Home बातम्या भजनी परंपरेचा शिलेदार

भजनी परंपरेचा शिलेदार

0

गोमंतकाच्या अस्सल सांस्कृतिक परंपरेचा वारसा अभिमानाने मिरवीत आलेले आणि तो नव्या पिढीच्या हाती सोपवण्यासाठी दिवसरात्र जिवाचे रान करणारे नामांकित भजनी कलाकार नाना शिरगावकर यांच्या निधनाने गोव्याच्या सांस्कृतिक जगतामध्ये खरोखरच एक पोकळी निर्माण केलेली आहे. ज्यांनी भजनी परंपरेची रुजवण खेडोपाडी करून गोव्याचे ज्ञानोबा – तुकोबांशी असलेले अतूट नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले, त्या स्व. मनोहरबुवांचे सुपुत्र असलेल्या नाना शिरगावकरांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये भजन आणि संगीत यांचीच साधना केली. तर्‍हेतर्‍हेची सांस्कृतिक आक्रमणे आज चहूबाजूंनी होत असतानाही निष्ठेने भजनीकलेचा आणि पारंपरिक संगीताचा हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अविरत कार्यरत होते. एक प्रकारचा हा निदिध्यासच त्यांनी बाळगला होता. टाळ – मृदुंगांच्या गजरामध्ये मिळणार्‍या भजनानंदापेक्षा मोठा आनंद दुसर्‍या कशातही नाही यावर ठाम विश्वास असलेल्या नानांनी आजीवन निष्ठेने आपल्या पित्याचे अपुरे राहिलेले कार्य पुढे चालवले. सवंग, स्वस्त मनोरंजनाच्या नव्या माध्यमांनी भजने, कीर्तने यांची समृद्ध परंपरा खंडित होऊ घातली आहे.

अशा वेळी गोव्याच्या खेड्यापाड्यांमधून आजही जे कोणी कलाकार वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करून धडपडत असतात, त्यांच्या पाठीशी नाना सदैव असायचे. मानधनाची फिकीर नव्हती, मानापमानाची चिंता नव्हती. सदैव संगीतसाधनेत दंग असलेली आणि सर्व तर्‍हेच्या वादविवादांपासून नेहमीच चार हात दूर राहात आलेली अशी ही व्यक्ती होती. स्वतः एक कलाकार असल्याचा अहंकारी दर्प त्यांना कधीही शिवला नाही यातच त्यांचे मोठेपण दडलेले आहे. वादविवादांपासून कटाक्षाने दूर राहून आपले कार्य निष्ठेने करीत आलेले नाना जेव्हा गोव्यामध्ये शैक्षणिक माध्यमाचा प्रश्न उभा राहिला, देशी भाषांची गळचेपी करायला सरकार धजावले, तेव्हा आपल्या टाळ – मृदंगासह त्या आंदोलनास साथ देण्यास कचरले नाहीत. मराठी – कोकणीचा गजर करीत भजनी कलाकारांनी पणजीचे आझाद मैदान दुमदुमवून सोडले, तेव्हा त्यात नानाही आघाडीवर होते. जेथे आजही मांस – मद्य निषिद्ध आहे, अशा शिरगावच्या श्री लईराईच्या पवित्र परिसरात बालपण गेलेेले आणि पित्याच्या भजनकलेचा श्रवणानंद घेत घेत मोठे झालेले नाना त्या परंपरेचे पाईक ठरले तर नवल नव्हे. सातत्याने आपल्या जीवनात त्यांनी हा वारसा पुढे चालवला आणि आपल्या मुलांपर्यंतही पोहोचवला. मांगल्याची ओढ असलेला हा कलाकार सदैव आपल्या धुंदीत असे. ओठांवर भजनाचे सूर असत. उंचेपुरे राजबिंडे व्यक्तिमत्व लाभलेल्या नानांची टापटीप आणि वागण्या – बोलण्यातील अदब पाहणार्‍याच्या मनावर त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि सद्भिरुचीची छाप टाकून जात असे. गोव्याच्या मातीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे भजनी परंपरा जोपासत या भूमीमधील सांस्कृतिक प्रदूषण शुद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. अशा कलाकारांचे नाना हे प्रेरणास्त्रोत होते. गोव्याच्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सवी सोहळा उंबरठ्यावर आलेला असतानाच नानांचे असे अचानक निघून जाणे ही गोमंतकीयांच्या काळजावर ओरखडा उमटवून जाणारी गोष्ट आहे. नाही तरी सध्या सुरू असलेल्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात गोमंतकीय कलाकारांना स्थान आहेच कुठे? ज्यांचे येथील संस्कृती, परंपरेशी काही देणेघेणे नाही अशांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाडोत्री रतीब सुरू असलेला पाहणे त्यांना क्लेषदायीच ठरले असते. नाना मध्यंतरी खूप आजारी होते, त्यांनी पंच्याहत्तरी गाठली होती हे सारे ठाऊक असले तरी त्यांचे असे निघून जाणे हा गोमंतकीय भजनप्रेमींसाठी आणि गावोगावी विखुरलेल्या संगीत कलाकारांसाठी मोठा धक्का आहे. त्यांचा एक प्रमुख मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत कायमचा दूर गेला आहे. असे अनेक कलाकार आज हळूहळू वृद्धत्वाकडे झुकू लागले आहेत याची खंत वाटते. नव्या पिढीतून भजनी परंपरेचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर पेलू पाहणारे अनेक लोक या जाणार्‍या पिढीने घडवले आहेत हीच काय ती दिलासादायक बाब आहे. परंतु ज्यांनी गोव्याच्या मातीशी इमान राखले, येथील संस्कृतीशी प्रतारणा केली नाही अशा नानासारख्यांचे जाणे काळजात कळ उठवल्यावाचून राहात नाही हेही तितकेच खरे.