– अशोक पार्सेकर, कोडार – फोंडा.
येत्या १९ डिसेंबर रोजी आपण गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा साजरा करणार आहोत. स्वातंत्र्याची पन्नास वर्षे भुर्रकन् संपली आणि आपण अर्धशतकाच्या उंबरठ्यावरदेखील येऊन पोहोचलो. आता मागे वळून इतिहासाचे अवलोकन केल्यास अनेक बर्यावाईट घटनांचा आलेख नजरेसमोर येतो. विकासाची अनेक कामे झाली आहेत. तरीही गोव्याच्या दुर्गम भागांतील अनेक खेड्यांत राहणार्या तळागाळातील सामान्य माणसासाठी विकासाची दारे अजूनही उघडायची आहेत. अद्यापही अज्ञानाचा अंधःकार अनेक खेड्यांत दाटून आहे. अनिष्ट प्रथा आणि परंपरांतून लोकजीवनावर मरगळ पसरत आहे. काही दुर्गम भागांत अजूनही सडकांचे जाळे विणायचे आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून अजूनही सामान्य माणूस वंचितच आहे. शासनाने ज्या इमारती उभ्या केल्या आहेत, त्यातील अनेक इमारती आज कोसळण्याच्या मार्गावर आहेत.
शहरी भागांत व काही निमशहरी विभागात शिक्षणाच्या सोई वाढल्या. शेतकर्यांची मुले शिक्षित किंवा अर्धशिक्षित झाली. काही सुशिक्षितही झाली, पण आपल्या संस्कृतीपासून दुरावली. आपल्या कृषिसंस्कृतीच्या पूर्ववैभवाकडे पाठ फिरवून ती लोकवस्तीने वाढलेल्या आणि सर्वच दृष्टीने बकाल झालेल्या शहरातून महागडे फ्लॅट खरेदी करून राहू लागली. परिणामी खेड्यातील घर, गोठा, परसबाग, शेतीवाडी व बागायती ओस पडू लागल्या. एकवेळ शहरात साचलेल्या कचर्याच्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जाईल, पण तरूण पिढी आपल्या शेतातील चिखलात पाय ठेवायला तयार नाही.
औद्योगिक वसाहतीतील तुटपुंज्या पगारावर काहींना संसार चालवणेही अशक्य असते, तरीही शहराची ओढ त्यांना असते. शेती, बागायती, दुग्धोत्पादन व अन्य पारंपरिक व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने खेड्यातील पूर्ववैभवच नष्ट होत चालले आहे. भंगारअड्ड्यांंचा पसारा खेड्यात वाढून शेतजमिनीवरही अतिक्रमणे वाढवण्यास गावोगावचे लफडेबहाद्दरच परप्रांतियांना फूस देतात. याद्वारे पंचायतींनाही मिळकत मिळते. हा विषय मागे विधानसभेतही गाजला होता. यावेळी अशा भंगार अड्ड्यांना औद्योगिक वसाहतीत हलवण्याचे ठरले होते. पण त्याची कार्यवाही अद्यापही झालेली नाही. जेथे जाल तेथे भंगारअड्डे असेच खेड्यांतील चित्र आहे. ते आता तरी बदलले पाहिजे.
मये हा गाव अजून कस्टोडियनच्या अधिपत्याखाली असून या पोर्तुगीज अवशेषांपासून अद्याप मयेवासीयांना मुक्तता लाभलेली नाही. गोवा स्वतंत्र झाला तरीही मयेवासीयांना स्वातंत्र्याची फळे चाखायला मिळत नाहीत. मुक्तीसंग्रामाच्या दिशेने मयेवासीय वाटचाल करीत आहेत. निवडणुका जवळ आल्यावर राजकारणी कैक आश्वासने देत असतात. मयेवासीयांनी यापुढे राष्ट्रपतींकडे या प्रश्नावर दाद मागून कस्टोडियनांचा मयेतील अधिवास मोकळा करण्याची गरज आहे.
कायदेशीर आणि बेकायदा खाण उद्योगांचा प्रश्न सध्या गोव्यात चव्हाट्यावर येऊन गाजत आहे. सध्याच्या राजकारणात या प्रश्नाचे काय होईल हे ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही. लाखो लोकांचा या व्यवसायावर उदरनिर्वाह होतो, हे खरे असले तरी पर्यावरणाची आणि मानवी आरोग्याची होणारी हानी त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मराठी – कोंकणी राजभाषा आणि प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हा प्रश्नही अद्याप रेंगाळतच आहे. प्रादेशिक विकास आराखड्यातही हवे तसे बिल्डर लॉबीचेच हित सांभाळण्याचा प्रयत्न होत आहे.
महागाईने तर कहरच केला आहे. सर्वसामान्य लोकांना पोटाची खळगी कशी भरावी हाच प्रश्न असतो. कित्येक भूकबळीही गेले असतील. त्याची कुणाला जाणिवही नसेल. गावातील भामटे काही शेतकर्यांच्या जमिनीही आडदांडगिरी करून हडप करतात, त्यांना गजाआड करून योग्य ती शिक्षा देणे भाग आहे. अशा अतिक्रमणांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखायलाही हवी. लोकशाहीत बेबंदशाही, सरंजामशाही, हुकूमशाहीची लागण होऊन जनजीवन हैराण झालेले आहे.
कायदा आयोगाला आपले कार्य मुळापासून हाती घ्यावे लागेल. गावागावात भूसर्व्हेक्षणाची नोंद पारदर्शी ठेवावी लागेल. भूसंपादनासंदर्भात जमिनीचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. कुळ – मुंडकारांचा प्रश्न गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे झाली तरी सुटलेला नाही. केवळ निवडणुकांवर लक्ष ठेऊन राजकीय नेत्यांनी कुळांनाच संरक्षण पुरवले. अनेक प्रकरणे न्यायदरबारात पडून आहेत. हा गंभीर स्वरूपाचा प्रश्नही अद्याप सुटू शकलेला नाही.
सुसंस्कृत आणि सुशिक्षित तरूणाईला असे अनेक प्रश्न गोव्यात साद घालीत आहेत. विष्णू सूर्या वाघ यांनी एकदा म्हटले होते, ‘‘ अन्याय घडो कुठेही, पेटून उठू आम्ही…’’ त्यांच्या या विचारातून तरूणांनी अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पेटून उठले पाहिजे. गावोगावच्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. सरकारलाही गंभीर आणि प्रलंबित प्रश्नावर सामुहिकरित्या जाब विचारायला हवा.
आपल्या गोव्यात कृषीसंस्कृतीचे पूर्ववैभव पुन्हा एकवार मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारलाही प्रत्यक्ष कृती करण्यासाठी भाग पाडायला हवे.
शहरातील तसेच गावागावातील तंटे, वाद, मिटवून गोवा हे छोटे पण आदर्श राज्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हायला हवेत. अनेक ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या स्वातंत्र्याची फळे सर्वांना समानतेने चाखायला मिळाली पाहिजेत.