जुने गोवे येथे येत्या दि. २४ पासून सुरू होणार्या सेंट झेवियर शवदर्शन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल आमदार कार्लुस आल्मेदा व सरकारी अधिकार्यांसमवेत जुने गोवे येथे भेट दिली.शव प्रदर्शन व फेस्तासाठी हजारो भाविक तेथे जातात. त्यामुळे तेथे गर्दी होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातही काळजी घेणे सरकारसमोर आव्हान असते. वाहतूक व्यवस्थेत कोणतेही बदल किंवा सुधारणा केली तरी वाहतुकीची कोंडी होते. सध्या पणजी ते जुने गोवे दरम्यानच्या चौपदरी मार्गाचे काम जोरात चालू आहे.
सरकारने जुने गोवेपासून काही अंतरावर पार्किंग व्यवस्था केली आहे. असे असले तरी वाहनांच्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवणे वाहतूक पोलिसांना कठीण होईल, असे काही अधिकार्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सुरक्षेच्या बाबतीतही अधिकार्यांना मार्गदर्शन केले.