दंगल करणे आहे

0
224

पाच लाख रुपये द्या, दंगल घडवू असे बिनदिक्कत सांगणार्‍या निर्वाचित लोकप्रतिनिधींचे एक धक्कादायक स्टिंग ऑपरेशन ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने नुकतेच केले. या देशामध्ये लोकप्रतिनिधी किती खालची पातळी गाठू शकतात त्याचे हे विदारक उदाहरण आहे. आपण चित्रपट निर्माते आहोत आणि चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आपल्याला त्याच्या प्रदर्शनाविरुद्ध दंगल घडवायची आहे असे सांगत टीव्ही पत्रकार या लोकप्रतिनिधींना भेटला आणि पाच लाख देत असाल तर पन्नास – साठ माणसे पाठवून दंगा घडवू असे सांगून ते मोकळे झाले. आपल्या देशात पैशापोटी काहीही विकले जाऊ शकते म्हणतात ते खोटे नाही. देशभरात अधूनमधून क्षुल्लक कारणांवरून होणारे वादविवाद, भडकणार्‍या दंगली या मागे काहीतरी षड्‌यंत्र असल्याचा संशय अनेकदा येत असतो. ज्या नियोजनबद्ध तर्‍हेने हे वाद पेटवले जातात, हिरीरीने लढले जातात त्यातून अनेकदा या संशयास जागा राहते. त्यामुळे या स्टिंग ऑपरेशनमधून जेव्हा दंगे घडवण्याची तयारी असलेले लोकप्रतिनिधी भेटतात, तेव्हा आपल्या देशात काय काय घडत असेल याची कल्पना आपण करू शकतो. जातीय दंगा म्हणजे काही लुटुपुटूची लढाई नव्हे. निष्पाप, निरपराध माणसे हकनाक अशा दंग्यांमध्ये बळी जातात, कोट्यवधींची वित्तहानी होते, संसार उद्ध्वस्त होतात, उघड्यावर येतात. हे सगळे जर केवळ राजकारणापोटी घडवले जात असेल तर त्यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात चालली आहे. सगळेच राजकीय पक्ष उत्तर प्रदेशसारखे महत्त्वाचे राज्य सर करण्यासाठी धडपडू लागले आहेत. त्यामुळे अशा तापलेल्या वातावरणात एखादी ठिणगी देखील भडका उडवण्यास पुरेशी ठरू शकते. जेव्हा जातीय भावना तीव्र होतात, तेव्हा अर्थातच मते एकवटली जातात हे सूत्र राजकारण्यांना एव्हाना पुरते ठाऊक झाले आहे. त्यामुळे अशी एकगठ्ठा मते सहजपणे मिळवण्यासाठी जातीय ध्रुवीकरणाचे साधे सोपे ठोकताळे वापरले जाताना आपण पाहतो. कोणताही राजकीय पक्ष याला अपवाद नाही. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुझफ्फनगर दंगल घडली. पिढ्यानपिढ्या एकमेकांसोबत राहत आलेला जाट आणि मुस्लीम समाज एकमेकांच्या जिवावर का उठला? प्रश्न विचार करण्याजोगा आहे. एखादी गैर घटना घडली असेल तर तिला जातीय रंग देऊन भावना भडकावण्याचा जेव्हा राजकारणी प्रयत्न करतात तेव्हा काट्याचा नायटा होणारच. जे असहिष्णुतेचे वाढते वातावरण देशात आज निर्माण केले जात आहे, ते पाहिल्यास आपल्या देशातील राजकारण कोठल्या दिशेने चालले आहे ते कळून चुकेल. प्रस्तुत स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले गेले. परंतु असे लोक प्रत्येक राजकीय पक्षात आहेत. त्यांना सांभाळले जाते. त्यांचा अचूक उपयोग करून घेतला जातो. या प्रवृत्तींना चुचकारण्यामागे त्यांचा केव्हा ना केव्हा आपल्याला उपयोग होईल हेच तर सूत्र असते. नुकतेच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल गोव्यात येऊन गेले. आम आदमी हा भारताच्या राजकीय क्षितिजावर नव्याने उगवलेला पक्ष. राजकीय क्षितिजावर पदार्पण करताना त्यांनी नव्या राजकीय संस्कृतीची रुजवण करण्याचा शब्द दिला होता. परंतु केजरीवाल यांच्या कालच्या गोवा भेटीत काय दिसले? आपल्याजवळ वेळ अत्यंत कमी असूनही त्यांना इफ्तार पार्टीत सहभागी व्हावेसे वाटले, आवर्जून जाऊन आर्चबिशपची त्यांनी भेट घेतली. स्वामींना जाऊन भेटले. म्हणजेच धार्मिक समूहांच्या मतपेढ्यांवर डोळा ठेवून त्यांना जाऊन भेटणे केजरीवालांनाही चुकले नाही. ही आपली राजकीय संस्कृती होऊन बसलेली आहे. लाचखोरी, भ्रष्टाचार, वशिलेबाजी हे जसे आजच्या राजकारणाचे व्यवच्छेदक अंग बनलेले आहे, तसेच असे धार्मिक ध्रुवीकरणाचे आणि एकगठ्ठा मतांचे राजकारणदेखील अपरिहार्य अंग बनून राहिलेले आहे. प्रस्तुत स्टिंग ऑपरेशन हे तर हिमनगाचे वरचे टोक आहे. जेथे मूठभर रुपयांसाठी दंगे भडकावून एकमेकांचा जीव घ्यायला लावणारे ठेकेदार सज्ज असतात, तेथे सहिष्णुता, शांती, सलोखा, प्रेम, संवाद याची शाश्‍वती कोणी द्यायची? राजकारण आज आपल्या समग्र जीवनाला व्यापून राहिलेले आहे. त्यामुळे ‘सत्तेसाठी सर्व काही’ किंवा खरे तर ‘सत्तेसाठी काहीही’ ही आजची सामान्य नीती बनलेली आहे. ‘पाच लाख रुपये द्या, दंगा घडवू’ असे सांगणारे ठेकेदार हे त्याच राजकीय संस्कृतीचा भाग आहेत!