वेस्टर्न इंडिया कंपनी आवारात दोन वेळा प्रवेश करण्यापासून कामगारांनी अटकाव केलेल्या मुरगांव उपजिल्हाधिकार्यांनी काल पोलीस बंदोबस्तात प्रवेश करून तेल गळती होत असलेल्या ‘एमव्ही क्वींग’ जहाजाची पाहणी केली. यामुळे वेस्टर्न इंडिया कामगारात कमालीचा असंतोष पसरला. त्यामुळे काहीवेळ कंपनी आवारात वातावरण बरेच तंग बनले होते.
येथील मुरगांव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डात दुरुस्तीसाठी गेली अडीच वर्षे आणून ठेवलेल्या सहारा इंडिया कंपनीच्या एमव्हीक्वींग या प्रवासी जहाजाचा प्रश्न ऐरणीवर आहे. या जहाजातून तेल गळती होत असल्याने तात्काळ उपाययोजना आखण्याचे आदेश गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्यामुळे एमपीटी, तटरक्षकदल, सरकारी अधिकार्यांचीही गोची झाली आहे. दिवसेंदिवस तेल गळती वाढतच असून तेल सर्वत्र पसरत आहे. या जहाजात साडेतीनशे टन तेल आहे. हे तेल समुद्रात पसरले तर मोठ्या आपत्तीनां तोंड द्यावे लागेल हे सरकार यंत्रणेला माहीत आहे. त्यामुळे वेस्टर्न इंडिया कंपनी धक्क्यावर असलेल्या जहाजाची पाहणी करण्यासाठी अधिकारी ये-जा करतात. दरम्यान, वेस्टर्न इंडिया कंपनी कामगार गेले १० महिने वेतनाविना जीवन कंठीत असल्याने त्यासठी ते जहाजाच्या पाहणीसाठी विरोध करतात. शनिवारी दुपारी मुरगावचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी वेस्टर्न इंडिया शिपयार्ड आवारात जहाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अटकांव करण्यात आला होता. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, काल सकाळी उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी मुरगांव पोलीस व वास्को पोलीस स्थानकांचे पोलीस बळ वापरून शिपयार्ड आवारात प्रवेश करून ‘एमव्ही क्वींग’ या जहाजाची पाहणी केली. या प्रकारामुळे कामगार वर्ग बराच चवताळला. त्यांनी पोलीस बळ वापरून उपजिल्हाधिकार्यांनी प्रवेश केल्याबद्दल चिड व्यक्त करून निषेध व्यक्त केला. वास्को पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर तर मुरगाव पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक फर्नांडिस फौजफाटासह कंपनी आवारात तैनात होते. त्यामुळे दोन वेळा कंपनी आवारात येण्यापासून अटकाव केलेल्या उपजिल्हाधिकार्यांनी काल सकाळी कसा बसा आत प्रवेश करून जहाजाची पाहणी केली.