विष्णू वाघ यांचा इशारा
दाबोळी मतदारसंघातून उपसभापती माविन गुदिन्हो याना पराभूत करण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे, असे भाजपचे प्रवक्ते विष्णू सूर्या वाघ यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
माविन गुदिन्हो हे माध्यम प्रश्नातील प्रमुख खलनायक असून त्यांचा पराभव होण्याची गरज आहे. भाजपने ते आव्हान स्वीकारले असल्याचे वाघ म्हणाले. प्राथमिक स्तरावरील इंग्रजी शाळांना सरकारी माध्यम देण्यासंबंधीचा मुद्दा माविन गुदिन्हो यांनीच प्रथम उपस्थित केला होता, असे सांगून अशा या नेत्याला राजकीय अद्दल घडवण्याची आवश्यकता असल्याचे वाघ म्हणाले. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत गुदिन्हो यांना जबरदस्त हादरा बसेल, असा दावाही वाघ यांनी यावेळी केला.दरम्यान, भाजपच्या जनसंपर्क अभियानचा काल बारावा दिवस होता. काल मये व डिचोली या मतदारसंघांत जनसंपर्क यात्रा झाली व त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले.