भारतात येणार्‍या ऑस्ट्रेलियन पर्यटकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’

0
110
सिडनी येथील ऑलफोन्स एरिना येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर त्यांना संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान मोदी यांची सिडनीत घोषणा
आपल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कालच्या एका कार्यक्रमावेळी या देशातील हजारो भारतीयांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड प्रतिसाद लाभण्याच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी भारतात येणार्‍या ऑस्ट्रेलियन पर्यटकांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ची सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली.ओसीआय व पीआयओ यांच्या एकीकरणासाठी मोदी यांनी दोन महिन्यांची मुदतही जाहीर केली. यावेळी त्यांनी भारतातील महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेसाठी ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीयांचा पाठिंबाही त्यांनी आपल्या भाषणातून मागितला. सिडनीतील ऑलफोन्स एरिना येथील मोदींच्या सभेस सुमारे २० हजार एवढ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. सिडनीतील भव्य स्वागताने भारावून गेलेल्या मोदी यांनी हा दिवस आपण कधीच विसरणार नसल्याचे सांगितले.
आपले सरकार भारतात येणार्‍या ऑस्ट्रेलियन पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हल सुविधा देणार असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रवासी भारतीय दिवस अहमदाबाद येथे येत्या ७ जानेवारी रोजी आयोजिण्यात येणार असून त्याआधी पीआयओ (पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन) व ओसीआय (ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया) यांचे एकीकरण करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी यावेळी जाहीर केले.
गेल्या सप्टेंबरमध्ये अमेरिका दौर्‍यावेळी याविषयी घोषणा केली होती. मात्र त्यासाठी त्यांनी मुदत स्पष्ट केली नव्हती. आपल्या सरकारने आणलेल्या आर्थिक सुधारांची माहिती मोदी यांनी दिली. तसेच गुंतवणुकीसाठी भारत उत्तम स्थळ असल्याचेही त्यांनी सांगितले.