Home बातम्या मयेतील स्वयंघोषित वारसदारास हाकलण्याची मागणी

मयेतील स्वयंघोषित वारसदारास हाकलण्याची मागणी

0
 व्यवहाराद्वारे मयेत जर कोणी बाहेरील व्यक्तीने पाय ठेवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सदर स्वयंघोषित वारसदाराला भोगावे लागतील. मयेतील जनता एक इंचभरही जमीन बाहेरील व्यक्तीस देणार नाही असा इशारा मये भूविमोचन नागरिक कृती समितीने काल पत्रकार परिषदेतून दिला.

मयेच्या मालमत्तेचे वारसदार मयेतील लोक व ग्रामस्थ आहेत. तरीही स्वत:ला मयेच्या स्थलांतरीत मालमत्तेचा वारसदार म्हणवणार्‍या एका पोर्तुगीज धार्जिण्या नागरिकाने सदर परस्पर मोठा व्यवहार केला आहे. हा डाव व हे घाणेरडे कारस्थान मयेवासीय हाणून पाडणार आहेत. यापूर्वी या मालमत्तेचा वारसदार म्हणून मिरवणार्‍या एव्हरिक नरोन्हा यांनी मयेची जमीन विकायला काढली होती. मात्र त्यावेळी मयेतील जाणत्या लोकांनी सर्वत्र पत्रके वितरित करून जागृती करून सदर डाव हाणून पाडला होता. असे समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर यांनी सांगितले. 
सावनवाडा मये येथे असलेल्या कस्टेरीयन खात्याच्या वास्तूत बेकायदा राहणार्‍या तथाकथित वारसदाराला सरकारने हाकलून लावणे गरजेचे आहे. सदर वास्तू कस्टोडियन खात्याने ताब्यात घ्यावी. २००० साली फ्रांसिस सार्दिन सरकारच्यावेळी सदर वारसदाराला सरकारने बेकायदा दिलेले सुमारे ४५ लाख रुपये व्याजासह वसूल करावे अशी मागणीही आम्ही सरकारकडे केलेली होती. कस्टोडियन खात्याची वास्तू ही सरकारी आहे. त्याच्या दुरुस्त करण्यासाठी सरकार त्यावर पैसे खर्च करू शकते. असे असताना सार्दिन यांनी मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून सदर स्वयंघोषित वारसदाराला एकाच दिवशी सात धनादेशांद्वारे कस्टेडियन खात्याच्या तिजोरीतील ४५ लाख रु. सदर वास्तूच्या दुरुस्तीसाठी म्हणून देऊन मयेकारांची थट्टाच केली होती. त्या विरोधात समितीने आवाज उठवून सदर सर्व पैसे व्याजासह वसूल करण्याची मागणी केली होती, असे श्री. मयेकर म्हणाले.
या पत्रकार परिषदेला यशवंत कारभाटकर, पंचायत सदस्य किशोर कारबोटकर, संजय आरोंदेकर, नरेश पेडणेकर, तुळशीदास चोडणकर, श्याम माईणकर आदींची उपस्थिती होती.