– शंभू भाऊ बांदेकर, साळगाव
गेल्या गोवा मुक्तिदिनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री या नात्याने प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी परेड मैदानावर आपले पहिले भाषण केले. या भाषणामुळे उपस्थित काही लोक खजिल झाले, तर काही राष्ट्रप्रेमी नागरिकांना त्यांच्या भाषणाने सुखद दिलासा मिळाला. काहीजण खजिल होण्याचे कारण म्हणजे भाजपा सरकारने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी आखलेल्या विविध योजनांचे स्पष्टीकरण करताना त्यासाठी जी आर्थिक मदत दिली, तीही त्यांनी जाहीर केली. आता ही दिलेली मदत काही सरकारने हिकमतीने मिळवलेला निधी नव्हे, तर धूर्तपणे जनतेच्याच खिशाला कात्री लावून ही आर्थिक मदत देण्यात आली आहे. मग त्याचे श्रेय भाजपा सरकारला देत ज्यांनी ज्यांनी ती मदत स्वीकारली, ती याचि देही, याचि डोळा ऐकून जनता खजिल होणार नाही तर काय? निवडणुकीच्या काळात जनतेचे फाजिल लाड करीत विविध योजना जाहीर करायच्या आणि ती मदत स्वीकारल्यानंतर त्यांना पश्चात्तापाची पाळी यावी, हे खचितच योग्य म्हणता येणार नाही.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून सुखद दिलासा देणारी गोष्ट घडली ती म्हणजे पेडणे तालुक्यातील पत्रादेवीच्या स्मारकासंबंधाने प्रा. पार्सेकर यांनी सांगितले की, ‘‘पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे गोवा सरकारतर्फे नूतनीकरण करण्यात येणार असून तेथे लोकांना गोवा मुक्तिदिनाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तेथील सर्व ऐतिहासिक स्मारकांचे नूतनीकरण केले जाईल.’’ हे काम दीड वर्षांच्या आत पूर्ण करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला आहे.
केवळ पेडणे तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठीही ही सुखदायक अशी गोष्ट आहे व त्याबद्दल मुख्यमंत्री पार्सेकर यांचे अभिनंदनच करायला हवे. त्याच बरोबर मागच्या वेळी श्री. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही सरकारने गोवा – महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवीच्या त्या स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्याचे स्मरण करून देणार्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात सुशोभीकरण सोडाच, पण त्या स्मारकाजवळ साचलेला केरकचराही बाजूला करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवरून झाले नाहीत.
पत्रादेवीचे हे स्मारक पेडणे तालुक्यातील तोरसे या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येते. पूर्वी या स्मारकाची साफसफाई करण्याचे काम तोरसे ग्रामपंचायतीच्या वतीने केले जात असे, परंतु त्यांना त्यासाठी देण्यात येणारा निधी सरकारने बंद केला, कारण काय तर सरकारच्या साधनसुविधा महामंडळाने हे काम करावे असे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुचविले होते. अर्थात, त्यात काही गैर आहे असे नव्हे, परंतु साधनसुविधा महामंडळाकडे आज इतकी कामे आहेत की, हे स्मारक पूर्णपणे कचरामय झाले, तरी ते या स्मारकाकडे लक्ष पुरवू शकणार नाहीत. निदान या महामंडळाच्या कामाला मुहूर्त मिळेपर्यंत तरी ग्रामपंचायतीकडे पूर्ववत निधी देऊन हे स्वच्छता अभियान पूर्ण करावे अशी सूचना सरकारला करावीशी वाटते.
आपला भूतकाळ आपण पोर्तुगिजांच्या गुलामगिरीत असल्यामुळे अंधःकारमय होता. त्याला उजाळा देण्याचे काम घरादारावर तुळशीपत्र ठेवून जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्यसैनिकांनी केले, म्हणून त्यांच्याप्रतीची कृतज्ञता म्हणून हे पवित्र स्मारक पत्रादेवी येथे उभारले गेलेले आहे.
माझ्या पेडणे मतदारसंघाच्या आमदारकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना विनंती करून मी हे स्मारक उभारण्याचे काम केलेले होते. ही आत्मप्रौढी नव्हे, पण जिज्ञासूंच्या माहितीसाठी हे नमूद करीत आहे. अशा या स्मारकाभोवती अस्वच्छता राहिली, तर त्यात त्या ज्ञात – अज्ञात हुतात्म्यांना शांती कशी बरे लाभेल?
जी शासनव्यवस्था केवळ जनतेच्या खिशाला चाट देऊन विविध योजना आखून फुकाचे श्रेय उपटते, त्यांना हुतात्म्यांच्या स्मारकाची देखभाल करता येऊ नये ही खचितच चांगली गोष्ट नव्हे. आता मुख्यमंत्र्यांनी या स्मारकाचे नूतनीकरण करण्याचा मनोदय जाहीरपणे व्यक्त केलेला आहे. त्याचे स्वागत करतानाच या कामाला आता शक्य तितक्या लवकर सुरूवात व्हावी अशी सूचना करावीशी वाटते.
पत्रादेवी स्मारकाच्या संबंधाने सरकारच्या व आण जनतेच्या निदर्शनास आणखई एक गोष्ट नम्रपणे आणून द्यावीशी वाटते, ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पत्रादेवी येथे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक व नागरिकांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होतो, तसा तो गोवा मुक्तिदिनी म्हणजे १९ डिसेंबर रोजीही झाला पाहिजे. विश्वास मधुकर पेडणेकर या पत्रलेखकाने तशी सूचना नुकतीच नवप्रभेच्या ‘वाचकीय’ मधून केलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये जसा हा कार्यक्रम सरकारी पातळीवर साजरा होतो, तसाच तो पेडणे येथेही होतो. पण त्या दिवशी हा कार्यक्रम आटोपून नगराध्यक्ष, आमदार आणि आम जनता या सर्वांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या उपस्थितीतत पत्रादेवी येथे मुक्तिदिन कार्यक्रम साजरा केला, तर स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच गोवा मुक्तिदिनीही स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना मिळाल्यासारखे होईल, कारण हे स्मारक गोवा मुक्तीचे ज्वलंत प्रतीक आहे.
मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसैनिक व इतर मान्यवर जसे स्वातंत्र्यदिनाचा राजधानीतील कार्यक्रम आटोपून पत्रादेवीला जातात, तसेच या गोवा मुक्तिदिनानिमित्तही करता येईल व जशी वाहतूक व्यवस्था स्वातंत्र्यदिनी केली जाते, तशीच ती १९ डिसेंबरलाही ठेवता येईल. योगायोगाने विद्यमान मुख्यमंत्री हे पेडणे तालुक्यातलेच आहेत. त्यांनी या सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, ही नम्र विनंती.