Home बातम्या मृत्यू पांघरून नरेंद्र शेवटपर्यंत काव्य गात राहिला…

मृत्यू पांघरून नरेंद्र शेवटपर्यंत काव्य गात राहिला…

0

एन. शिवदास

‘अनार्या’ चे ‘आर्यन’ नरेंद्र बोडके गेले, असा फोन दर्दभेदी आवाजात अवधूत कुडतरकरने केला तेव्हा नरेंद्र मृत्यूचे स्वागत करण्यासाठी परत पुण्यात पोचल्याचे समजले, कारण गोव्यात फ्लॅट घेऊन राहायला येतोय हे सांगण्यासाठी ‘गोवा कोंकणी अकादमीच्या कार्यक्रमात मला भेटायला येत आहे, वाटेवर आहे, तू कुठं आहेस?’ असा नरेंद्रचा फोन मला आला होता व सुदैवाने मीही फर्मागुडीहून कोकणी अकादमीच्या कार्यक्रमात जाण्यासाठी जुन्या गोव्याला पोचलो होतो. मी नरेंद्रला म्हटलं, फक्त दहा मिनिटे थांब, मी लगेच पोचतो व ड्रायव्हरला गाडीची गती वाढवायला सांगितली. गाडीतून उतरून मी थेट नरेंद्रचे स्वागत करायला धावलो. नरेंद्र व गौरीला घेऊन केबिनमध्ये आलो, सोफ्यावर बसता बसता नरेंद्र म्हणाला, ‘मला पातळ भाजी व पाव पाहिजे’. मी लगेच ड्रायव्हरला बोलावून घेतले व नरेंद्र व गौरीसाठी नाश्ता आणायला सांगितला.

‘‘वॅगनर घेऊन आलो, फ्लॅट भाड्याने घेतला. कुठं तरी पर्वरीला, बार्देशात, थोडे दिवस गोव्यात राहण्याचा बेत आहे.’’ नरेंद्र बोलत होता आणि माझं लक्ष नरेंद्राच्या शरीराकडे गेले. नरेंद्राला स्पष्ट दिसत नव्हतं, मला त्याने आवाजावरून ओळखले हे मला त्यानेच सांगितले. गौरी त्याचे डोळे, त्याचे हात आणि पायही झालेली होती. गौरीमुळे नरेंद्र आणखी एक वर्ष जगू शकला.

गेल्या वर्षी नरेंद्राचा कोंकणी काव्यसंग्रह ‘अनार्य’ प्रकाशित करण्याचा योग आला. पुण्यात ना. सी. फडके सभागृहात प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. गोवा कोंकणी अकादमीच्या खास योजनेखाली ह्या संग्रहाची संपूर्ण तयारी तत्कालीन अध्यक्ष पुंडलीक नाईक यांनी केली होती. ‘अनार्य’ छापून तयार होता व नरेंद्रची तब्येत गंभीर बनलेली होती. गोव्यात प्रकाशन समारंभ आयोजित करण्याचा बेत फसला. पुंडलीक मला फोनवर म्हणाला, नरेंद्र डायलिसीसवर आहे. आठवड्यात एकदा डायलिसीस करावी लागते. कधीही काहीही होऊ शकते.

नरेंद्रचा मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला, पुण्यात जावं, न जावं ह्या मानसिक द्वंद्वात ऐनवेळी म्हणजे आधल्या दिवशी पुण्यात जाण्याचं निश्‍चित झालं, त्याला कारण पुंडलिक नाईकांचा पुन्हा फोन आला, मी दिल्लीहून पुण्याला पोचतो. अकादमीचा अध्यक्ष म्हणून तू प्रकाशन समारंभाला उपस्थित राहिलं पाहिजे. मनात नको नको ते विचार येऊ लागले. नरेंद्रचे शेवटचे पुस्तक, तेही कोंकणी अकादमीचे, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गेलो नाही तर कायमचं शल्य मनात घर करून राहणार. त्या शिवाय नरेंद्रने माझ्यासाठी एका चांगल्या हॉटेलात रूमसुद्धा बुक केल्याचे सांगितले.

अनार्याचा शानदार प्रकाशन सोहळा पार पडला, पुण्यातील नामवंत लेखक, कवयित्री कार्यक्रमाला उपस्थित होते. नरेंद्रच्या कोंकणी ‘अनार्य’च्या प्रकाशन समारंभात गोवा कोंकणी अकादमीचा अध्यक्ष असल्याचे पुरेपूर भान ठेवूनही सुरूवात कोंकणीतून केली व राहिलेले संपूर्ण भाषण मराठीत केले. अर्धा तास मराठीत भाषण केले व त्यालाही पुंडलिक नाईक व नरेंद्र बोडकेकडून प्रशस्तीपत्र मिळालें. तेंव्हा लक्षात आलं, त्या – त्या वातावरणाप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे त्या – त्या प्रमाणे शब्द सुचतात.

आठवणीच्या जगातून बाहेर आलो तेव्हा नरेंद्रसाठी ‘पातळ भाजी’ तयार होती, टिपॉयजवळ बसून नरेंद्रने भाजी खाल्ली. शेजारी गौरी होती, पण गौरी नुस्ती मंत्रमुग्ध होऊन नरेंद्रचं ते वागणं बघत होती.

नरेंद्र व मी आणि इतर सारे कोंकणी मराठी लेखक – कवी एका पिढीचे. मला आठवतं, १९७४ मध्ये मडगाव मेलडी मेकर्स ह्या संस्थेने अखिल गोमंतक कोंकणी – मराठी भाषेत काव्यवाचनाची स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धेत मराठी विभागातले पहिले बक्षीस नरेंद्र बोडकेला, तर कोंकणीतले पहिले बक्षिस रमेश वेळुस्करांना व दुसरे बक्षीस माझ्या ‘मोगाची वाल’ ह्या कवितेला प्राप्त झाले होते. सरस्वतीची बक्षिसे मिळालेली. माझ्या साहित्यिक कारकिर्दीचे पहिले बक्षीस मी आजही व्यवस्थित जपून ठेवलेलं आहे. त्या कविता स्पर्धेत पहिल्यांदा नरेंद्रची भेट झाली. काही तरी बेफिकीर, धुंद व फाडफाड मराठीत तर मध्येच कोंकणी बोलणारा नरेंद्र अगदी गुटगुटीत काळासावळा, केसांची झुल्फे उडविणारा यंग व हँडसम पण होता. स्वतःबद्दल भलताच अहम् होता. तेव्हापासून तो कवी बोरकर व कमी रामाणींच्या कवितांवर वादग्रस्त भाष्य करायचा.

त्याच्यानंतर नरेंद्रची माझी भेट झाली ती दैनिक ‘नवप्रभा’त नरेंद्र उपसंपादक म्हणून नोकरीला लागला तेव्हा. द्वा. भ. कर्णिक दै. नवप्रभाचे तेव्हा संपादक होते. नंतर नरेंद्रची भ्रमंती ‘बुलंद’, दै. ‘गोमन्तक’ नंतर मुंबई – पुणे आणि शेवटी पुणे. पुण्यात त्याने देह सोडला, मृत्यूच्या दोन दिवसांआधी नरेंद्रचा फोन आला, बोलायला दोन मिनिटे मिळतील काय, नरेंद्र फोनवरून विचारीत होता. मृत्यू पांघरून नरेंद्र बोलत होता याची कल्पना मला नव्हती, पण त्या दिवशी मी नेहमीपेक्षा फोनवर अधिक बोललो. निवडणुकीच्या काळात फोंड्यात येऊन ‘बुलंद’चा खास अंक प्रकाशित करण्याचा नरेंद्रचा बेत होता. मृत्यूशय्येवर राहून असले बेत करणारा नरेंद्र एकमेव असला पाहिजे.

नरेंद्र झपाटलेला होता. मृत्यूला चुकवत एकसारखा लिहीत होता. उद्या नाही, आता म्हणत मृत्यूच्या संध्याकाळी सुद्धा नरेंद्रने शेवटची कविता लिहिली असे सांगण्यात आले. गेल्या वर्षी पुण्यात त्याच्या खोलीवर जाऊन भेट घेतली होती, नरेंद्रने डायलिसीससाठी आर्थिक मदत करण्यासाठी आपल्या मित्रमंडळींना आवाहनही केले होते. नरेंद्रला किती जणांनी आर्थिक मदत केली मला माहिती नाही. परंतु डायलिसीसवर असलेला नरेंद्र दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेल्या स्थितीत हे सगळे भोगत असताना त्याने तशाही परिस्थितीत एक वर्ष तग धरला व भरपूर कविता व इतर लेखन केले. शब्दकोष व लेखकांची माहिती पूर्ण ग्रंथ करण्यासाठी त्यांनी एक संपादक मंडळही घडविलेलं होतं. एवढी दुर्दम्य आशा, जिद्द व निर्धार नरेंद्रने शेवटच्या क्षणापर्यंत बाळगिला होती. नरेंद्रने कोंकणी भाषेला ‘अनार्य’सारखा दर्जेदार कविता संग्रह दिला व आपल्या मूळ भाषेचेही ऋण फेडले. शेवटच्या काळात नरेंद्रने कोंकणीमधून खूप लेखन केले, का कोण जाणे, कोंकणी – मराठीच्या वादात सापडून आपण काही गमावलं, काही कमावलं, याचा हिशेब नरेंद्र बोडकेंनी केलेला असावा. नरेंद्रची मराठी व कोंकणी कविता त्याची स्मृती कायम ठेवील यात शंका नाही. नरेंद्राच्या काव्यप्रतिभेचा मृत्यू कधीच होणार नाही. ती अमर आहे.