कदंबचे ईडीसीकडे १० कोटी कर्जाचे साकडे

0
153

कदंब महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्ज फेडण्यासाठी महामंडळाने आर्थिक विकास महामंडळाकडे (ईडीसी) १० कोटी रु.चे कर्ज मागितले आहे. कदंब महामंडळाचे चेअरमन कार्लुस आल्मेदा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना वरील माहिती दिली.
कदंब महामंडळ त्याला बसेस्‌चे टायर व अन्य सुटे भाग तसेच डिझेल पुरवणार्‍या कंत्राटदारांना पैसे द्यायचे असून आपले हे पैसे मिळावेत यासाठी हे कंत्राटदार कदंब महामंडळाच्या मागे लागले आहेत. शिवाय महामंडळ कर्मचार्‍यांच्या सोसायटीचेही पैसे देणे आहे. या पार्श्‍वभूमीवर महामंडळाने ईडीसीकडे कर्ज मागितले असल्याचे कार्लुस यांनी स्पष्ट केले.दरम्यान, कदंब महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी महामंडळाने विविध ठिकाणी असलेल्या आपल्या मालमत्ता विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्को येथील बसस्थानक सर्व सोयी-सुविधानी युक्त असा करण्यात येणार असून त्यासाठीची निविदा काढण्याची जबाबदारी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. पुढील महिन्यात निविदा काढण्यात येणार असून जानेवारी २०१५ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. शिरोडा बसस्थानक डिसेंबरपर्यंत सुरू होऊ शकेल. महामंडळाची पर्वरी येथेही मालमत्ता असून ती विकसीत करण्याबाबत विचार चालू आहे.
मडगाव येथील अत्याधुनिक बस स्थानकाचे काय झाले असे विचारले असता त्या बसस्थानकाच्या आराखड्यात काही बदल करण्याची गरज आहे. दिगंबर कामत सरकारने या बसस्थानकावर एक हॉटेल, स्विमिंग पूल आदींची योजना केली होती. हे हॉटेल, स्विमिंग पूल व अन्य अनावश्यक गोष्टींना फाटा देण्याचा विचार असून त्यासाठीच या प्रस्तावित बसस्थानकाचे काम सुरू करण्याचे काम हाती घेतले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.