करमल घाटाच्या अलीकडे मडगाव पोळे रस्त्यापासून सहा ते सात किलोमिटर आतमध्ये शिर्ले बार्शे ही अतिग्रामीण डोंगराळ जागा आहे. या ठिकाणी चिमूट वेळीप यांची स्टोन क्वारी आहे.
काल दुपारी डोंगरावरील दगड फोडण्यासाठी जमिनीलगत भोक पाडून स्फोटके टाकण्याची व्यवस्था करण्यात येत होती. हे खोदकाम चालू असतानाच ५० ते ६० मीटर उंचीचा डोंगर अचानक खाली कोसळला व तिघे ढीगार्याखाली सापडले. याठिकाणी आणखी चौघे जण कामगार होते मात्र ते काही अंतरावर असल्याने बचावले.
तिघे गाडले गेल्याचे समजताच गावचे शेकडो लोक घटनास्थळी पोचले. ते ढीगारा उपसण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा माती कोसळू लागल्याने ते तेथून दूर झाले.
दरम्यान, घटनेबाबत समजताच दक्षिण गोवा आपत्कालीन विभागाचे अधिकारी, पोलीस अधीक्षक शांबा सावंत, कुंकळ्ळी व केपे पोलीस, उपजिल्हाधिकारी, अग्नीशामक दल घटनास्थळी पोचले. आमदार बाबू कवळेकर व प्रकाश वेळीप हेही तेथे पोचले.
यावेळी गावकर्यांनी स्टोन क्वारीचा मालक चिमूट वेळीप याला घटनास्थळी आणण्याची मागणी केली. रात्री उशीरा जेसीबी मशीन व इतर सामुग्री तेथे पोचली होती. तिघे कामगार मृत्यू पावल्याची दाट शक्यता आहे.