– गंगाराम म्हांबरे
कॉंग्रेसला तशी बंडाची वानवा नाही! श्रीमती इंदिरा गांधी यांनी कॉंग्रेसला ‘सिंडिकेट’पासून वाचविण्यासाठी बंड केले होते. अलीकडे काही राजकीय निरीक्षकांनी असे सुचविले आहे की, कॉंग्रेसला आता केवळ बंडच वाचवू शकेल! अर्थात बंड करायला जे धैर्य लागते ते सध्याच्या कोणत्या नेत्यामध्ये आहे, असा प्रश्न पडावा एवढी दयनीय स्थिती या पक्षाची झाली आहे. दिल्लीचे सोडा, गोव्यातील कॉंग्रेसमधील दुहीचे दर्शन पणजी पोटनिवडणुकीनिमित्त जनतेला घडले. कॉंग्रेसचे आमदार बाबूश मोन्सेरात हे शरिराने त्या पक्षात असले तरी मनाने भाजपमध्येच आहेत. जसे माविन गुदिन्हो हे अनधिकृतपणे भाजपचेच आमदार आहेत! याची कारणे हा वेगळा व स्वतंत्र विषय आहे. कोणाला कोणत्या आरोपातून मुक्त व्हायचे आहे, ते जनता पूर्णपणे जाणतेच. आश्चर्याची बाब म्हणजे कॉंग्रेसचे असे वेगळे मतदारच गोव्यात (आणि देशातही) राहिलेले नाहीत, तर जे मतदार कॉंग्रेसला मतदान करतात, ते त्या नेत्यांचे मतदार असतात! बाबूश मोन्सेरात हे सांताक्रुझ अथवा ताळगावला आपले उमेदवारही सहजपणे निवडून आणू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. याचाच अर्थ मतदारांची व कार्यकर्त्यांची निष्ठा व्यक्तीशी असते, पक्षाशी नव्हे. मतदार अलीकडे असाच कोणा तरी नेत्याच्या आहारी गेलेला असतो, अर्थात त्यामागील कारणेही सर्वश्रुत आहेत. पक्षबांधणी अथवा जनजागृती किंवा लोकआंदोलने यांना रामराम केलेल्या कॉंग्रेस नेतृत्त्वाला इतर जाणीव नसेल मात्र या वस्तुस्थितीची कल्पना नक्कीच आहे. याच कारणामुळे पक्षविरोधी कारवाया खपवून घेण्यावाचून दुसरा पर्यायच नेतृत्त्वासमोर नसतो. ज्या ठिकाणी पक्ष उमेदवार ठरवतो, तेथेच संघटना वाढते. गोव्यात मात्र उमेदवारच आपला मतदारसंघ ठरवतो, त्यावर पक्ष शिक्कामोर्तब करतो! असे उमेदवार हे पक्षाचे कधीच नसतात हे केवळ बाबूश मोन्सेरातच नव्हे तर अन्य काही मतदारसंघांत दिसून आले आहे. अशी जहागिरदारी अथवा संस्थाने नेत्यांना प्रदान करण्याची ज्यावेळी सुरवात झाली, त्याचवेळी राजकीय पक्षांना ओहटी लागली.
गोव्यात तर याची उदाहरणेे अनेक आहेत. अशा नेत्यांच्या वाटेला जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, कारण त्या ठिकाणी पक्षसंघटना नसते, तर त्या नेत्याचा तो किल्ला असतो, तेथे त्याचीच हुकमत चालते. हे लोकशाहीतही घडते, यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते?
गोव्यात शिस्तभंगाची कारवाई कोणावर व कोण करणार,असा प्रश्न विचारला जात असतानाच बाबूश यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे प्रदेश कॉंग्रेसने ठरविले आहे. असे असले तरी ज्यांनी विरोधकाची भूमिकाही धड बजावलेली नाही, जे आक्रमक बनून सुस्त सत्ताधीशांना जागे करू शकत नाहीत, ते दुसर्यावर काय काठी मारणार? उन्माद आणि अहंकार यावर दिल्लीसारखा ‘उपचार’ जनताच करते, हेही दिसून आले आहे! पण कॉंग्रेस नेत्यांवर अंकुश कोणाचा? किमान पक्षाध्यक्ष व उपाध्यक्ष तरी कठोरपणे वागू शकतात का? आज या दोन नेत्यांचीच निष्क्रियता हाच राजकीय निरीक्षकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्र गेले, झारखंड गेले, त्यानंतर दिल्लीत सपाट झाले, तरी गोव्यात एक पोटनिवडणूक एकदिलाने लढविण्याची सुबुद्धी पक्षाला झाली नाही, कारण दिल्लीतील कंट्रोल कमकुवत झाला आहे. त्याविरुद्ध बंड करण्याची हिंमत नेत्यांमध्ये नाही, कारण आत्तापर्यंत नेहरू-गांधी घराण्याच्या क्षत्रछायेखाली वावरायची सवय नेत्यांना झाली आहे. प्राणवायूच गेला तर जगायाचे कसे? प्राणवायूच काढून टाकला तर आपला जीव जाईल ना! शेवटी नेता हाही माणूसच आहे आणि प्रत्येक माणूस हा सवयीचा गुलाम आहे. गांधी घराण्याशिवाय कॉंग्रेस ही कल्पनाच करता येणार नाही, असे नेत्यांना वाटते. हे घराणे इंदिराजीनंतर कसे दिशाहीन बनले आणि त्यामुळे कॉंग्रेसची धुळधाण कशी झाली, हे जनता पाहातेच आहे. असे असले तरी बंडखोर बनून पक्ष वाचवायची कुवत एकाही नेत्यामध्ये नाही, हे त्या पक्षाच्या दुर्दशेचे कारण मानता येईल.
जयंती नटराजनसारख्या नेत्याने केलेली टीका ही पश्चातबुद्धी मानली जाते. ती निराशेतून केलेली टीका मानली जाते. मध्यंतरी चिदंबरमपुत्र कार्ति यांनी आवाज उठविला, पण तो विरूनच गेला. ज्यावेळी जनतेचा पाठिंबा असलेला नेता अकार्यक्षम नेतृत्त्वाविरुद्ध बंड करतो, त्याचवेळी पक्षहित साधते.असे नेते कॉंग्रेसमध्ये बोटावर मोजता येतील एवढेच आहेत, मात्र ते एकत्र येऊन बंड करण्याच्या स्थितीत नाहीत. शरद पवार यांच्या ताकदीचा नेता या पक्षात राहिलेला नाही. ममता बॅनर्जींसारखी आक्रस्ताळेपणा करणारी बुलंद आवाजाची महिला त्या पक्षात नाही! या दोघांच्या बंडांचे स्वतंत्र पक्षात रुपांतर झाले कारण त्या नेत्यांची तेवढी क्षमता होती. असे भविष्यातही कॉंग्रेसमध्ये घडेल, असे वाटत नाही. याच कारणामुळे ‘प्रियंका लाव, कॉंग्रेस बचाव’असे नारे देत गांधी घराण्याकडेच आशेने पाहाणारे नेते निपजतात.
ज्या पक्षात खंबीर नेतृत्त्व नाही, वेगवान निर्णय घेण्याची क्षमता नाही, तो पक्ष कसा वाढेल, कसा टिकेल? पुन्हा मुसंडी मारुन पुढे येऊ, असे म्हणणारे खरेच पर्याय देऊ शकतील? गोव्यात तिसरा प्रबळ पक्ष तयार झाला तर कॉंग्रेसवर मुक्तीनंतर जी परिस्थिती ओढवली होती, तशीच अवस्था निर्माण होईल. उत्तर गोवा तर काही अपक्ष वगळता भाजपच्या कह्यात गेला आहे. सध्या सत्तेजवळ राहणारे मतदार नंतर कधीतरी विचार बदलतील, त्यावेळी दुसरा कोणता पक्ष त्यांच्यासमोर येईल? कॉंग्रेस सावरण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. नऊ आमदारांचा आकडा अठरा करायचा की पाचवर आणायचा याचा निर्णय जनता घेईलच. किमान समोर पर्याय तर असायला हवा. सत्ताधीशांविरुद्ध असणारा असंतोष निवडणुकीत व्यक्त होतोच, पण त्यासाठी दुसरा पक्ष असावा लागतो. म.गो.ची ताकद वाढू शकते, पण दक्षिण गोव्यात त्या पक्षाला फारसा वाव नाही. तरीही काही जागा पटकावण्याची त्या पक्षाची तयारी सुरू आहे. भाजप व मगोची व्होटबँक एकच असल्याने हे पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळू शकतो. पण निवडणुकीवेळी राज्यव्यापी सबळ व व्यापक प्रादेशिक पक्ष अशी प्रतिमा असणारा कोणताही पक्ष जनतेसमोर आल्यास मतदार नक्कीच फेरविचार करतील. अशी शक्यता कितपत आहे, हे भविष्यकाळच सांगू शकेल. भाजप, कॉंग्रेस सोडून अन्य कोणता पक्ष जनतेला ‘आपला’ वाटतो हे त्यावेळीच स्पष्ट होईल.