मॅडिसन स्न्वेअरमध्ये मोदींची स्पष्टोक्ती
भारतात लोकशाही ही पध्दती नसून ती एक विचारधारा आहे. भारताच्या प्रगतीसाठी सुशासन अत्यंत आवश्यक आहे, असे सांगून जनतेच्या आकांक्षापूर्तीसाठी आपले सरकार शंभर टक्के यशस्वी होईल असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काल येथील मॅडिसन स्न्वेअरमध्ये आयोजित सभेत अमेरिकास्थित भारतीयांसमोर बोलताना व्यक्त केला.
भारतीयांना हवा असलेला बदल आपण घडविणार असल्याचे आश्वासन आपण देऊ इच्छितो. त्याचवेळी तुम्हाला खाली मान घालावी लागेल अशी कोणतीही कृती आपण करणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले. अनिवासी भारतीयांनी भारताची प्रतिमा बदलून टाकली आहे. त्यामुळे जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली असल्याचे ते म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील क्रांती तुमच्याविना शक्य झाली नसती असे उपस्थितांना निर्देशून त्यांनी सांगितले. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळ जशी लोक चळवळ बनवली तसेच विकासात लोकांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. विकास ही आम्हाला एक लोक चळवळ बनवायची आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
युवा शक्ती मोठी शक्ती
युवा शक्ती ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आम्ही कौशल्य विकासाला महत्व दिले आहे आणि त्यासाठी वेगळे खाते निर्माण केले आहे. युवकांचे कौशल्य भारताला आघाडीवर नेणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होण्याची गरज नाही. अमेरिका जर जगातील सर्वात जुना लोकशाही देश असेल तर भारत सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
गंगा स्वच्छतेसाठी आवाहन
गंगा नदीच्या सफाईसाठी त्यांनी अनिवासी भारतीयांना आवाहन केले. गंगा वाचविण्याची अत्यंत निकड आहे असे ते म्हणाले.