उंबरठ्यावर सैतान

0
200

बांगलादेशची राजधानी ढाक्यातील २६/११ धर्तीचा दहशतवादी हल्ला इस्लामिक स्टेटचा दहशतवाद आता भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे याची भीतीदायक चाहूल देतो आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानची सीमा ही देशातील सर्वांत असुरक्षित सीमांपैकी एक मानली जाते. बांगलादेशच्या स्थापनेपासून आजवर लाखो निर्वासित वेळोवेळी भारतात घुसले. आजही हा धोका टळलेला नाही. अशा परिस्थितीत बांगलादेशमधून अशा प्रकारचे प्रशिक्षित दहशतवादी भारतात घुसवणे काही कठीण नाही. बांगलादेशातील गरीबी आणि निरक्षरता पाहाता आयएसआयएसच्या जाळ्यात तेथील तरूण सहज अडकू शकतात. गेली काही वर्षे त्या देशातील इस्लामी धर्मांधता वाढत चाललेली आहे. आधीच बांगलादेशात हिंसाचार ही आम बात आहे. विरोधी राजकीय पक्षदेखील वेळोवेळी हिंसाचाराची मदत घेतात. तेथील शेख हसिना सरकार अस्थिर करण्याचे तर सातत्याने प्रयत्न होत आहेत. याच वातावरणामध्ये दहशतवाद आणि कट्टरतावाद रुजला, फोफावला तर नवल नाही. गेली काही वर्षे बांगलादेशातील धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणार्‍या लेखकांना, विचारवंतांना सातत्याने लक्ष केले जात आहे. पुरोगामी विचार मांडणार्‍या ब्लॉगरना जिवाला मुकावे लागले आहे. अलीकडे हिंदू मंदिरांतील पुजार्‍यांवर सातत्याने हल्ले होऊ लागले आहेत. या सार्‍या चिंताजनक पार्श्वभूमीवर सहा सशस्त्र दहशतवादी बॉम्ब, बंदुका, पिस्तुले आणि तलवारी घेऊन राजकीय दूतावासांच्या गुलशन विभागामध्ये घुसतात आणि तेथील बेकरीवजा रेस्तरॉंवर ‘अल्लाहू अकबर’ च्या घोषणा देत हल्ला चढवतात हे पाहिले तर अगदी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारखीच या हल्ल्याची तीव्रता जाणवते. ‘अमाक’ या आयएसआयएसच्या वृत्तसंस्थेने या हल्ल्यानंतर अत्यंत भीषण अशी छायाचित्रे प्रसृत केली. ज्या ओलिसांना या दहशतवाद्यांनी ठार मारले, ते गोळी घालून मारलेले नाही, तर अत्यंत रानटीपणाने खाटिकासारखे एकेकाचा गळा चिरून मारले आहे. जमिनीवर रक्ताची थारोळी नव्हे, तर अक्षरशः लोट पसरलेले दिसतात. एवढी अमानुषता, एवढा रानटीपणा आज एकविसाव्या शतकामध्ये आयएसआयएसच्या रूपाने मूळ धरतो आहे आणि हे सारे ‘इस्लाम’ च्या नावावर केले जात आहे ही बाब समस्त मुस्लीम जगतासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. ‘रमझानच्या पवित्र महिन्यात रक्तपात घडवणारे हे कसले मुस्लीम आहेत?’ असे उद्गार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिनांच्या तोंडी निघाले ते याच भावनेतून. आयएसआयएस आणि अल कायदा या दोन्ही संघटना वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकमेकांहून स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यामागे लागल्या आहेत. त्यातून अधिकाधिक पाशवी आणि हिंस्त्र हल्ले सातत्याने सुरू झाले आहेत. बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मिळून एक खिलाफत आयएसआयएसने आधीच जाहीर केलेली आहे. या ‘विलायत खुरासान’च्या निर्मितीसाठी स्वतःच्या सशस्त्र सेना बनविण्याचे आणि हे देश काबीज करण्याचे मनसुबे ते रचत आहेत. आजवर हे केवळ कागदावर असायचे, परंतु आता हळूहळू ते प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने आयएसआयएस आणि त्यांच्या देशोदेशी विखुरलेल्या हस्तकांची वेगाने वाटचाल चालली आहे. हैदराबादेत नुकतेच आयएसआयएसचे मॉड्यूल उद्ध्वस्त झाले, परंतु बांगलादेशसारख्या धर्मांधता वाढत चाललेल्या देशामध्ये अशी किती मॉड्यूल्स असतील सांगता येत नाही. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदाय जोवर ठामपणे एकवटत नाही, तोवर असे हल्ले थांबणे शक्य नाही. परंतु आजवर जगातील महासत्ता सोईस्करपणे भूमिका घेत आल्या आहेत. मुंबईवर हल्ला झाला तेव्हाच पाकिस्तानविरुद्ध कडक भूमिका घेतली गेली असती, तर वेळीच तेथील अशा प्रवृत्तींना लगाम बसला असता. परंतु ते घडले नाही. आजही पाकिस्तान भारताजवळ आणखी पुरावे मागते आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय हे मूकपणे पाहतो आहे. अशा विस्कळीत आणि सोईस्कर भूमिकेतून आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे उच्चाटन होईलच कसे? एखादा हल्ला युरोप, अमेरिकेवर झाला काय किंवा दूर भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये झाला काय, ती वेदना जेव्हा प्रत्येकाचे ह्रदय चिरत जाईल आणि हे कोणत्याही देशाविरुद्धचे सैतान नसून मानवतेविरुद्धचे सैतान आहेत हा भाव जागा होईल, तेव्हाच त्याविरुद्ध सर्व शक्तीनिशी लढण्याची प्रेरणा मिळेल. आयएसआयएसच्या फोफावत्या विषवल्लीला अत्यंत कठोरपणे ठेचले गेले नाही, तर आज एकेका देशाला लक्ष्य करीत राहिलेला हा सैतान अत्यंत अक्राळविक्राळ रूपात कधीतरी जगाच्या जिवावर उठल्याविना राहणार नाही!