दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अबकारी खात्याला महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडण्याची शक्यता आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत अबकारी खात्याने १२३ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. आचारसंहितेमुळे मद्य उत्पादनावर निर्बंध आल्याने अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले आहे. तसेच अबकारी खात्याला काजूच्या बागायतींचा लिलाव करण्यास अडचण आल्याने सुमारे हजारभर बागायतींचा लिलाव करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यांच्यापासून मिळणार्या महसुलावरही बराच परिणाम झाला आहे.
गेल्या अर्थसंकल्पात सरकारने अबकारी खात्याला १६८ कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. गेल्यावर्षी खात्याने १३९ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. राज्याला महसूल मिळवून देणारे अबकारी हे महत्त्वाचे खाते आहे.