महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठीच्या सारीपाटाची जुळवाजुळव कालही सुरूच राहिल्याने भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत काल येणार असलेले गृहमंत्री राजनाथसिंग आज येथे पोचतील. सर्वाधिक १२२ जागांसह प्रथम क्रमांकावर असलेल्या भाजपकडे आता १३५ आमदारांचे पाठबळ असून छोटे पक्ष व अपक्ष आमदारांच्या सहाय्याने सत्ता स्थापण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने राज्यपालांच्या निमंत्रणाची प्रतीक्षा असल्याची माहिती भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी दिली.राष्ट्रवादी कॉंग्रेसने याआधीच न मागता व विनाअट पाठिंबा जाहीर केला होता. मात्र भाजपने त्यासंदर्भात कालपर्यंत निर्णय घेतला नव्हता. तसेच केंद्रीय निरीक्षक न आल्याने विधीमंडळ नेता किंवा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार याविषयीही निर्णय होऊ शकला नाही. शिवसेनेकडून भाजपला पाठिंब्याची अपेक्षा असली तरी विनाअट पाठिंबा देण्याची सूचना शिवसेनेला भाजपने केल्याची माहिती सूत्रांनी दिली तर शिवसेनेनेही भाजपला कोणताही प्रतिसाद दिल्याचे वृत्त नाही.
या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळपासून भाजपच्या गोटातून छोटे पक्ष व अपक्ष यांच्याशी संपर्क साधून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
दरम्यान, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांबरोबर शिवसेना भवनात बैठक घेऊन पुढील कृतीविषयी चर्चा केली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या पक्षाने जनादेश मान्य केल्याचे सांगितले. मात्र आता भाजबरोबर युतीसंदर्भात कोणताही निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या विधीमंडळ नेत्याची निवड करण्याचे अधिकार उध्दव ठाकरे यांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेकडून १९९५ च्या
फॉर्म्युल्याचा प्रस्ताव?
दरम्यान, भाजपने नैसर्गिक मित्र असलेल्या शिवसेनेशी पाठिंब्यासाठी चर्चा सुरू केली असल्याचे वृत्त आहे. पडद्यामागे उभय पक्षांच्या नेत्यांची चर्चा चालल्याचे सूत्रांनी सांगितले. या चर्चेदरम्यान शिवसेनेने भाजपला १९९५ च्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले. मात्र भाजपने हा प्रस्ताव नाकारल्याचेही वृत्त आहे.
१९९५ च्या प्रस्तावानुसार शिवसेनेने उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग व अर्थमंत्रीपद अशा मागण्या केल्या असल्याचे या सूत्रांनी सांगितले.