लालकृष्ण अडवानी यांनी २००८ साली प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना पत्र लिहून विदेशी बँकांत काळा पैसा ठेवणार्यांची नावे जाहीर करण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती व त्यावेळी १०० दिवसांच्या आत ती नावे जाहीर करण्यात येतील असे मनमोहन सिंग यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, अद्याप सदर नवे जाहीर करण्यात आली नसल्याचे नायडू यांनी सांगितले. यूपीए सरकार सत्तेवर आल्यापासून देशात वाढलेल्या प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल बनले असल्याचे पुढे म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने यूपीए सरकार सत्तेवर आल्यापासून १३ वेळा व्याजदरात वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. वाजपेयी सरकार सत्तेवर असताना व्याजदर ६.५ ते ७.५ टक्के एवढे होते. मात्र, आता ते ११ ते १२ टक्क्यांवर पोचले असल्याचे ते म्हणाले. गेल्या ७ वर्षांत देशभरात २ लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे सांगून कृषी क्षेत्र व शेतकर्यांसाठी केंद्र सरकारने कोणतीच पावले उचलली नसल्याचा आरोप नायडू यांनी केला. भाजपच्या गोव्यातील जनसंपर्क अभियानला अल्पसंख्यंकांकडूनही चागंला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
पत्रकार परिषदेस श्रीपाद अनुपस्थित
स्थानिक राजकारणात येण्यास इच्छुक असलेले व उमेदवारी देण्यास पक्ष टाळाटाळ करीत असल्याने निराश बनलेले उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी काल भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांच्या पत्रकार परिषदेला हजर न राहणेच पसंत केले. नाराज बनलेल्या श्रीपाद नाईक यांनी पक्षाच्या जनसंपर्क अभियानवरही बहिष्कार घातला होता.