म्हादईप्रश्‍नी दिल्लीत उद्यापासून सुनावणी

0
113

>> नाडकर्णीच मांडणार गोव्याची बाजू

 

म्हादई प्रश्‍नी जललवादासमोर महत्वपूर्ण सुनावणीस उद्या मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. तीनही राज्यांना नव्याने सादरीकरण करण्यासाठी दिलेली मुदत संपत असून गोवा, कर्नाटक व महाराष्ट्राने आपापले दावे लवादाला सादर केले आहेत. गोव्यातर्फे माजी ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णीच बाजू मांडणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल डिचोलीत या प्रतिनिधीशी बोलताना दिली. केंद्रातर्फे तसा प्रस्ताव पाठवण्यात आला असून आपण स्वत: याप्रश्‍नी पंतप्रधानाशी चर्चा केली असून त्याबाबतची अधिकृत मान्यता आज सोमवारी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्याची बाजू आजच्या घडीला भक्कम आहे. कर्नाटकाने हरतर्‍हेचे प्रयत्न करताना मध्यस्त व लवादाच्या कक्षेबाहेर प्रश्‍न निकालात काढण्याचा प्रयत्न केला. लवादाकडून गोव्याला अपेक्षित न्याय मिळण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कालव्याचे काम बंद
कणकुंबी येथे कालव्याचे काम पाण्यामुळे बंद ठेवण्यात आले असून सर्व यंत्रसामुग्री हलवण्यात आली आहे. कालव्यांचे काम पूर्ण करून त्यावर मातीचा भराव घालण्यात आला आहे. या परिसरात लोकांना दलदलीचा सामना करावा लागत असून चिगुळे रस्ताही खचला आहे. मंदिर सभागृहाचे काम अद्याप करण्यात आलेले नसल्याने जनता नाराज आहे.
गोवा आक्रमक
गोव्याने म्हादईचा प्रश्‍न गंभीरपणे घेतलेला असून आक्रमपणे बाजू मांडलेली आहे. कर्नाटकांचा रडीचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. गोव्याचे पथक दिल्लीत दाखल झाले आहे. महाराष्ट्राने कर्नाटकाला पाणी वळवण्यास मान्यता द्यावी अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्रही कर्नाटकाच्या बेकायदा कृत्यांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.