शवदर्शन सोहळा : वाहतुकीत आमुलाग्र बदल

0
125

येत्या २२ रोजीपासून सुरू होणार्‍या व ४ जानेवारीपर्यंत चालणार असलेल्या जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर शव प्रदर्शनास देश-विदेशातून तसेच गोव्यातूनही मिळून लाखो भाविक हजेरी लावणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र असे बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस विभागाचे उपाधीक्षक धर्मेश आंगले यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.शवप्रदर्शन काळात जुने गोवे येथे वाहतूक व्यवस्थेत बिघाड होऊ नये व वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी विशेष वाहतूक नकाशा तयार करण्यात आला आहे. शिवाय जे लोक शव प्रदर्शनासाठी जुने गोवे येथे जाणार आहेत त्यांना आपली वाहने तेथील चर्च परिसरापर्यंत नेऊ द्यायची नाहीत. विशिष्ट ठिकाणी त्यांनी आपली वाहने पार्क करावीत व तेथून त्यांना कदंब बसेसमधून शव प्रदर्शन स्थळी नेण्याची सोय करण्यात आली आहे. केवळ अतिमहनीय व महनीय व्यक्तींचीच वाहने शव प्रदर्शन स्थळापर्यंत नेण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे आंगले यानी यावेळी स्पष्ट केले. अपंग व्यक्तींना घेवून येणार्‍या वाहनांनाही शवप्रदर्शन स्थळापर्यंत जाता येणार आहे.
पणजी ते फोंडा या मार्गावरून धावणार्‍या बसेस्‌ना शव प्रदर्शन काळात रायबंदर मार्गे जाऊ देण्यात येणार नसून या बसेस्‌ना कदंब बायपास मार्गावरूनच जावे लागणार आहे. त्याशिवाय सर्व अवजड व मध्यम वाहनेही कदंब बायपास मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. पिलार ते जुने गोवे हा मार्ग एकतर्फी करण्यात येईल. दक्षिण गोव्यातून येणार्‍या वाहनांना एला फार्मपर्यंत येता येईल. नंतर तेथून त्यांना शव प्रदर्शन स्थळी कदंब बसेस्‌ने नेण्यात येईल.
फोंडा ते पणजी मार्गावरून धावणार्‍या बसेस्‌ना जुने गोवे येथील चर्च परिसरातून प्रवास करता येणार नाही. त्या ऐवजी या बसेस् दर्गा जंक्शन येथून कदंब बायपासच्या दिशेने वळवण्यात येतील. फोंडा येथून येणारी अवजड वाहने बाणस्तारी जंक्शनजवळ आमोणे पुलावरून वळवण्यात येतील व नंतर ती करासवाडा म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्ग १७ वर येतील.
शव प्रदर्शनासाठी पणजीहून रायबंदरच्या दिशेने येणारी वाहने (दुचाकी व चारचाकी) बाखिया बागायत येथे पार्क करण्यात येतील.
फोंड्याच्या दिशेने येणारी वाहने पिंटो गॅरेजजवळील मोकळ्या जागेत पार्क करून ठेवण्यात येतील. गवंडाळे येथून येणारी वाहने रमेश नाईक यांच्या घराजवळ पार्क करून ठेवण्यात येतील.
दिवाडी बेटावरून येणारी वाहने सेंट कॅजेटन चर्चच्या प्रांगणात पार्क करून ठेवण्यात येतील.
महनीय व्यक्तींची वाहने शव प्रदर्शन कार्यालयाच्या प्रांगणात पार्क करून ठेवण्यात येतील. ख्रिस्ती धर्मगुरुंची वाहने बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्चच्या कुंपणाच्या आत पार्क करून ठेवण्यात येतील. पोलिसांची व अपंग व्यक्तींची वाहने, सुलभ शौचालयाजवळील खुल्या जागेत पार्क करून ठेवण्यात येतील.
जुने गोवे चर्च जंक्शन ते गांधी सर्कल या दरम्यानचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येईल, असे धर्मेश आंगले यांनी यावेळी स्पष्ट केले.