गोव्यात नुकत्याच झालेल्या ४५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या दूरदर्शनवरील थेट प्रक्षेपणात अपुर्या माहितीवर आधारलेले आणि बालिश निवेदन करणार्या आयना पहुजा या निवेदिकेला ते प्रकरण बरेच भोवले असून तिच्याकडून समारोप सोहळ्याचे संचालन दूरदर्शनने काढून तर घेतलेच, शिवाय अक्षम्य चुकांनी भरलेल्या त्या निवेदनाचे व्हिडिओ संतप्त प्रेक्षकांनी इंटरनेटवर अपलोड केल्याने तिचे सूत्रसंचालक म्हणून करिअरच धोक्यात आले आहे.
‘इफ्फी’च्या उद्घाटन सोहळ्यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर उभी राहून येणार्या पाहुण्यांच्या महोत्सवासंबंधी प्रतिक्रिया घेण्याचे काम दूरदर्शनने आयना हिच्यावर सोपवले होते. मात्र, येणार्या पाहुण्यांचा तिला परिचयच नसल्याचे व या महोत्सवाविषयीही तिला अत्यंत अपुरी माहिती असल्याचे त्या निवेदनातून दिसून येत होते. गोव्याच्या राज्यपालांचा उल्लेख तिने ‘भारताच्या राज्यपाल’ असा केला होता, तर महोत्सवासंबंधी नीट माहिती देण्याऐवजी गोव्याचे समुद्रकिनारे, फिशकरी वगैरेंविषयी अवांतर बडबड केल्याने दूरदर्शनवर हे थेट प्रक्षेपण पाहणारे लाखो प्रेक्षक नाराज झाले होते. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेशणार्या इतर महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेताना ‘आपण कसे आहात?’ असे विचारण्यापलीकडे तिला त्यांना बोलते करता आले नव्हते. त्या निवेदनाचा व्हिडिओ यूट्यूबवर कोणीतरी अपलोड केला तेव्हा त्या निवेदनावर प्रचंड टीका झाली. त्यामुळे आयनाच्या आईने पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार देऊन तो व्हिडिओ काढून टाकण्याची व्यवस्था केली. मात्र, तरीही दिवसेंदिवस तो व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होत असून त्यावरील टीका टिप्पणी सुरूच आहे. त्यामुळे वैतागलेल्या त्या निवेदिकेने ‘द लॉजिकल इंडियन’ या संकेतस्थळावर स्वतःचे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या सार्या प्रकारामुळे आपले भवितव्यच धोक्यात आले असून आत्महत्या करावीशी वाटते असे तिने त्यात म्हटले आहे.
२० नोव्हेंबरला सदर थेट प्रक्षेपण सुरू झाले तेव्हा आपल्या कानात माहिती देणारा इअरफोनच बंद पडला. कोण पाहुणे येत आहेत हे आपल्याला कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगणे अपेक्षित होते, पण तेही सांगितले जात नव्हते. आपण ज्यांना ओळखत होते, त्यांची माहिती आपण दिली, पण इतरांचा आपल्यालाही परिचय नव्हता असे स्पष्टीकरण आयनाने दिले आहे. तिच्या आईनेही तिची बाजू उचलून धरीत सोशल मीडियावर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या मुलीला या सार्या प्रकाराचा मानसिक धक्का बसल्याचेही तिने म्हटले आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी अत्यंत अननुभवी निवेदिकेची निवड दूरदर्शनने कोणत्या कारणासाठी केली होती हे मात्र गुलदस्त्यात आहे!