काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना फटकारले
जम्मू-काश्मिरातील पीडीपी आणि भाजप यांचे संयुक्त सरकार कोणाच्याही वक्तव्यांनुसार चालणार नसून ते किमान समान कार्यक्रमानुसार काम करणार आहे. जम्मू-काश्मिरच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नाही असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना काल फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वरील उद्गार काढले. जम्मू-काश्मिरात भाजप-पीडीपी सरकार स्थापन झाल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री सईद यांनी काश्मिरात शांततेत पार पडलेल्या निवडणुकांचे श्रेय पाकिस्तान, हुरियत तसेच दहशतवाद्यांना दिल्याने संसदेत गेले दोन दिवस विरोधकांनी सरकारची कोंडी केली होती. त्याबाबत मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
काश्मीरच्या जनतेने विकास आणि बदलासाठी कौल दिला असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, काश्मिरातील सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालणार आहे. दहशतवादाला कदापि खतपाणी घातले जाणार नसून देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाने केलेल्या विधानांना आम्ही स्पष्टोक्ती देणे ही सरकार चालवण्याची कार्यपद्धती नसल्याचे सांगून जनतेच्या सुरक्षेविषयी सरकार कोणतीच तडजोड करणार नसल्याचे मोदी म्हणाले. यूपीएने वाजपेयी सरकारच्या योजनांची कॉपी करून योजनांची केवळ नावे बदलली, असा टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकार कॉर्पोरेट व श्रीमंतांसाठी असल्याचा विरोधकांचा आरोपही मोदी यांनी ङ्गेटाळून लावताना गरिबी उच्चाटनाचे सरकारचे लक्ष्य असल्याचे सांगून अर्थसंकल्पात अनेक योजनांची तरदूत करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. स्वच्छ भारत, जन धन योजना, गंगा शुद्धीकरण अभियान आदी केवळ श्रीमंतांसाठी आहे का? असा प्रश्न करून मोदी यांनी विरोधकांची तोंडे बंद केली.
भूसंपादन विधेयकात योग्य ते बदल करण्याचे संकेत देत या कायद्याच्या बाबतीत जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांनी थांबवावे असे आवाहनही यावेळी मोदी यांनी केले.