– विराज विजय जोग, सुर्ल
आम आदमी पक्षाचा विजय हा दिल्लीकरांना एक नवीन आशेचा किरण दर्शविणारा वाटतो. या बदलामधून काही तरी नवीन घडेल या अपेक्षेने लोकांनी भरघोस बहुमताने सरकार निवडून दिलेले आहे. प्रत्येक वेळी एक भाबडी आशा जनतेला असते की, निदान आता तरी आपली काळजी करणारा कोणी आहे, जो आम्हाला समजून घेऊन वागेल. आमच्या छोट्या छोट्या इच्छा – आकांक्षा पूर्ण करेल. हा सकारात्मक विचार करणारी माणसे आहेत म्हणून तर लोकशाही टिकून आहे.
आम आदमी पक्षाला याच जोरावर दिल्लीत भरघोस बहुमत मिळाले आहे. आता या सरकारचे उत्तरदायित्व बनते की, त्यांनी जी आश्वासने दिल्लीकरांना दिलेली आहेत ती पूर्ण केली पाहिजेत. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला पूर्ण बहूमत असल्यामुळे आता अधिक सबबी चालणार नाहीत हे पक्के ध्यानात ठेऊन वाटचाल करण्याची आज गरज आहे. केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही, आमची अडवणूक केली जाते, त्यांच्याहून आम्ही चांगले काम करू म्हणून ते पुरेसा निधी उपलब्ध करीत नाहीत वगैरे सबबी जास्त काळ चालणार नाहीत. आताही रामलीला मैदानावर धरणे लोकांना अपेक्षित नाहीत. आता गरज आहे ती कृतीची. आम आदमी पक्षाकडून यावेळी जर अपेक्षाभंग झाला तर पुन्हा जनतेचा भ्रमनिरास होईल यात शंकाच नाही. काही जण त्यांच्या विरोधात जातील तर काही जण त्यांचे समर्थन करतील. पक्षाकडून स्वतःचे जोरदार समर्थन होईलच, उलटपक्षी बाकी पक्षांहून आपण कसे सरस आहोत याची पावतीही दाखवतील यात मुळीच शंका नाही.
आम्ही कोणकोणत्या गोष्टी इतिहासात पहिल्यांदाच घडवल्या याचा लेखाजोखा मांडण्यात येईल. आमच्यामुळे कोणकोणते नवीन पायंडे घातले गेले, अशा व तत्सम कथा ऐकवल्या जातील. पुन्हा आरोप-प्रत्यारोप होतील व यात पुन्हा भरकटेल ती जनता. जनतेचाच चेंडू करून टोलवण्यात येईल आणि या सगळ्या शिमग्यात चीत होईल ती ही जनताच.
मग अजून एक कोणी तरी ‘जनतेचा कैवारी’ उत्पन्न होऊन नवीन स्वप्ने दाखील. मग पुन्हा जनतेच्या भावनांशी खेळ मांडून पुन्हा नवीन खेळ मांडणार. असे किती वर्षे चालणार?
६६ वर्षे झाली आता. अजून किती काळ जनतेला संयम बाळगावा लागेल? प्रत्येक सरकार आश्वासीत कामे न होण्यामागे कोणती तांत्रिक कारणे होती हे अगदी बेंबीच्या देठापासून समजवण्याचा प्रयत्न करते. त्यात बरेचसे तथ्य असेलही, पण आश्वासने देण्याअगोदर ही कल्पना त्यांनाही असतेच. तरीही लोकांच्या भावनांशी खेळणे हा प्रत्येकाचा आवडता छंद.
माझ्या मते आम आदमी पक्षाकडूनही मोठी अपेक्षा ठेवणे धाडसाचेच ठरेल. याचा प्रत्यय काही दिवसांतच येईल, कारण गेल्या ६५ वर्षांच्या जनतेच्या अनुभवावरून या व्यवस्थेतून मोठे काही घडेल ही कल्पनाच कठीण वाटते.
कायदे असे व्हायला हवेत की, जेथे भारतीय मान्यता, समाज आणि सरकार यांचे द्वंद्व होणार नाही. आजच्या कायद्यांमुळे समाज व सरकार यांत कायम द्वंद्वागत स्थिती असल्याते भासते. हे काही ठीक नाही. म्हणून तर प्रत्येक सरकारविरूध्द आंदोलने, मोर्चा वगैरे निघताना दिसतात व त्यातून सत्ताबदल होऊन फक्त सत्ताधीश बदलतात. कायदे व यंत्रणा तीच असते. त्यामुळे समाजाचे भले होण्याच्या इच्छा आकांक्षाचा काहीच फायदा होताना दिसत नाही. परंतु इतिहासात मात्र आपल्याच राज्यकर्त्यांविरुद्ध असे चित्र बहुतेक दुर्मिळच असावे असे माझ्या वाचण्यातून तरी मला जाणवले.
अशा व इतर तत्सम गोष्टींचा आढावा घेतल्यास आणि त्याप्रमणे कायदे केल्यास आजची स्थिती बदलण्यास मदतच होईल. तत्पूर्वी व्यक्ती, पक्ष व सत्ता याहून देश फार मोठा आहे ही भावना असणे खूप जरुरीचे आहे हे विसरून चालणार नाही. इतिहासात आपण वाचले असेल की संपूर्ण देशापेक्षा प्रत्येक राजाला आपले राज्य महत्त्वाचे वाटत होते म्हणून भारताला पारतंत्र्य स्विकारावे लागले. तीच स्थिती आजही जाणवते. प्रत्येक पक्षाला देशापेक्षा आपला नेता, आपला पक्ष व आपली सत्ताच चमत्कार करू शकते हेच पुढे रेटायचे असते. अशा स्पर्धांमुळेच आजची स्थिती ओढवली आहे हे वास्तव आपल्याला स्वीकारावेच लागेल व प्रत्येक पक्षाचे जे जे चांगले कार्य असेल, ते ते आदर्श मानून काम करणे उपयुक्त ठरेल.
या सर्वाचे तात्पर्य एवढेच निघते की, प्रत्येक भारतीय मूल्ययुक्त, सुरक्षित व आनंदी जीवन जगू शकेल हेच उदिष्ट समोर ठेऊन व्यवस्थेत बदल करणे आवश्यक आहे. नाही तर लोकांकडून लोकशाही विरूध्द बंडाची तलवार उगारण्यात येऊ शकते. असे झाल्यास तो आपला पराभव असेल व लोक आजच्या सत्ताधिशांहून इंग्रज बरे असे म्हणू लागल्यास तो क्षण भारतीय स्वातंत्र्यासाठी झटलेल्या सैनिकांसाठी व भारतमातेसाठी अत्यंत दुर्दैवी असेल!