सेवेत कायम करण्यात चालढकल
आमरण उपोषणानंतर सेवेत कायम करण्याचे आश्वासन देऊनही ते पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आरोग्य खात्यातील ६८ मलेरिया सेवकांनी कालपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले.
यापूर्वी या सेवकांनी १७ मार्च २०१० रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. २७ जून २०११ रोजी खात्याच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता. तसेच ७ एप्रिल २०११ रोजीही आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यासमक्ष सेवेत कायम करण्याचे आश्वासन देऊन आमरण उपोषण मागे घेण्यास सांगितले होते, असे मलेरिया सेवकांनी सांगितले. मात्र, आश्वासन देऊन अद्यापही सेवेत कायम केले नसल्याने आता आरोग्य खात्याच्या कांपाल येथील इमारतीसमोर या मलेरिया सेवकांनी कालपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. सेवेत कायम केल्याचे पत्र हातात पडेपर्यंत आता उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचे या सेवकांनी सांगितले. येत्या महिन्यात कॉन्ट्रेक्ट संपत असल्याची माहितीही या सेवकांनी दिली. सुरवातीला १५०० रु. वेतन मिळत होते. नंतरते वाढवून २६०० रु. एवढे करण्यात आले. तद्नंतर ३५०० रु. एवढे करण्यात आले. आता ६६०० रु. एवढा पगार मिळत असल्याचे सांगून वाढत्या महागाईत एवढ्या पगारावर दिवस कसे काढायचे, असा सवाल या सेवकांनी केला.