‘आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. निवडणुकी दरम्यान मी माझ्या पक्षाची ताकद दाखवून देणार आहे. पंतप्रधानपदासाठी आम्ही नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहोत. मोदी हे देशाचे पंतप्रधान बनले पाहिजे’, असे प्रतिपादन राज यांनी काल येथील षण्मुखानंद सभागृहात मनसेच्या आठव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या घोषणेचे भाजपने स्वागत केले आहे. भाजपचे नेते नितिन गडकरी यांनी अलीकडेच राज यांची भेट घेऊन त्यांना लोकसभेसाठी उमेदवार उभे न करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी वरील घोषणा केली. मनसेने उमेदवार उभे केल्यास मतांची विभागणी होणार असल्याने मनसेने निवडणूक लढवू नये असे आवाहन गडकरी यांनी राज यांना केले होते. असे असूनही त्यांनी त्यात उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. बाळा नांदगावकर, आदित्य शिरोडकर चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर, राजू पाटील, अशोक खंडेभरड, डॉ. प्रदीप पवार व दीपक पायगुडे असे हे उमेदवार आहेत. मनसेची जाहीर सभा लवकरच घेण्यात येणार असून त्यावेळी आपल्या गडकरी यांच्या बरोबरील भेटीसंदर्भात झालेल्या टीकेला आपण उत्तर देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.