Home बातम्या नववर्षाच्या ताटात काय?

नववर्षाच्या ताटात काय?

0

नववर्ष आले. भिंतीवर नवे कॅलेंडर लटकले. आता त्याची पाने उलटताना आपल्यापुढे काय काय नवे वाढून ठेवले असेल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असेल. गेेले वर्ष घोटाळ्यांचे वर्ष ठरले, पण त्याचबरोबर राष्ट्रचेतना जागवणारेही! बाबा रामदेव, अण्णा हजारे यांच्या आंदोलनांनी उदासीन देशाला गदागदा हलवण्याचा थोडाफार प्रयत्न केला. त्या आंदोलनांतून हाती काही लागलेले नसले, तरीही भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आम आदमीला नैतिक बळ नक्कीच दिले आहे. नव्या वर्षात ‘लोकपाल’चा विषय पुन्हा ऐरणीवर येईल. भारतीयांच्या विदेशातील काळ्या पैशाचा प्रश्नही केंद्रस्थानी येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच देशापुढील पाच आव्हानांचा मुकाबला करण्याचा विचार पंतप्रधानांनी बोलून दाखवलेला आहे. अर्थात, धृतराष्ट्रासारखे अवतीभवती घडणार्‍या पापांकडे दुर्लक्ष न करता, आपला संकल्प कृतीत उतरवण्याची धमक ते दाखवतील अशी आशा करूया. गोव्यासाठी हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. ही धामधूम आटोपेपर्यंत तीन महिने जातील.

त्यानंतर तरी या राज्याला स्थैर्य देणारे नवे स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार मिळावे. गेल्या वर्षभरात विद्यमान सरकारचे धिंडवडे काढणारी अनेक प्रकरणे उद्भवली. शैक्षणिक माध्यम प्रश्नापासून प्रादेशिक आराखडा आणि खाण घोटाळ्यापर्यंत आणि मये मुक्तीपासून मलेरिया कर्मचार्‍यांपर्यंत नानाविध विषयांनी गोव्याचे लोकमानस ढवळून निघाले. येणारे नवे सरकार या आव्हानांना योग्य प्रकारे सामोरे जाईल अशी अपेक्षा जनता ठेवून असली तरी नव्या बाटलीत जुनीच दारू भरली जाण्याची शक्यता अधिक दिसते. शैक्षणिक माध्यमाचा प्रश्‍न न्यायालयसन्मुख असल्याने आज जरा बाजूला पडल्यासारखा दिसत असला, तरी तो पुन्हा केंद्रस्थानी येणारच आहे, कारण हा विषय आपल्या सांस्कृतिक जीवनाशी निगडीत आहे. प्रादेशिक आराखड्यासंदर्भात गावोगावी उठलेली धूळ सहजासहजी खाली बसणारी नाही. जनतेच्या तक्रारींची दखल घेतल्यावाचून कोणत्याही सरकारला पुढे जाणे अशक्य असेल. खाण घोटाळ्यासंदर्भातील शाह समितीच्या अहवालासंदर्भात सरकार कोणता पवित्रा घेते तेही महत्त्वाचे ठरणार आहे. नववर्षामध्ये तो विषय पुन्हा भडकल्यावाचून राहणार नाही. आर्थिक बाबींचा विचार करता गतवर्षी महागाईने जनतेला पुन्हा पुन्हा होरपळविले. जीवनावश्यक वस्तूंच्या दरांपासून पेट्रोल आणि रोजच्या दुधापर्यंत सर्व वस्तूंची भाववाढ मुकाट्याने सोसण्यावाचून जनतेला पर्याय नव्हता. नववर्षामध्ये हे दर स्थिर राहतील याची काहीही शाश्‍वती नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेनंतर युरोपमध्ये मंदीचा तडाखा गतवर्षी बसला. अमेरिकेसारख्या देशातही बेरोजगारीची समस्या बिकट रूप धारण करून आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आऊटसोर्सिंगच्या नाड्या आवळण्याच्या प्रयत्नात तो देश आहे. तसे घडले तर भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला आलेली समृद्धीची सूज उतरू शकते. तंत्रज्ञानाच्या क्षितिजावर वेगवान घडामोडी नववर्षात घडणार आहेत. दूरसंचार क्षेत्रात गतवर्षी आपण टूजीकडून थ्रीजीकडे वळलो. लॅपटॉप आणि नेटबुकची जागा टॅब्लेटनी घेतली. ‘आकाश’ ने नवा इतिहास रचला. फोनच्या ऐवजी सामान्यांच्या हाती स्मार्टफोन्स आले. ऍँड्रॉईडच्या अधिक अद्ययावत आवृत्त्या निघाल्या. या वर्षी एचटीसी, सॅमसंगसारख्या कंपन्या आपल्या स्मार्टफोन्स आणि टॅब्लेटमध्ये भारतीय भाषांचे इनपूट देणार आहेत ही आशादायक बाब आहे. ‘फेसबुक’ सारख्या सामाजिक नेटवर्किंग माध्यमांनी गतवर्षी अनेक देशांमध्ये राजकीय जागृतीची ऐतिहासिक कामगिरी बजावली. विघटित कुटुंबव्यवस्थेतून एकमेकांपासून तोडल्या गेलेल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी अशा माध्यमांचाच आधार आता घ्यावा लागणार आहे. येणारे वर्ष हे कन्व्हर्जन्सचे वर्ष असेल. एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमाकडे वळण्याचे हे वर्ष असेल. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक आधार आपल्या रोजच्या जीवनात घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे तशी केवळ संगणकसाक्षर नव्हे, तर नव तंत्रज्ञान साक्षर पिढी आपल्याला घडवायची आहे. भविष्याची ही सारी आव्हाने पेलण्याची पहिली पायरी म्हणूनच या वर्षाकडे आपल्याला पहावे लागेल. सज्ज व्हावे लागेल.